राजाभाऊ बॅग उचलून गेले ऑफिसमधे, सुमाताई विचार करीत बसल्या होत्या.चेहेऱ्यावर चिंताग्रस्त भाव अगदी सहज ओळखू येत होते. रोहनला त्यांच्याकडे बघुन काय झालं असावं याचा अंदाज येत नव्हता.
रोहनने विचारले- काय झाले?
अरे स्वयंपाकवाल्या बाई आलेल्या नाहीत आज, आणि मला पण सांधेदुखी मूळॆ काहीच करता येत नाही.. सांग तुच काय करणार??
त्यात काय विशेष, मी तुम्हाला मदत करु? मला येतं सगळं करता...कपाळावरुन इस्त्री फिरवल्याप्रमाणे सुमाताईंच्या कपाळावरच्या आठ्या कमी झाल्या थोड्या, की तसं वाटलं रोहनला??
सुमाताईंनी मनातल्या मनात विचार केला, ” काय हरकत आहे थोडी मदत केली तर? इथे आपल्या घरीच तर रहाणार आहे, करेल थोडं काम..तसंही त्याला सवय आहे म्हणतोय कामाची. करेल थोडं काम दोन तिन दिवस. त्याचा इंटरव्ह्यु पण दोन दिवसानंतर आहे म्हणे.”
बरं… काय करता येतं रे तुला रोहन?
सगळा स्वयंपाक येतो करता. अगदी सगळं!!!
सुमाताईंचा चेहेरा उजळला. रोहनला घेउन त्या किचन मधे गेल्या. त्याला सगळं दाखवलं. म्हणजे जेवढं सुमाताईंना माहिती होतं तेवढंच..
रोहनने साधा आमटी भात बनवला, पण सुमाताई एकदम खुश. चला सोय झाली आपली
********************************************************************
सकाळची वेळ होती . चितळे ब्रेकफास्ट टेबलवर रोहन सोबत बसले होते. नेहेमी प्रमाणे सुमाताई बटर घेउन टोस्टला लावित होत्या. आज नेमकं लो फॅट बटर लावलं.. चितळ्यांनी मनातल्या मनात निश्वास सोडला आणि सुमाताईंनी दिलेला तो टोस्ट् आणि अंड्यातल्या पांढऱ्या बलकाचं ऑम्लेट समोर डीश मधे घेतलं.
रोहन तुझा इंटरव्ह्यु कुठे आहे रे?
रोहनने उत्तर दिलं की उद्या सकाळी ताज मधे आहे .
ताज मधे म्हंटल्यावर चितळ्यांना ताज मधे कुक किंवा बेल बॉय वगैरे म्हणून काहीतरी असेल असेच वाटले. काल रात्रीचा रोहनचा स्वयंपाक त्यांनी पण चाखला होताच. त्यामुळे कदाचित हा तिथे कुक म्हणुनच जात असावा असा विचार आला त्यांच्या मनात. पण सरळ विचारलं तर वाईट दिसतं, म्हणुन काही विचारलं नाही.
रोहनच्या राजबिंड्या रुपाकडे बघुन त्यांना थोड वाईट वाटलं , पण त्याना दुर्लक्ष करणं च योग्य वाटलं , उगिच एखाद्याचा अपमान कशाला करायचा?? पण मित्राच्या मुलासाठी काही करता आलं तर बरं होईल असंही वाटत होतं चितळ्यांना !*********************************************************************************
संध्याकाळचे पाच वाजले होते, रीना बाहेर निघायला तयार झाली होती. सुमाताईंनी विचारलं कुठे जाते आहेस ?? अगं सिनेमाला जायचंय रात्रीच्या जवळच्याच मॉल मधे जाणाराय आम्ही सगळे. पैसे आहेत कां??? की हवे आहेत गं? सुमाताईंनी विचारलं.
रोहन सोफ्यावर अभ्यासाचं वाचत बसला होता, त्याला वाटत होतं की ’सात च्या आत घरात ’संस्कृती आपली आणि ही तर सातवाजता बाहेर पडते. मुंबईचं आयुष्य हे असंच असावं..
