रश्मी तिन दिवसानंतर येणार होती, तिचा नवरा गेला की मग ती व्हिसा येई पर्यंत मुंबईलाच रहाणार होती. गेल्या दोन तिन दिवसांपासून मात्र रिया पण घरी आली नव्हती. रश्मीचा मात्र दर रोज फोन येत होता. तिनेच सांगितलं की रियाचं आणि तिचं बोलणं अगदी दररोज सुरु होतं.
रश्मीचा फोन आला होता, नेमका राहुलनी घेतला फोन.. काय गं? कशी आहेस? वगैरे बोलणं झालं, रश्मी म्हणाली, अरे दादू रियाचं पण लग्न ठरतंय रे.. ती आली होती का घरी? राहुल एकदम ओरडलाच.. म्हणे काय?? तिचं लग्न? कोण करतंय तिच्याशी लग्नं? त्या येडपट माणसाला एकदा बघायचंय.. चल रे उगीच काही तरी बोलू नकोस वात्रट सारखं, आईला दे फोन.. रश्मी म्हणाली.
राहुल नेहेमी प्रमाणे सोफ्यावर आडवी उशी लावून हा्तात पुस्तक घेउन बसला होता . पुस्तकाचं पान समोर उघडं होतं, पण राहुलला काही लक्षात येत नव्हतं काय वाचतोय ते…मन सैर भैर झालं होतं. असं का होतंय? तिचं लग्न ठरतंय तर मग मला का अस्वस्थ वाटतंय?? राहुल तसाच बसून राहिला. सारखं दाराकडे लक्ष जात होतं. रिया येईल आणि मग आपल्याकडे बघून हसत रश्मीच्या खोलीकडे चालत जाईल..असं सारखं वाटत होतं.
आई पण बराच वेळ बोलत होती रश्मीशी, पण काय बोलत होती तेच कळत नव्हतं. राहुल उठला आणि सरळ चप्पल पायात सरकवून बाहेर निघायला फिरायला. खूप वेळ अगदी कुठेही फिरत होता. शेवटी कॉफी हाउस मधे जाउन कडक फिल्टर कॉफी मागवली..आणि विचार करित बसला. कॉफी चा कप समोर आणून ठेवला होता वेटरने, आणि आता त्याला पण जवळपास दहा मिनिटं झाली होती. तिकडे पण त्याचं लक्षं नव्हतं. अगदी खरं सांगायचं तर कुठेच लक्ष लागत नव्हतं.. समोर वेटरने आणून ठेवलेल्या बडिशोपेच्या डिश मधे त्याने न घेतलेल्या कॉफी चे पैसे टाकले , आणि उठून चालायला लागला.
परत घरी येउन पोहोचला.. तास भर निर्हेतु भटकल्यावर.. अजूजुनही खूप लो वाटत होतं. असं का होतय?? घरी आला ,तर रिया समोर बसली होती. आईशी गप्पा मारत. आई तिच्या डोक्याव्रून हात फिरवत होती, राहुल ला जाणवलं, की आई रश्मी ला खूप मिस करते आहे म्हणून. आई म्हणाली, काय रे दादू , कॉफी घेणार? राहुल ला कॉफी हाउस मधला, न प्यायलेला कॉफीचा कप आठवला, म्हणाला.. हो. चालेल.
आता समोर रिया बसलेली होती. तिच्या समोरच्या खुर्चीवर बसला, आणि तिला म्हणाला… हं.. काय करतो गं मुलगा?? आणि रिया कडे पाहिलं. रियाच्या डोळ्यात खूप राग दिसला… तुला काय करायचंय? काय करतो म्हणे?? काहीही करित असेल….. ~! इतकं संतापायला काय झालं हेच समजल नाही राहुल ला. साधा प्रश्न विचारला .. आणि ही अशी रिऍक्शन.. गेलीस उडत.. असं म्हणून निघून जावं समोरून असं क्षणभर वाटलं..
राहुलला पण तिला चिडायला काय झालं हेच कळत नव्हतं.तिच्या चेहेऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता.. काहीच बोलली नाही ती. चिडली तर चिडु दे म्हणून समोरून नेहेमी प्रमाणे निघून न जाता, तिला काय झालंय हे समजून घेणं जास्त महत्वाचे वाटु लागलं एकदम.. तिच्या समोर बसला, आणि तिच्या कडे पाहिलं..
