हैद्राबाद म्हणजे तर खवय्यांची राजधानी. व्हेज – नॉन व्हेज खूप उत्तम क्वालिटीचं मिळतं इथे. मग ते अगदी रस्त्यावरच्या गाडीवरचे दोसे असो किंवा हाय क्लास हॉटेल मधले कबाब- बिर्याणी असो. चवीशी कुठेच दगाबाजी केलेली नसते.
आमच्या कंपनी गेस्ट हाउस समोरच एक दोसा इडली ची गाडी लागायची. रोज सकाळी समोरून जाताना त्या माणसाला सफाईने दोसा टाकतांना बघायचो म्हणून एक दिवस थांबलो , आणि नंतर मात्र दररोज न चुकता हजेरी दिली ह्याच गाडीला. इथे स्ट्रीट फूड मधे उपमा बटर दोसा नावाचा प्रकार मिळतो. तव्यावर दोसा टाकल्यावर त्यावर चांगलं ३० ग्राम अमूल बटर, पातळ केलेला उपमा आणि चटणी लावून त्याला अगदी खरपूस होई पर्यंत तव्यावर रोस्ट केले जाते. इतक्या जास्त प्रमाणात घातलेल्या अमुल बटर मुळे वरून कुरकुरीत पण आतून मात्र थोडा नरम असा दोसा तुमच्या समोर खास हैद्राबादी आल्याची चटणी आणि खोबऱ्याची चटणी या सोबत हातात दिला जातो. पहिला घास तोंडात घातला,जिभेवर चवीचे युद्ध सुरु होते. आल्याच्या आंबटगोड चटणीचा फणका आणि दोसा कॉम्बीनेशन अफलातून करतो. आणि भैय्या एक और दोसा बनाओ अशी ऑर्डर आपसूकच दिली जाते.
स्ट्रिट फूड मधे केवळ हा एकच प्रकार नाही, तर गरमागरम वाफेभरली लुसलुशीत इडली चटणी तुमच्या समोर त्या भांड्य़ातून काढून वर चटणी घालून मिळते अर्थात थोडा वेळ थांबायची तयारी असेल तर तुमच्या समोर गरम कुरकुरीत मेदू वडा तळून पण मिळतो. इकडे हल्ली तवा इडली आणि तवा वडा हा प्रकार बरेच लोकं आवडीने खाताना दिसले, म्हणून एक प्लेट ऑर्डर केली होती. भरपूर बटर मधे तव्यावर कांदा टोमॅटो घालून चांगलं फ्राय करून त्या मधे इडली , किंवा वडा, तवा रोस्ट केला जातो. सोबतच नेहेमीची हैद्राबादी मिळगी पुडी प्रमाणे असणारी गनपावडर चटणी पण तो घालतो. मला फारसा हा प्रकार आवडला नाही
हैद्राबादला टूरला जातोय म्हटल्यावर बहुतेक ९० टक्के लोकं, अरे पॅराडाइज मधे बिर्याणी खायला नक्की जा.. हे हमखास सांगतात. जवळपास साधारण ६० वर्षाची परंपरा असलेले हे पॅराडाइज म्हणजे एक मोस्ट हॅपनिंग प्लेस आहे हैद्राबादचे. ह्यांच्या हॉल ऑफ फेम मधे एक फोटो लावलाय, तो शेअर केलाय बघा इथे. त्या मधे सलमान पासून, सचिन तेंडूलकर ते राहूल गांधी पर्यंत आणि इतरही सगळी नेते/ सिनेमा कलाकार हिरो हिरोइन्स इथे हजेरी लावून गेल्याचे दिसते. ह्या हॉटेल ला आजपर्यंत बरेचदा बेस्ट बिर्याणी अवार्ड, टाइम्स बेस्ट फूड अवार्ड आणि बेस्ट हलीम बिर्याणी अवार्ड असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अर्थात त्या पुरस्कारांच्या मुळे हॉटेल ची किंमत नाही, तर हॉटेल मुळे पुरस्कारांचा मान वाढलाय . ह्या हॉटेल ची स्पेशालिटी म्हणजे बिर्याणी पण इथले कबाब सुद्धा अप्रतिम असतात.
कबाब म्हणजे माझा जीव की प्राण. व्यवस्थित बनवलेले सिख कबाब असतील, तर त्या पुढे जगातले इतर कुठलाही पदार्थ झक मारतील. कबाब बनवण्याची पण एक कला आहे . कबाब म्हणजे कसा, तर आतून मस्त पैकी मॉइस्ट असायला हवा, आणि त्याच सोबत तो व्यवस्थित शिजलेला पण असावा. कबाब कसा बनेल ते तंदूर वर अवलंबून असते, फार गरम तंदूर असेल तर कबाब चा वरचा पोर्शन जळल्या सारखा होतो- मॉइस्चर निघून जातं, आणि चव एकदम वाईट लागते. तंदूर थंड असेल तर आतला पोर्शन कचवट रहातो, पण इथला कबाब मात्र अगदी व्यवस्थित , वरून क्रिस्पी आणि आतून मॉइस्ट.. कबाब चा एक तुकडा , सोबतच्या हिरव्या पुदीन्याची चटणी लाऊन जिभेवर ठेवयचा आणि सोबत दिलेले क्रिस्पी आणि फ्रेश सॅलड पण सोबत तोंडात भरायचे..हा कबाब म्हणजे एक टोटल सॅटिस्फॅक्शन.चव ही पदार्थात नसते, तर ती आपल्या मनात असते … आणि इथले कबाब अगदी माझ्या मनातल्या चवीशी जुळणारे.