रीना बाहेर पडली आणि टॅक्सी करुन सरळ मॉल समोर गेली. सगळा गृप उभा होता. तिला वाटलं की साडेसातचा शो आहे , पण सिनेमा पहायचा प्रोग्राम होता रात्री दहाचा – नाईट शो चा. तो पर्यंत एक नविन हॉटेल निघालं आहे तिकडे जायची टूम निघाली. खाणं झाल्यावर सिनेमा पाहून रात्री साडेअकरा वाजता सिनेमा संपल्यावर ती घरी परत आली. सुमाताईंचा पारा चढलेला होता. रात्री १२ वाजता म्हणजे काय यायची वेळ आहे आहे कां ?? सिनेमाला तु पाच वाजता गेली होतीस. रात्री ९ पर्यंत तु घरी यायला हवं होतं… इतका वेळ कां लागला तुला? आणि बराच वेळ त्या रागावत होत्या रीनाला.
रीनाला रोहन घरात वरच्या खोलीत असतांना आईचं रागावणं इन्सल्टींग वाट्त होतं – त्याला ऐकायला जाईल नां?? ममा पण ना .. एकदमच ही आहे……… पण चुक तर झाली होतीच.. ऐकुन घेणं भाग होतंच. रोहन गेस्ट रुम मधे मान घालुन उघडे असलेले कान बंद करुन आपलं लक्षंच नाही असं दाखवत पुस्तकात तोंड खुपसुन बसला होता.
*******************
रीना आपल्या खोलीत शिरली. ति काही न बोलता कपडे चेंज न करता सरळ पलंगावर आडवी पडून हमसुन हमसून रडू लागली.
आज त्या हॉटेलमधे सगळ्यांनी मिळून हुक्का मागवला होता. गम्मत म्हणून ओढायला काय हरकत आहे? सगळ्यांनी खूप आग्रह पण केला होता, तरीही तिने मात्र त्याला अजिबात हात लावला नव्हता.
हॉटॆलमधल्या त्या हुक्का प्रकरणानंतर आपण या गृप मधे आलोय ही चुक तर नाही ? असे विचार सारखे डोक्यात येत होते. आज हुक्का, उद्या सिगरेट, किंवा नशा असलेली वस्तू….. काहीही होऊ शकतं. स्पाइक्ड ड्रिंक्स च्या न्युज तर अगदी कॉमन झाल्या होत्या. त्यामुळे कुठेही काहीही घेतांना सेफ वाटत नव्हतं.
सिनेमा पहातांना पण गौरवने आणुन दिलेला पेप्सी चा ग्लास तिने न पिता तसाच ठेवला होता. गौरव च्या शेजारी बसल्यावर त्याचा येणारा सिगरेटचा वास नकोसा होत होता. सिगरेट आणि आफ्टरशेव्ह यांचा मिक्स वास सेक्सी असतो असं ऐकलं होतं, पण ते आज चुकीचं आहे हे समजलं. पुन्हा या गृप मधे यायचं नाही हे मनोमन निश्चित केलं. त्याचा होणारा सहेतुक स्पर्श पण नकोसा वाटत होता.अंग चोरून बसली होती ती सिनेमा संपेपर्यंत. सगळे मित्र मैत्रीणी बरोबर आहेत म्हणुन तिने सिनेमा पुर्ण पाहिला आणि रात्री घरी यायला निघाली. घरी पोहोचल्यावर आई रागावेलच याची खात्री होतीच. पण आता चूक केली आहेच तर भोगावे लागेलच.. !!
*******************************************
रात्री एक वाजता रोहनला जाग आली आणि तो पाणी प्यायला म्हणून किचन कडे निघाला . जातांना रस्त्यामधे रीनाच्या खोलीचे दार उघडे होते. ती कपडे वगैरे न बदलता पलंगावर आडवी पडुन अजूनही रडतच होती.टेबलावर फेकलेली तिची पर्स, त्यातुन बाहेर पडलेलं मेकपचं सामान.. टिशर्ट थोडा वर सरकलेला. .. काय करावं?? रोहनला काय करावं ते सुचत नव्हतं , त्या खोली मधे जावं आणि तिची समजूत काढावी की आपला काय संबंध म्हणून दुर्लक्ष करुन पुढे निघुन जावं??अजून दोनच दिवस तर रहायचय इथे आपल्याला.
