एका स्त्री च्या अब्रूची किंमत किती असेल हो ? मग ती स्त्री श्रीमंत, गरीब , भिकारी अगदी कोणीही असू शकते.किती असेल किंमत?? विचित्र वाटतोय का प्रश्न? कदाचित असेलही, कारण लिहितांना पण मला थोडं अवघडल्यासारखं झालं होतं. इथे अब्रू म्हणजे हिंदी सिनेमात जेंव्हा एखादी हिरोईन “मेरी इज्जत लुट ली जज साब इसी कमिनेने” म्हणते नां ती अब्रू म्हणतोय मी. आज सकाळी टाइम्स ऑफ इंडीया उघडला आणि एका बातमीने लक्ष वेधून घेतले. एका कंडक्टरला बलात्काराच्या गुन्ह्याला बद्दल फक्त ६००० रुपये शिक्षा सुनावण्यात आली . एका मुलीवर बलात्कार केला जातो, आणि तिच्या अब्रू ची किंमत कोर्ट फक्त सहा हजार ठरवतं.

काही दिवसापूर्वी एका केसचा निकाल पेपर मधे वाचला होता. त्या मधे कोर्टाने निकाल दिला होता की ज्या माणसाने बलात्कार केला त्या माणसावर त्याचे म्हातारे आईवडील अवलंबून आहेत, म्हणून त्याला जेल मधे न टाकता ५०००० रुपयांचा दंड इतकी शिक्षा करण्यात येत आहे.

वर दिलेल्या दोन केसेस फक्त नमुन्यादाखल लिहील्या आहेत. वरच्या दोन्ही निकालावर काही भाष्य करणे हा कोर्टाचा अपमान होऊ शकतो, म्हणून फक्त इतकंच म्हणतो की कोर्टाच्या दृष्टीने एका स्त्री च्या अब्रु ची किंमत ही साडे सात ते पन्नास हजार रुपये !!!

हे वाचल्यावर कदाचित थोडी असहाय्यता, थोडी चिड , थोडा संताप अशा सगळ्या संमिश्र भावना मनात येतील. मागच्या आठवड्यात एका ७४ वर्षाच्या गृहस्थाने दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांची चित्र फित बनवल्याचे वाचण्यात आले . ही बातमी जवळपास तीन दिवस दररोज येत होती. अशा तऱ्हेने की जणू काही हा जगातला पहिला आणि शेवटचा बलात्कार असावा . तो थेरडा तर सिरियल रेपीस्ट होता. त्याच्या कडे बऱ्याच सिडी सापडल्या. असो मुद्दा तो नाही. बलात्काराच्या केस मधे वृत्तपत्राच्या बातमीदारांच्या लेखणीला विशेष धार येते , आणि तोच तो विषय पुन्हा पुन्हा लोकांसमोर मांडला जात असतो- कारण लोकांनाही तेच वाचायला आवडतं.

बलात्कारा बद्दल पुर्वी एक लेख लिहिला होता “ बलात्काराष्ट्र” म्हणून. त्यात बरेच मुद्दे आले आहेत, म्हणून आता पुन्हा तेच ते लिहित नाही.आपण भारतीय लोकं पण थोडे विचित्रंच आहोत. ज्या भक्ती भावाने रामायनातले सुंदर कांड ऐकतॊ किंवा सितेची पूजा करतो त्याच भक्तीभावाने महाभारतातिल द्रौपदी च्या चीरहरणाचा प्रसंग पण ऐकतॊ. खरंच कसे आहोत आपण?

दुर्दैवाने असे म्हणावे लागते की स्वातंत्र्योत्तर काळात स्त्रीचे जितके अवमुल्यन झाले आहे तितके पूर्वी कधीच नव्हते . पूर्वी स्त्री च्या अंगावर चार चौघांसमोर हात घालायची कोणाची प्राज्ञा नव्हती. आजच्या काळात एका स्त्रीची नग्नावस्थेत गावभर धिंड काढल्याची बातमी आपण अगदी मेलेल्या मनाने वाचतो. फक्त हे आपल्या बाबतीत होत नाही म्हणुन आनंद मानायचा अशी मनोवृत्ती हल्ली वाढीस लागलेली आहे. वर्षभरा पूर्वी एकदा मालाडला लोकलमधे चढतांना एक माणूस स्त्रियांच्या फर्स्ट क्लास मधे सौ. च्या मागे शिरला आणि त्याने चढतांना तिच्या पर्स मधे हात घातला. हे सगळं होत असतांना डब्यातल्या सगळ्या इतर स्त्रिया पहात होत्या, सौ. च्या लक्षात आल्यावर तिने त्याला पर्सने फटकारून दूर ढकलले, पण डब्यातली एकही बाई मदतीला धाऊन आली नाही. इतक्या सगळ्या बायकांसमोर त्या एकट्या माणसाचे काही चालले नसते, पण समाजातल्या एकजूटीचा अभाव- आणि मला तर त्रास होत नाही ना? ही मनोवृत्ती वाढीस लागलेली आहे.