तिचे बोलके ब्राउन डोळॆ अगदी काहीही न बोलता खूप बोलावून गेले..राहुलच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला.. म्हणजे ………………??? हं…….!!!हे इतके दिवस का लक्षात आलं नाही? किती मुर्ख आहोत आपण?? राहुलने तिच्याकडे बघितलं,तिची नजर खाली जमिनीकडे होती. डोळ्यात दुखावल्या चे भाव दिसत होते. तसंही मुलींना आपल्याकडे कोणी पहात असलं की लवकर कळतं. रियाने नजर उचलली, आणि समोर राहुलकडे पाहिलं… आर्त नजर.. खूप काही सांगायचंय रे मुर्ख माणसा….. कधी समजणार तुला??? मला काय म्हणायचंय ते??
राहुलला अचानक जाणिव झाली की आपल्याला काय होतंय याची. अचानक रिया बद्दल खूप काळजी वाटली त्याला… एकदम आवडायला लागली ती! कित्येक वर्ष जिच्या शोधात होतो, ती हीच!!! हे पण लक्षात आलं.. राहुलने तिच्या नजरेत नकळत नजर गुंतवली अन लहानसं स्मित हास्य केलं. सगळं काही होतं त्या हास्यामधे.. प्रेम, जवळीक, काळजी , सगळं काही होतं . अगदी पुर्ण अशुअरन्स सहीत.. तिच्या पण डोळ्यात सगळं समजल्याची भावना दिसली. एकही शब्द न बोलता दोघांच्या मनात एकमेकांच्या भावना पोहोचल्या होत्या..
आयुष्यात पहिल्यांदा रिया बरोबर न चिडता बोलावंसं वाटत होतं, पण काय बोलावं ? कसं बोलावं? हेच समजत नव्हतं.संध्याकाळी नेहेमी प्रमाणे रिया ला सोडायला राहुल निघाला, तेंव्हा दोघंही एकही शब्द न बोलता चालत होते रस्त्यावरुन. रियाचं घर आलं, ती वर जायला लिफ्ट ची वाट पहात उभी होती. राहुल कडे थकलेल्या नजरेने पहात.. की आता तुच काही करु शकशील रे… नाहीतर कठीण आहे…राहुल काही न बोलता ती लिफ्ट मधे शीरे पर्यंत उभा राहिला, आणि लिफ्ट चं दार बंद झाल्यावर परत निघाला.
घरी आल्यावर पण त्याला सारखं रिया ला पहायला आलेल्या त्या न पाहिलेल्या मुलाचा चेहेरा डोळ्यापुढे सारखा येत होता. झोप येत नव्हती. आईने जेवायला बोलावलं, तरी पण ऐकू येत नव्हतं.. दुसऱ्या दिवशी रश्मी आली. खुप खुप बोलत होती आईसोबत.. आईशी मनसोक्त बोलणं झाल्यावर आई म्हणाली की आता थोडा सांजा करते..भूक लागली असेल ना?? रश्मी हो म्हणाली.. आणि आई आत गेली.
हं.. बोल दादू.. काय म्हणतोस?? असा चिंताग्रस्त का दिसतोस? काय झालं?? राहुलला कसं बोलावं हेच समजत नव्हतं. बरं आजपर्यंत रियाला पण सरळ विचारलं नव्हतंच नां.. किंवा तिला सांगितलं पण नव्हतं, की आय लव्ह यु म्ह्णून.. कसे काय लोकं सांगू शकतात असं? ह्या सगळ्या गोष्टी तर आपोआप होत असतात.हिंदी सिनेमात कसं सगळं मस्त दाखवतात, की हिरो हिरोइनला आय लव्ह यु म्हणतो.. नाही तर आपण.. नुसते मुख दुर्बळ.. कधीच सांगु शकणार नाही रियाला. बरं मी नाही, तर तिने तरी सांगायचं नां.. पण नाही.. ती पण काहीच बोलायला तयार नाही.
आता तर लग्नं पण ठरतंय तिचं, कालच येउन बघून गेला म्हणे मुलगा. तिला नकार तर येणार नाहीच.. इतकी सुंदर आहे ती.. स्वतःलाच शिव्या घालत होता राहुल, हा काय मुर्खपणा, इतके वर्षं तिला बघतो आहेस, पण कधी लक्षात आलं नाही गधड्या की ती आपल्याला आवडते म्हणून.
