इथे एक झेंडा लावलेला आहे या पोस्ट शेजारी . तुम्हाला माहिती आहे का तो झेंडा कुणाचा आहे ते? तुम्हाला माहिती असायलाच हवा, जर तुम्ही भारतीय असाल तर. अहो आपण सगळे जण हा धर्म पाळतो. आपल्या धर्माच्या सर्वोच्च पीठाचा झेंडा आहे हा. ह्या झेंड्याचं महत्त्व जर तुम्ही भारतीय असून जाणत नसाल, तर तुमचे भारतीय होणे वाया गेले असे म्हणावे लागेल. :) ( हलके घेणे) असो तर हा झेंडा आहे -बीसीसीआय चा.
मॅच फिक्सिंग, स्पॉट फिक्सिंग हे काही नवीन नाही. वर्षानुवर्ष हे घडतंय. पूर्वी पण घडलंय, आजही घडतंय. त्यात नवीन काय? पण आज जेंव्हा ही बातमी वाचली, आणि बिसीसी आयच्या अधिकाऱ्यांचे टिव्हीवरचे इंटरव्ह्यू पाहिले, तेंव्हा मात्र “माझी सटकली” आणि म्हणून हा लेख. मी पण तुमच्यासारखाच एक काळी क्रिकेट वर प्रेम करणारा, मॅचेस फॉलो करणारा एक क्रिकेटवेडा, पण हल्ली मात्र अजिबात मॅच फॉलो करत नाही. जेंव्हा अझरुद्दीन ( माझा फेवरेट प्लेअर होता तो ) फिक्सिंग मधे पकडला गेला तेंव्हापासून माझा इंटरेस्ट कमी झाला. तसा सचिन आणि राहूल हे दोघं आहेत आवडीच्या प्लेअर्स पैकी, तरी पण…..
भारताच्या क्रिकेट विश्वात बिसीसीआय चे स्थान मोठे आहे. ही संस्था स्वतःला स्वायत्त संस्था म्हणवते . बिसीसीआय चे क्रिकेट च्या खेळा मधून , जाहिराती मधून करोडो रुपयांचे उत्पन्न आहे , आणि म्हणूनच असेल की , बरेच राजकीय नेते पण या संस्थेकडे स्वतःला क्रिकेटचा “क्री” पण येत नसतांना आकर्षित झाले आहेत/होत असतात. शरद पवारांना पण या मधे इंटरेस्ट होताच :) बिसीसीआय चा स्वतःचा ध्वज. लोगो – आहे , जो क्रिकेट पटू ड्रेस वर मिरवतांना
दिसतात. भारतीय टीम चा ड्रेस पण निळा आहे, कारण तो पण बीसीसीआय च्या झेंड्याचा रंग आहे म्हणून!
फार पूर्वी एकदा एका बिसीसीआय च्या अधिकाऱ्याने तोडलेले तारे वाचले होते, म्हणत होता, की क्रिकेट खेळाडू जेंव्हा बाहेर खेळायला बीसीसीआय तर्फे पाठवले जातात, तेंव्हा ते भारताचे प्रतिनिधित्व करत नसतात, तर “बीसीसीआय” चे करीत असतात.अशी निर्लज्जा सारखी कॉमेंट वाचली आणि तेंव्हा तर जाम चीड आली होती. मला आणि इतरही भारतियांना (जरी माहिती असलं की बीसीसीआय चा संघ आहे ) तरी मनातून वाटत असतं की जो संघ खेळायला जातो तो भारताचाच असतो आणि, म्हणूनच भारतीय लोकं त्यांच्यावर प्रेम करतात .काही खेळाडूंना देवाप्रमाणे पूजा करतात.
जी मॅच होते, ती भारत विरुद्ध पाकिस्तान, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी असते. बिसीसीआय विरुद्ध पाकिस्तान नसते. बीसीसीआय ला महत्व आहे ते केवळ भारतीय ऑफीशिअल संघ म्हणून समजल्या जाणाऱ्या संघा मुळे . मॅच सुरु असतांना मैदानावर सचिनने सिक्स मारली, हरभजनने विकेट काढली, द्रविड ने सेंच्युरी मारली की भारताचा तिरंगा झेंडा फडकवला जातो, तुमचा बीसीसीआय चा झेंडा नाही. मॅच पहायला जाणारे लोकं आपल्या चेहेऱ्यावर भारताचा झेंडा रंगवतात, बीसीसीआय चा नाही. टींमचा विजय हा भारताचा विजय असतो बीसीसीआय चा नाही . भारत पाकिस्तान मॅच जिंकली की भारताचा विजय झाल्याचा आनंद फटाके उडवून साजरा करतात- बीसीसीआय चा नाही! वर्ल्ड कप हा भारत जिंकतो, सगळी कडे म्हणजे पेपर, टीव्ही वर भारताने वर्ल्ड कप जिंकला ही बातमी असते, बीसीसीआय ने नाही! ही गोष्ट त्यांनाही माहिती आहेच, पण “येडा बनके पेडा खानेका काम” बरोबर करते बीसीसीआय.
आणि अशीही पुस्ती जोडली जाते की बीसीसीआय या संस्थेला ती सरकारी अखत्यारीत येत नसल्याने जे काही करायचं असेल ते ही संस्था करू शकते, आणि त्यांनी तसे का केले याचे उत्तर जनतेला किंवा सरकारला देण्यासाठी ते बांधील नाहीत. तुम्ही यांना ’माहितीच्या अधिकारा ’खाली पण एकही प्रश्न विचारू शकत नाही. क्रिकेटच्या चार तासाच्या आयपीएल च्या मॅचचे तिकीट हे ७५० ते २५००० पर्यंत असते , ते का ?? इतके जास्त तिकिटं ठेवण्याचे कारण काय? हे विचारण्याचा पण कोणालाच अधिकार नाही.
आता समजा उद्या श्रीसंत किंवा ते दोन चंगूमंगू प्लेअर्स पकडले गेले, त्यांना न्यायालयाने दोषी ठरवून दिलेली शिक्षा भोगून ते बाहेर आल्यावर बीसीसीआय त्यांच्यावर आजीवन बंदी घालायची की काही वर्षासाठी याचा निर्णय घेऊ शकते. कोर्टाने जरी दोषी ठरवले, पण जर बीसीसीआय च्या स्वतःच्या शोध समितीने यांना निर्दोष म्हटले, तर हे सगळे कदाचित पुन्हा भारताकडून खेळतांना दिसतील.
ज्या देशात क्रिकेट हा धर्म समजला जातो त्या देशात श्रीसंत आणि त्या दोन चंगूमंगू चे वागणे हे राष्ट्रीय शोक व्यक्त करण्याच्या लेव्हलचे आहे आणि म्हणूनच ते नॅशनल शेम मधे मोडते.
पैशाचा भ्रष्टाचार समजा देशहिताच्या आड येत असेल तर? बीसीसीआय ची टीम ही भारतीय टीम म्हणून ओळखली जाते, तेंव्हा या संस्थेवर काही तरी अंकुश असायला हवा की नाही? तसेच ह्या संस्थेला स्वायत्त संस्था म्हणून राहू देणे कितपत योग्य आहे? उत्तर तुम्हीच शोधायचं आहे. ह्या प्रश्ना वरच हा लेख संपवतो.