कुठलीही गोष्ट आपण नेहेमीच एका ठरावीक बौद्धिक तराजू मधे तोलत असतो. आपल्या मतांमधे म्हणूनच मते – मतांतरे होतात. एखादी गोष्ट जेंव्हा त्यावर बंदी आणली जाते तेंव्हा जास्त लोकप्रिय होते.जशी गुजरात मधे दारु..तशीच बऱ्याच बंदी घातलेल्या पुस्तकांबद्दल वाचण्यात आलं होतं. त्यामुळे ही पुस्तकं वाचायची इच्छा वाढली होती. थोडी राजकीय , पण बरीचशी श्रृंगारिक पुस्तकं होती बंदी घातलेल्या पुस्तकांमधे . लेखकांवर अशी पुस्तकं लिहिल्या बद्दल खटले चालवून लेखकांना अटक पण करण्यात आली होती- आता, इतकी गाजलेली पुस्तकं, मग त्यामधे काय असेल ही उत्सुकता काही शांत बसू देत नव्हती- ती पुस्तकं एकदा तरी वाचलीच पाहिजे अशी इच्छा व्हायची .
नेटवर बहुतेक सगळी पुस्तकं पिडीएफ मधे उपलब्ध आहेत- .बंदी घातली गेलेली पुस्तकं नेट वर शोधली आणि डाउन लोड करुन वाचली- काही पुर्ण वाचली , तर काही नुसती चाळली त्यांचीच थोडी माहिती इथे देतोय. यातली काही पुस्तकं ही अश्लीलतेकडे झुकणारी, किंवा अश्लील म्हणता येतील अशी पण आहेत. पुस्तकांचा काळ हा अगदी १७ व्या शतका पासून तर १९ व्या शतका पर्यंत आहे. त्या काळी पण असं साहित्य अस्तित्वात होतं हे बघून खरं तर आश्चर्यच वाटतं.
एखाद्या गोष्टीकडे पहाण्याचा काही दशका पूर्वीचा दृष्टीकोन आणि आजचा दृष्टीकोन यामधे जमीन अस्मान चं अंतर आहे. मी लहान असतांना चंद्रकांत काकोडकर हे अश्लील – चावट लिहिणारे म्हणून प्रसिद्ध होते.ह्यांची शामा ही कादंबरी बरीच गाजली होती. त्या कादंबरी मधे काय होतं असं?? आजच्या तुलनेत अजिबात काही नव्हतं. थोडं रोमान्सचं वर्णन केलं गेलं होतं. त्या काळात या कादंबरी कडे एक श्रृंगारिक कादंबरी म्हणून बघितलं जायचं आणि आमच्या सारखे मुलं चोरुन वाचायचे . तेंव्हा नुस्तं नायकाने नायिकेला जवळ घेतलं, आणि तिचं चुंबन घेतलं, इतकं जरी वाचलं तरी अंगावर शहारुन यायचं :) सगळ्यात जास्त इरॉटीक /रोमॅंटीक साहित्य होतं मराठी मधलं. आता नेटवर इतकं जास्त व्हिडिओ आणि अश्लील फोटो, लेख उपलब्ध आहेत, की काकोडकर एकदम फिके वाटतात, आणि त्यांच्यावर का केस केली गेली होती हेच समजत नाही??
काही महिन्यांपूर्वी एक रा.घो. कर्वेंवरचा चित्रपट पाहिला होता टिव्हीवर. त्या मधे दाखवलं आहे, की समाज स्वास्थ्य म्हणून जे मासिक ते काढायचे त्याला पण एक अश्लील साहित्य म्हणून त्यावर खटले भरण्यात आले होते.मराठी साहित्य इतके शुचिर्भूत होते, की सीमा रेषेला कधी किंचितही स्पर्श झाला तरी लोकं अकांड तांडव करायचे. हा चित्रपट अतिशय सुंदर होता. संतती नियमां साठी त्यांनी केलेलं काम उत्कृष्ट रीत्या दाखवलं होतं. पदरचे पैसे खर्च करुन ते एक समाजस्वास्थ्य म्हणून मासिक चालवायचे. अश्लिलतेच्या कायद्याखाली त्यांच्यावर बरेचदा खटले दाखल करण्यात आले . पैसा नसतांना पण त्यांनी हे मासिक सुरु ठेवलं.
केवळ भारतामधे नाही तर जगभरात असे अनेक साहित्य प्रकाशित केले गेले आणि त्या साहित्यिकांवर खटले पण चालवले गेले. काही ठिकाणी तर जेल मधे पण जावं लागलं साहित्यिकांना.