शेवटी माणूसकीचा विजय झाला, रोहन तिच्या खोलीत शिरला आणि पलंगाशेजारी अवघडून उभा राहिला. पलंगावर तिच्या शेजारी बसणं त्याला संयुक्तीक वाटत नव्हतं. मुलिंना जात्याच एक सिक्स्थ सेन्स असतो . रीना पटकन उठुन आपले कपडे सारखे करु लागली. रोहनला काय बोलावं तेच सुचेना..
रीना आता मात्र थोडी शांत झाली होती एक परका पुरुष आपल्या खोलीत ही भावनाच तिला शांत करण्यास पुरेशी होती. ती त्याच्या कडे पहात होती.. रोहनच्या नजरेत एक सपोर्टिव्ह भावना न सांगता दिसत होती. ती उठुन उभी राहिली आणि बाथरुम कडे निघाली तोंडावर पाणी मारुन परत येई पर्यंत रोहन आपल्या रुम कडे निघुन गेलेला होता आणि तीला उगीच हसु आलं.. दार बंद केलं आणि ती कपडे चेंज करायला निघाली.
**********************************************************************************
आज मात्र सुमाताईंना खूप टेन्शन असतं. आमटी भात , किंवा भाजी पोळी बनवणे इतपत तर ठिक आहे, पण दुपारच्या किटी पार्टी साठी स्नॅक्स बनवणे जमेल का त्याला?? त्या किचन मधे शिरतात की रोहनने काय करुन ठेवले आहे ते बघायला.
रोहन तर तिथे नव्हता पण दोन भांडी मात्र व्यवस्थित झाकुन ठेवलेली होती. किटी पार्टी ठरल्याप्रमाणे झाली. सुमाताईंचा जीव मात्र एकदम भांड्यात पडला. रोहनला तर यामधे काहीच माहिती नव्हतं, तो वर रुमवर बसुन आपला अभ्यास करीत होता. उद्या सकाळी इंटरव्ह्यु !! टेन्शन आलं होतं डोक्यावर! जमेल कां आपल्याला? रिटन एक्झाम तर पास झालो आपण. लोकं म्हणतात मराठी मुलं का नाहीत या क्षेत्रात? जमेल का आपल्याला उत्तरं देणं? रात्र भर डोळ्याला डोळा लागला नाही रोहनचा. सकाळी ५ वाजताच पुन्हा अभ्यासाला बसला.
गेल्या दोन दिवसांच्या दिनचर्ये प्रमाणे , तो ब्रेकफास्टला टेबल वर जाउन बसला. रीना , आणि चितळे दोघंही तिथेच होते- रोहनची वाट पहात. रोहन ओशाळवाणं हसला. सॉरी म्हणून त्यांच्या सोबत बसला. सगळे जण शांत होते. शेवटी चितळे म्हणाले की माझ्या शुभेच्छा रे तुला.. काही मदत लागली तर सांग मला. नुसतं स्माइल देऊन त्याने टाय समोर केला, मला नॉट बांधून द्या म्हणून.. आणि सगळे एकदम जोरात हसायला लागतात काल रात्रीच्या टेन्शनचा मागमुस पण शिल्लक राहिला नव्हता….
चितळे म्हणाले, ’काय रे किती वाजता आहे तुझा इंटरव्ह्यु?’
“एक वाजता.. ” रोहनने उत्त्तर दिलं.
कसा जाशिल?
लोकलने जाईन म्हणतोय. थोडा चाचरतच म्हणाला तो. लोकलची गर्दी बघुन त्यात आपल्याला चढता येईल की नाही याची शंका होतीच त्याला. ही गोष्ट चितळ्यांच्या लक्षात आली. त्यांनी म्हंट्लं, रीना, अगं तुला जायचं होतं ना मरीन लाइन्सला- प्रोजेक्ट वर काम करायला?? तूच का नेत नाहीस याला कारने तुझ्या सोबत? मित्राच्या मुलाची किमान एवढी तरी मदत करावी ….