वेटर ने कबाब आणि बिर्याणी पण एकदमच आणून समोर ठेवली होती. चिकन बिर्याणी म्हणजे चिकन मसाला मधे भात शिजवलेला नाही, तर अगदी खास हैद्राबादी स्टाइल ने लेअर्ड बिर्याणी शिजवली जाते. बिर्याणी मधे भात अगदी रेशमासारखा मऊ,पण एकदम मोकळा शिजवलेला , त्या भाताच्या आडून चिकनचा लेग पिस, मला उचल , मला उचल म्हणून खुणावत होता.शेजारी दोन कबाबचे पिसेस..इथल्या बिर्याणीची एक खासीयत म्हणजे मसाल्यामधे केशराचा केलेला मुबलक वापर. केशराचा फ्लेवर प्रामुख्याने खातांना, इतर फ्लेवर्स बरोबर असूनही वेगळा जाणवतो. इथली बिर्याणी तिखट नसते, कदाचित इंटरनॅशनल क्राउड येतो म्हणून तिखटपणा कमी केला की काय असे वाटते. पण बिर्याणी मसाला थोडा जास्त तिखट चालला असता.
बिर्याणी सोबत मिरची का सालन, आणि रायता दिलेला असतो, पण खरं सांगायचं तर त्या सोबत कशाचीच गरज भासत नाही. मिरची का सालन हा एक खास हैद्राबादी प्रकार. बिर्याणी सोबत तर हा हवाच. तिळाच्या कुटाच्या रश्शात केलेली हिरव्या मिरच्यांची करी म्हणजे हे मिरची का सालन. किंचित कोकम पण घातलेले असल्याने त्या ग्रेवी ला एक घरगुती टेस्ट जाणवते.
हैद्राबादचे रायलसीमा रुचिलू म्हणजे एक ऑथेंटीक आंध्रा स्टाइल फूड मिळण्याचे ठिकाण.या हॉटेल मधे जायचे तर समोर जे काही येईल, ते तिखट असेल ही गोष्ट लक्षात ठेऊन आत पाऊल ठेवायचं.. आणि थोडा “मिर्ची कम डालना” असे वेटरला सांगून त्या डिशची मजा खराब करायची नाही. आम्ही दुपारी गेलो होतो. या हॉटेल च्या पण बऱ्याच शाखा आहेत, एक लकडी का पूल आणि दुसरी हिमायत नगरची मला माहिती आहे. चौथ्या मजल्यावर असलेले एक साधारण से हॉटेल असावे असा फिल येतो. फर्निचर अगदी साधारण, पण मेन्यु कार्ड उघडल्यावर लक्षात येतं की हे हैद्राबादच्या मानाने ओव्हर प्राइस्ड आहे.
वेटरला विचारले की स्पेशल क्या है? तो देसी मूर्गी की बिर्यानी हे नाव त्याने तेलगू मधे सांगितले :) तर एक बिर्याणी आणि साईड डीश म्हणून चिकन -काहीतरी आंध्रा नाव होतं, कढीपत्ता वगैरे घालून मॅरिनेट केलेले चिकनचे पिसेस डिप फ्राय केलेले असावे, आणि लकीली ते वातड नव्हते. एक तुकडा तोंडात घातल्याबरोबर जाणवले की देशी चिकन ते देशी चिकनच! ब्रॉयलर ला त्याची सर नाही, थोडं फ्लेश कमी असतं, पण जे असतं ते एकदम चवदार… .‘इथली बिर्याणी पण खूप छान होती. पण चिकन स्किनिंग केलेले नव्हते, मला स्किन आवड्त नाही फारशी ( फॅट फोबिया म्हणा हवं तर!) बिर्याणी मधे वापरलेला मसाला थोडा तिखटाकडे झुकणारा, पण ऑथेंटीक आंध्रा स्टाइल. मजा आली. साइड डीश म्हणून घेतलेले सोबतचे चिकन पण छान होते. दोन्ही डिश कशा संपल्या हेच समजले नाही. या हॉटेल मधे बिर्याणी ची क्वांटीटी खूप कमी होती. म्हणजे पॅराडाइज मधे एक बिर्याणी दोघांना पुरुन उरते, इथली एकाला पण पुरेशी नव्हती. पण बिर्याणीच्या चवी समोर हे सगळे निगेटिव्ह पॉईंट्स माफ !!! रोहन सांगत होता की इथे रॅबिट करी छान मिळते, पण फॅट्स च्या भितीने टाळली. कदाचित पुढल्या वेळेस नक्की!
हे सगळं जरी झालं तरी पण आपल्या घरच्या वरण भात आणि वर भरपूर तूप…. त्याची सर कशालाच नाही, आणि ती आठवण झाली की मग मात्र एखादी खाणावळ शोधावी लागते., अर्थात महाराष्ट्रात पण मराठी थाली मिळत नाही, मग ती इथे आंध्रात तरी कशी मिळणार?? मग मात्र एखाद्या साउथ इंडीयन मिल्स वाल्या रेस्टॉरंट कडे पाय आपसूकच वळतात, आणि समोरच्या भाताच्या ढिगाऱ्यावर क्रमाक्रमाने , चटणी, लोणचं, भाजी, सांबार, रसम, आणि दहया सोबत रिचवल्या जातो.
इती लेखन सीमा