लेडी चॅटर्लीज लव्हर हे पुस्तक एवढ्यातच म्हणजे १९६० सालपर्यंत बंदी घातलेलं पुस्तक होतं . या पुस्तकावर १८५७ चा ऑब्सिन पब्लिकेशन ऍक्ट खाली खटला भरण्यात आला होता. या पुस्तका मधे होतं तरी काय?? मी वाचलंय.. अजिबात काहीही आक्षेपार्ह वाटलं नाही मला.प्लॅटोनिक लव्ह वगैरे काही नसतं.प्रेम हे शेवटी शारिरीक पातळीवरच जाउन पोहोचतं असं लिहिलंय यामधे-.
हे पुस्तक मला तरी अतिशय उत्कटतेने लिहिलेली एका स्त्रीची अतृप्त भावनांची कहाणी वाटली. कॉनी चा नवरा लॉर्ड क्लिफोर्ड… एका युध्दामधे जातो- तो जातो तेंव्हा होणारा सेक्स्युअल भावनांचा कोंडमारा आणि ती वाट पहात असते तो परत येण्याची. तो जेंव्हा परत येतो तेंव्हा व्हिल चेअर वरच बसलेला!! अजिबात खालच्या शरीराची हालचाल करता येत नसते त्याला.
कॉनीच्या स्त्रीसुलभ आणि सेक्स्युअल भावना या सारख्या उफाळून येतात- त्यांची पूर्ती तर व्हायलाच हवी. नवऱ्यावर असलेलं प्रेम, त्याची ’ती’ असमर्थता, त्यातुन आलेलं वैफल्य आणि त्या मुळे उद्युक्त होणाऱ्या सेक्स्युअल भावनांची दमन करण्याचा प्रयत्न आणि नंतर मग पूर्ती करण्यासाठी तिने तिच्या नवऱ्याच्या मॅनेजर बरोबर केलेली शय्या सोबत -अशी सरळ धोपट कहाणी आहे. कॉनी ही व्याभीचारी नाही- तिचं आपल्या नवऱ्यावर प्रेम आहे अगदी मनापासून.. पण , परिस्थिती मुळे ती केवळ शरीरसूखा साठी नवऱ्याच्या मॅने्जर बरोबर लग्न बाह्य संबंध ठेवते.
जर तिचा नवरा व्हिल चेअर बाउंड झाला नसता, तर ती अशी वागली असती कां?? हा विचार बरेचदा वाचतांना मनात येतो..बऱ्याच लहान लहान प्रसंगातून अतिशय सुंदर रीतीने तिचा मॅनेजर बरोबरचा रोमान्स रंगवला आहे. डि एच लॉरेन्स यांचं हे पुस्तक लिहिलेलं हे पुस्तक एकदा तरी अवश्य वाचायलाच हवं .पुस्तकाची भाषा अप्रतिम आहे डीएच लॉरेन्सचं पुस्तक असल्यामुळे !! आता हे पुस्तक म्हणजे श्रृंगारिक कादंबरीतला एक मानदंड ठरावा असे आहे . या पुस्तकातल्या नायिकेचा तिरस्कार करावा की तीची कीव करावी – ह्या प्रश्नाचं उत्तर शोधता शोधताच हे पुस्तक संपत. एकदा आवर्जून वाचा..इथे लिंक दिलेली आहे डाउन लोड करायला.
स्त्री पुरुष संबंधाची उघडपणे केली गेलेली वर्णने आपल्या देशात अगदी फार पुरातन काळापासून चालत आली आहेत. वात्सायनाचे कामसुत्र म्हंटलं की फक्त ती ऍक्रोबॅटीक आसनंच आठवतात. पण खरंच तसं आहे का? कामसुत्रा मधे त्या व्यतिरिक्त खुप माहिती दिलेली आहे. आपण फक्त ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेऊन आपली मतं बनवतो- काम सुत्र म्हणजे ती चौर्यांशी आसनं इतकंच समजतो आपण पण तसं नाही. हे पुस्तक अतिशय सुंदर रितीने त्या काळातल्या वातावरणामधून वैवाहीक जिवन सुखी कसं असावं याची माहिती देणारं पुस्तक होतं. ह्या पुस्तकामध्ये आदर्श वैवाहीक जीवन कसं असावं याची माहिती दिलेली आहे .स्त्री ला काय आवडतं? पुरुषाने कसे वागावे? असे अनेक मुद्दे आहेत दिलेले. दुर्दैवाने आजही इतक्या सुंदर ग्रंथाकडे भारतामधे एक पोर्नोग्राफिक पुस्तक म्हणून पाहिलं जातं.इथे वाचा ते पुस्तक.