रीना आज घरीच होती. ’ ठिक आहे, माझं पण काम होऊन जाईल, जातांना ह्याला पण घेऊन जाईन मी. आणि येतांना परत पण घेउन येईन. रोहनचा चेहेरा एकदम उल्हासित झाला. मुंबई बाहेर रहाणाऱ्या माणसाला जर लोकल चा प्रवास टळणार आहे असे सांगितले तर त्याला किती आनंद होईल तेवढाच आनंद झाला होता रोहनला पण..
*********************************************************
रोहनच्या कालच्या सेंटिमेंटल सपोर्ट साठी त्याला थॅंक्स म्हणायलाच हवे. घरी तर तो नेहेमी पुस्तकातच बुडलेला असतो, काय करावं बर?? त्याला कार ने नेते म्हंटलं तर तो कदाचित नाही म्हणेल, पण पप्पांच्या समोर तो नाही म्हणणार नाही. म्हणूनच ब्रेकफास्टच्या वेळेस पप्पांनी त्याला नेण्याचा विषय काढला. त्याने जेंव्हा आनंदाने होकार दिला, तेंव्हा तिला खूप खूप बरं वाटलं. “
थोडं लवकरच निघू या. म्हणजे ट्रॅफिकचा इशु रहाणार नाही! रोहन न बोलता तयार झाला. त्याने सकाळी बांधलेला टाय थोडा वाकडा लागला होता. नॉट थोडी वाकडी दिसत होती.
तिने कार सुरु केली , टाय बद्दल सांगावं का?? तिने आपणच पुढे होऊन ती नॉट सरळ करुन दिली. आणि दोघंही निघाले ताजच्या दिशेने. एकही अक्षर न बोलता कार चालवत होती रीना. रोहन रस्त्यावरची गम्मत बघत होता.त्याच्या चेहेऱ्यावरचा टेन्शन न सांगता कळत होतं. त्याचं रीना कडे लक्ष पण नव्हतं. इंटर्व्ह्युच्या टेन्शनचा परीणाम त्याच्या चेहेऱ्यावर दिसत होता.
तुमच्यात बोलत नाहीत कां मुलींशी??
अं..??? नाही तसं नाही गं.. इंटरव्ह्यु द्यायचाय नां..म्हणुन थोडं टेन्शन आहे झालं
हं..!! मग त्यात काय एवढं? नौकरी मिळेल नां.. नाहीतर दुसरीकडे कुठेतरी. पण एक विचारू का? तु मराठी मधे एम ए का केलंस?? त्या ऐवजी एखाद्या प्रोफेशनल विषयात का नाही ग्रॅज्युएशन केलं म्हणजे चांगली नौकरी मिळाली असती?
केविलवाणं हसला रोहन.. काही न बोलता. पण चेहेऱ्यावरचे भाव मात्र अजूनही नॉर्मल आले नव्हते. तिने त्याच्याकडे आज पहिल्यांदा निरखून पाहिलं. तीला वाटलं की आपण चुकीचा प्रश्न विचारलाय त्याला. तिने लगेच विषय बदलला.
तेवढ्यात कार ताज समोर पोहोचली. कार थांबवली , आणि रोहन खाली उतरला. किंचीत बावरलेला. मागे वळून पाहिलं तर रीना अजूनही तिथेच उभी होती कार ची खिडकी उघडून तिने त्याला थम्स अप ची साईन केली. थोडा हसला तो.
त्या पंचतारांकीत हॉटेलच्या दारामधे शिरल्यावर तिथला गारवा अगदी हाडापर्यंत स्पर्शुन गेला.
*****************************************************************************
सुमाताई एकट्याच घरात बसल्या होत्या. चितळे गेले होते ऑफिसला. कालच्या रीनाच्या रात्री उशिरा येण्याच्या प्रसंगामुळे त्यांना अचानकपणे रीनाची काळजी वाटू लागली. आता लग्नासाठी मुलं पहायला सुरु करावं लागेल. एकुलती एक मुलगी म्हणजे खरंच किती काळजी असते नाही?
रोहीणीमधे जाउन नांव नोंदवावे लागेल एकदा. उद्याच जाउ या. मुलगा शक्यतो भारतातला असला, तर बरं.. कमीत कमी नजरेसमोर तरी राहिल पोर!