खरं खरं आयुष्य जर सिनेमातल्या सारखं असतं तर किती बरं झालं असतं नां?? मस्त पैकी आपण म्हंटलं असतं, आय लव्ह यु वगैरे.. मग तिने पण मान्य केलं असतं, आणि मग पुढचं सगळं…. रश्मी म्हणाली.. ओये…. दादू.. अरे कुठे हरवलास?? तसा एकदम बांध फुटला राहुलचा, डोळे भरुन आले, पण आता रश्मीला दिसू नये म्हणून तोंड फिरवलं, पण तिने पाहिलंच बहुतेक..
ती उठली , आणि हळूच राहुलच्या शेजारी जाउन उभी राहिली. त्याच्या केसातून बोटं फिरवत म्हणाली.. अरे तुला रिया आवडते नां?? झटक्याने राहुलने तिच्याकडे बघितलं, तर तिच्या नजरेत एक खोडकरपणा स्पष्ट दिसत होता.. म्हणाली, अरे मला ती वहिनी म्ह्णून आवडेल .. पण तु एक महामुर्ख, इतके दिवस झाले, कधी पाहिलंच नाही तिच्याकडे.ती पण तशीच. .. सगळ्या मनातल्या गोष्टी मनात ठेवायची.
पण माझं लग्नं ठरलं, तेंव्हा मात्र तिला विचारलंच मी एकदा.. आणि तिने मुक होकार दिला..तेंव्हाच ठरवलं, की या दगडाच्या मनात काय आहे हे पण बघु या, म्हणून मग सारखं तिला काही ना काही कारण काढून तुझ्या बरोबर बाहेर पाठवलं. मला असं वाटलं होतं की कदाचित तुझ्या लक्षात येईल, आणि सगळं आपोआप होऊन जाइल .. पण नाही… तु एक नंबरचा वेंधळा, अजिबात तुला काही समज नाही…
अगं पण तिचं लग्नं ठरतंय नां?? राहुल म्हणाला… रश्मी हसली, म्हणाली, अरे तुला तिच्या बरोबर इतक्या वेळा बाहेर एकत्र पाठवून पण तु तिला काही बोलू शकला नाहीस, तेंव्हाच माझ्या लक्षात आलं, की आता मलाच काहीतरी करावं लागेल, नाहीतर तिचं कुठेतरी लग्नं ठरेल, आणि तु बसशील हात चोळत. म्हणुन हा हुकुमाचा एक्का वापरला आम्ही..
मीच रियाला सांगितलं, की तुला सांग तिचं लग्नं ठरतंय म्हणून.. आणि तिने तुला सांगताच, तुला ही जाणिव झाली की रिया आता दुसऱ्या कोणाची तरी होणार, आणि तुला तिची किम्मत कळली. तशी पण तुला ती आवडत होतीच , पण या बातमी मुळे तुला समजलं की तुला आवडते… बस्स.. …
म्हणजे??????????? तिचं लग्नं वगैर काही ठरलं नाही??? आणि एकदम हसत सुटला. म्हणजे रिया पण सामिल आहे कां यात? अरे रियाच काय, आपली आई पण सामील आहे यात.. तिला पण सगळं माहिती आहे, तुच एकटा आहेस बुद्दु….
अरे आजी नेहेमी म्हणायची ना, एखादी गोष्ट तुमच्या समोरुन निघून गेली की मग तुम्हाला त्याची किंम्मत कळते. आणि नेमकं तेच झालं तुझ्या बाबतीत….
रश्मी आल्याचं रियाला पण कळलं होतंच.. हे सगळं बोलणं सुरु होतं तेवढ्यातच रिया पण आली.. म्हणाली काय गम्मत झाली गं ? कशाला हसताय? मला पण सांगा म्हणजे मला पण हसता येईल.. तिच्याकडे पाहिलं, अन म्हणाली… वहिनी .. बस इकडे!! असं म्हंटलं.. रियाच्या तिच्या गालावर गुलाब फुलले… आणि राहुल पण आता रश्मी समोर नसती तर आपण काय केलं असतं याचा विचार करु लागला.. :)
( आज ही पहिली कथा लिहिली आहे, आजपर्यंत आयुष्यात कधीच हा प्रयत्न केला नव्हता.. पण ब्लॉग वर लिखाण कमी करण्यापूर्वी एकदा हा प्रयोग करायची इच्छा होती, म्हणून हे पोस्ट!! ही कथा कशी वाटली ते अवश्य सांगा)