हे पुस्तक खरं तर या विषयावरचं सगळ्यात महत्वाचं पुस्तक ठरु शकतं . याच पुस्तकावरून बेतलेलं एक अरबी पुस्तक पण त्या काळी निघालं होतं त्याचं नाव होतं पर्फ्युम्ड गार्डन.वाचायचं असेल तर इथे आहे ते.. यावर जास्त काही लिहित नाही फक्त एकच आहे हे पुस्तक म्हणजे परस्त्रीला प्रेमात कसे पाडायचे याचे पाठ पढवतं.नवऱ्याच्या नकळत एखाद्या स्त्रीला प्रेमात कसं पाडायचं?? ( या अरबांची स्टाइल तेंव्हा पण तशीच होती. )मला वाटतं की पुस्तका पेक्षा फॅंटसी कडे वळणारे लेखन होते हे. १८५० च्या काळात अशी पुस्तकं छापण म्हणजे ्खूपच धैर्याचं काम होतं. ही पु्स्तकं कामोत्तेजक जरी नसलं, तरीही नैतीक मुल्यांना धक्का देणारं म्हणून हे पर्फ्युम्ड गार्डन तेंव्हा खुप गाजलं होतं. अशाच लेखनामुळे नैतीक अधःपतन होतं अशी कल्पना पण काही लॉर्डस लोकांनी हाउस ऑफ कॉमन्स मधे मांडून त्यावर बंदीची मागणी केली.पुढली बरीच वर्ष यावर बंदी घातली गेली होती .
सगळ्यात जास्त गाजलेलं पहिलं सेक्स बद्दल स्पष्ट पणे लिहिल्या गेलेलं एका वेश्येचं आत्मचरित्र म्हणजेच फॅनी हिल्स वुमन ऑफ प्लेझर!! १७४८ साली ही कादंबरी लिहिली गेली. जॉन क्विलंड हा लेखक होता या कादंबरीचा. अतिशय धीट विषय, उत्कृष्ट हाताळणी, आणि भावना चेतवणारं लिखाण म्हणून या कादंबरीचा उल्लेख करावा लागेल. फॅनी हिल्स म्हणजे आजकालची कहाणी फक्त लिहिल्या गेली १७४८ मधे.
एका गावाकडल्या मुलीला शहरात आणून कुंटणखान्यात आणून ठेवलं जातं. तिथे ती दररोजच स्त्री पुरुष संबंध पहाते ,आणि नकळत त्या बद्दल एक वेगळं आकर्षण निर्माण होतं तिच्या मनात.पुरुषाची भिती संपून जाते .एकदा भिती संपली की तिला असे संबंध हवे हवेसे वाटु लागतात. अगदी जो कोणी पहिला पुरुष येइल त्याबरोबर किंवा कोणाही बरोबर शैय्या सोबत करायची मानसिक तयारी होते तिचे.. नंतर तिचं चार्ल्स वर प्रेम बसून त्याच्या बरोबर पळून जाणं, चार्ल्सच्या वडिलांनी त्याला परदेशी पाठवून देणं.. आणि मग फॅनीचं केवळ स्वतःच्या सेक्स्युल निड्स पुर्ण करुन घेण्यासाठी फुल फ्लेज्ड प्रॉस्टीट्य़ुशन -सुरु करणं आणि येन केन प्रकारेण …. जाउ द्या. .. पुस्तक वाचायचं असेल तर.. इथे आहे ते! असं म्हणतात की त्या काळी स्त्रियांना लैगीक भावना फार दाखवणं अपेक्षित नव्हतं, कद्चित म्हणून एक स्त्री आपल्याला सेक्स आवडतो, आणि तो पुर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या पुरुषांशी शैय्या सोबत करते.. ही गोष्टच सर्व मान्य नव्हती. म्ह्णूनही असेल हे पुस्तक गाजलेलं. इतकी वर्ष बंदी असलेलं पुस्तक म्हणुन एकदा तरी वाचावं म्हणून मी डाउन लोड केलं पण पुर्ण वाचलं नाही.. अर्धवट वाचून सोडून दिलं.
दसऱ्या महायुध्दाच्या काळात , कोणी वॉल्टर हे काल्पनीक नांव घेउन एक माणुस आपला निरनिराळ्या १००० स्त्रियांबरोबरच्या सेक्स्युअल संबंधाची कहाणी लिहितो. माय सिक्रेट लाइफ या अतिशय पॉप्युलर पुस्तका मधे- आणि ते पण ११ खंडामध .इस १८५७ च्या कालावधीमधे असे स्पष्ट लिहिले गेलेले हे एकुलते एक अश्लील पुस्तक म्हणावे लागेल. खुप पॉप्युलर पुस्तक होतं ते.हलकं फुलकं, किंचित तोचतोपणा असलेलं हे पुस्तक आहे.. अर्थात तुम्ही जर आजच्या अव्हेलेबल असलेल्या साहित्याबद्दल बोलाल, तर हे पुस्तक एकदम मिळमिळीत वाटण्याची शक्यता आहे पण १८५७ च्या काळात ह्या पुस्तकामुळे किती वादळ उठलं असेल ते तुम्ही समजू शकता. हा वॉल्टर कोण होता ते कधिच समजलं नाही.या पुस्तकावर बऱ्याच देशात आणि खूप वर्ष बंदी होती. (ऑब्सिन ऍक्ट च्या अंतर्गत बंदी ). ते पुस्तक इथे आहे. आजकालच्या अश्लिलतेच्या मानदंडापुढे हे पुस्तक एकदम फूसकं वाटू शकतं- आणि कंटाळवाणं तसेच रिपिटेटिव्ह नेचरच.
एक पुस्तक होतं. १२० डेज ऑफ सोडोम. सेक्स फॅंटसी वर वाहिलेलं हे पुस्तक अतिशय बिभत्स म्हणता येइल असं पुस्तकात होतं. मार्किस नावाच्या फ्रेंच लेखकाने लिहिलेलं हे पुस्तक सॅडिझम वर लिहिलं होतं. हे पुस्तक वाचलं की किळस वाटते वाचतांना. यावरच एक चित्रपट पण काढला गेला होता- याच नावाने. याची लिंक मला सापडली पण मुद्दामच इथे देत नाही. १७व्या शतकात फ्रान्स मधे एका निर्जन भागातल्या पॅलेसमधे सरदार लोकं खून, वासना, बिभत्सता वागणूक, यांचा जो खेळ खेळतात त्याचं वर्णन आहे या पुस्तकामधे. १६ कुमारीका, ८ तरुण, आणि काही स्त्रियांना एका ठिकाणी डांबून ठेवले जाते. हे सरदार चार वेश्यांकडुन त्यांचे अनुभव ऐकतात आणि त्यांची उजळणी या तरुणींवर केली जाते.या मधे छळाची वर्णनं आहेत केलेली की वाचतांना घृणा यावी. मी तर हे पुस्तक वाचूच शकलो नाही.शेवटी प्रत्येकाचाच खून केला जातो. यु ट्युब वर काही क्लिप्स आहेत या चित्रपटाच्या. शोधा, हव्या असतील तर- मी देणार नाही लिंक्स किंवा पुस्तकाची पिडीएफ लोकेशन..
हेन्री मिलर नावाचा एक लेखक होऊन गेला. त्याने १९४० मधे एक ट्रॉपिक ऑफ कन्सर ही कादंबरी लि्हीली.अमेरिकेत ऑल टाइम फर्स्ट ५० बेस्ट नॉव्हेल्स मधे पण हिचा समावेश केला गेला आहे.
याच सुमारास डेल्टा ऑफ व्हिनस हा कथा संग्रह पण प्रकाशित करण्यात आला- लेखिका होती अनेस निन -मिलरची प्रेयसी!!!!. असं म्हणतात की प्रत्येक पान लिहीण्यासाठी लेखकाला त्या काळी एक डॉलर देण्यात आला होता. अट एकच होती, कादंबरी मधे इतर वर्णन, ्निसर्ग वगैरे अजिबात नसावे , फक्त सेक्स आणि सेक्स यावरच ही कादंबरी असावी. १९६७ मधे पेंग्विनने प्रकाशित केलेली हा कथा संग्रह मजेशिर आहे. या कथा संग्रहामुळे उत्तेजक लेखन करणारी पहिली लेखिका म्हणून तिला मान मिळाला.
त्या काळात जेंव्हा आपल्या भारता मधे आपण राघो कर्वेंवर खटला चालवत होतो, त्याच काळात जगात इतकं काही होऊन गेलं होतं. काही बाबतीत मागासलेलं असणं पण खूपच चांगलं असतं नाही??