पूर्वी एखाद्या मुलीला छेडतांना ती आपल्या भावाला, वडीलांना सांगेल ही भिती असायची , पण हल्ली वडिलांसमोर किंवा भावासोबत असलेल्या मुलींची पण छेड काढ्ण्यास कोणी घाबरत नाही.पूर्वी शेजारच्या घरातल्या मुलीला जरी कोणी छेडलं तरीही सगळे एकत्र येऊन त्या छेडणाऱ्याच्या घरी जाऊन कम्प्लेंट करायचे. आजकाल, बाप मुलाला मोटरसायकल घेऊन दिल्यावर म्हणतो, ” एखादी मुलगी पटव मागच्या सिटवर बसवायला” !असो जग फार पुढे जातंय असं वाटतं मला तरी.

या जगात पुरुष हा ५० टक्के श्वापद असतो असे म्हणतात पण मला आजची परिस्थिती पहाता पुरुष हा ९० टक्के गिधाड झाला आहे असे वाटते. जेंव्हा ही ९० टक्के श्वापदं स्त्रीयांकडे एक शिकार म्हणून पहातात तेंव्हा इतर दहा टक्के लोकं कुठेतरी नजरा लपवून बसलेले असतात. अहो- जनावरांमधे तरी मेटींग ची काळ वेळ ठरलेली असते- अगदी तिन्ही त्रिकाळ सेक्सचा विचार हे प्राणी पण करत नाहीत. त्यांची पण वेळ ठरलेली असते. कुत्रा फक्त भाद्रपद महिन्यातच कुत्रीच्या मागे मागे असतो, पक्षी पण केवळ विणीच्याच काळात एकमेकांच्या जवळ असतात, पण मानव मात्र अगदी चोविस तासात कधीही सेक्स साठी स्वतःला तयार करू शकतो. हेच ते कारण आहे की आज स्त्री स्वतःला सुरक्षित समजू शकत नाही.

लोकलच्या ब्रिज वर असो किंवा रेल्वे प्लॅटफॉर्मचा जिना चढताना असो, पुरुषाचे ओंगळवाणे स्पर्ष झेलल्या शिवाय स्त्रीला साधे चालता येणे पण अशक्य झालेले आहे. रस्त्यावरच्या नाक्यावर उभ्या असलेल्या वासू लोकांच्या कॉमेंट्स झेलल्या शिवाय रस्त्यावर चालणं पण मुश्किल झालेले आहे. ही परिस्थिती फक्त मुंबई मधेच आहे असे नाही, अगदी लहान शहरातही अशीच परिस्थिती आहे. आपली मानसिकता बरीच बदलली गेली आहे. पूर्वी स्त्री कडे पहाताना आई, बहीण, वहिनी वगैरे अशी नाती असायची, पण हल्ली मात्र एकच नातं उरलं आहे. ते म्हणजे नर आणि मादी.

जी गोष्ट कधीतरी घडते त्या गोष्टी बद्दल लोकांना काहीतरी अट्रॅक्शन असतं. पण जेंव्हा विदर्भातल्या शेतकऱ्यां प्रमाणे दररोज आत्महत्या होणे सुरु झाल्यावर पहिल्या पानावरून ती बातमी तिसऱ्या पानावर, आणि आता कुठल्यातरी कोपऱ्यात दिलेली असते आत्महत्या या जितक्या सहजपणे अजिबात मनाला लावुन न घेता वाचल्या जातात, तेवढ्याच अलिप्तपणे हे बलात्काराच्या बातम्या वाचल्या जातात, पण बलात्काराच्या बातम्यांचे पहिल्या पानावरचे स्थान दुर्दैवाने कायम आहेच.

असं म्हणतात, की पूर्वी मुंबई सगळ्या स्त्रीयांसाठी खूप सुरक्षित होती- पण आज तशी परिस्थिती राहिलेली नाही.भर दिवसा जेंव्हा लोकल मधे एक गर्दुल्ला स्त्री ची पर्स हिसकू शकतो, हल्ला करू शकतो, सगळ्यां समोर शारिरिक अंगचटीला जाऊ शकतो, तेंव्हा सुरक्षितता कशाला म्हणायची हाच प्रश्न पडतो.

स्त्रियांनो, आज तुमचे संरक्षण करण्यासाठी कोणी नाही. तुम्ही घराबाहेर पडल्या की तुम्ही ह्या श्वापदांच्या पिंजऱ्या आहोत हे समजून चाला. तुम्ही कितीही पवित्र असलात तरीही ह्या पुरुषांना जन्म देण्याचे तुम्ही पाप केलेत, आणि आता त्याच पापाची फळं तुम्हालाच भोगावी लागत आहेत. आचार्य अत्रे यांचं एक वाक्य आठवलं.. ” स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, ह्रदयी अमृत नयनी पाणी”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel