सोशल मिडीयाचे महत्व या निवडणुकीत नक्कीच अधोरेखित झाले आहे. भाजपा ला जो मोठा निर्विवाद निर्भेळ विजय मिळाला त्या मागे सोशल मिडीयाचा मोठा हात आहे. सोशल मिडिया कोणा एका व्यक्तीने मोटिव्हेट केलेला नसतो,  कारण त्या मधे हजारो व्यक्ती आपणहून भाग घेतात. ” अच्छे दिन आने वाले है” म्हणून नरेंद्र मोदींनी दिलेली हाक अगदी प्रत्येक जनसामान्यांच्या हृदयापर्यंत पोहोचली, आणि जवळपास प्रत्येकच व्यक्ती नमो पंतप्रधान व्हावे या साठी आपणहून प्रचार करू लागली. नमो पंतप्रधान व्हावे म्हणून अगदी कोणीही नर्मदेतला गोटा जरी इलेक्शन मधे उभा केला असता तरी  निवडून आला असता .

सोशल मिडीया हा नेहेमीच ’कॉज ड्रिव्हन” असतो. एखादं कारण सापडलं, आणि ते भावलं, की सगळा सोशल मिडीया त्या कारणाला सपोर्ट करतो .अण्णा हजारे यांचे उदाहरण अगदी डोळ्यासमोर आहे . कॉंग्रेस सरकारच्या विरोधात अण्णा हजारेंच्या आंदोलनाला पण असाच पाठिंबा दिला गेला . असे चित्र उभे करण्यात आले, की आता भ्रष्टाचार संपणार- पण तसे होणे नव्हते. अगदी तशीच परिस्थिती या लोकसभेच्या इलेक्शनच्या दरम्यान झाली होती. महागाईचा भस्मासुर , भ्रष्टाचार सामान्य जनतेला जगणॆ असह्य करित होता- पेट्रोल, डिझल, कुकिंग गॅस चे भाव वाढ झाल्याने सामान्य जनतेच्या डोळ्यात अश्रू आले होते.

ते अश्रू आधीपासूनच डोळ्यांच्या कडांपर्यंत येऊन ठेपले होते, त्यांना फक्त वाहून निचरा व्हायला एक कारण हवे होते, ते कारण  पण मिळाले, आणि त्या अश्रूंनी आपण असहाय्य नाही, तर प्रत्येक वाहिलेल्या अश्रूच्या थेंबाची किंमत एकेका मताद्वारे वसूल केली. तरुणांना कोणी विश्वासात घेत नाही, त्यामुळे ” मला त्याचे काय? ” अशी मनोवृत्त्ती झालेली होती. ओबामाने जे अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या इलेक्शन च्या वेळेस केले, तेच भारतात नमो ब्रिगेड ने केले.तरुणांची अलिप्त रहाण्याची वृत्ती या इलेक्शन मधे एकदम बदललेली आढळली. तरूणांना पण राजकारणात इंटरेस्ट वाटु लागला. या ब्रिगेडचा एकच कॅप्टन होता, तो म्हणजे नमो.   प्रत्येक तरुणांच्याच मनात ” अच्छे दिन आयेंगे” चे स्फुलिंग पेटवले गेले.

कॉंग्रेस च्या राजवटील विरुद्ध, लोकांच्या मनात इतका द्वेषा निर्माण झाला होता, की त्या मुळे प्रत्येक तरूण त्वेषाने  नमो च्या बाजूने प्रचार करित होता. कुठलीही गोष्ट करतांना जर त्वेष मनात असेल तर ती पूर्णत्वास नक्कीच जाते, हीच गोष्ट पुन्हा सिद्ध झाली.

लोकशाही मधे आपले म्हणणे सामन्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विनोद हे एक उत्कृष्ट माध्यम आहे. नेहेमीच्या कंटाळवाण्या निरस जीवनात विनोद नक्कीच  चेहेऱ्यावर हसू आणतो.राजकीय नेत्यावर विनोदी कार्टून्स वगैरे पोस्ट केले जाण्यात अजिबात आक्षेप नाही, पण तो विनोद  विषारी नसावा, अपमान करणारा नसावा.   विनोद असा असावा, की वाचल्यावर किंवा व्यंगचित्र पाहिल्यावर आपोआप हसू यायला हवे, आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या बरोबर बसून पहातांना पण संकोच वाटू नये, तसेच  अगदी ज्या व्यक्तीवर विनोद केलेला आहे, तिला पण जर हसू आले, तर तो विनोद अगदी १०० नंबरी! एखाद्याचा अपमान करणारे फोटोशॉप केलेले विकृत  फोटो  म्हणजे विनोद नाही.  थोडक्यात पुर्वी तंबी दुराई ज्या प्रमाणे लोकसत्ता मधे लिहायचा – तसे विनोद म्हणतोय मी!  

सोशल मिडीया चा स्वतःवरचा ताबा निश्चितच वाखाणण्याजोगा होता. राहूलचे पप्पू म्हणून झालेले बारसे, हे म्हणजे एक  निर्भेळ नसलेला विनोद  होता. राहूलची प्रतिमा पप्पू म्हणून एकदम हुबेहुब रंगवली गेली. निरनिराळी व्यंग चित्रे पण शेअर केली गेली.  काही लोकांनी मात्र ताळतंत्र सोडून काही आक्षेपार्ह फोटोशॉप मधे केलेले फोटो  फेस बुक आणि व्हॉट्स ऍप वर शेअर केले . त्यापैकी काही फोटो पाहिल्यावर आपसूकच हसू येत होते, पण काही फोटो पहाताना मात्र किळस वाटत होती. 

फोटोशॉप केलेल्या फोटो मधे – नमो आणि सोनियाचा  ” तशा अवस्थेतला ”  फोटो, मनमोहन सिंग बरोबरचा सोनियाचा फोटो  वगैरे मात्र पहातांना मात्र तो फोटो बनवणाऱ्याच्या विकृत बुद्धीची कीव येत होती. असे किळसवाणे फोटो नेट वर शेअर करणे कायदेशीर पणे पण मान्य नाही, आणि त्या साठी तुम्हाला तुमच्या आयपी वरून पकडून शिक्षा पण होऊ शकते. एक आश्चर्य वाटले, की  लोकांना हे पण समजत नाही, की नमो चा तशा अवस्थेतला फोटो पोस्ट करून ते नमोचा पण अपमान करताहेत. ही गोष्ट बरेच दिवस मनात होती, आता पुन्हा इलेक्शन येणार आहेच, तेंव्हा सोशल मिडियाचा जपून वापर केला जावा अशी अपेक्षा आहे,  नाही तर कदाचित काही लोकांना जेल मधे जाण्याची वेळ येईल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel