आदिअंतीं एक ब्रह्म । मध्यें कोठोनी हा भ्रम ॥१॥

कैंक काळाचा चूकला । जीव शोधी निज मूळा ॥२॥

उफराटी होतां दृष्टि । ब्रह्मीं भासे नसती सृष्टि ॥३॥

डोळ्या कावीळ जाहलें । अवघें पीतचि भासलें ॥४॥

ज्ञानांजनें दृष्टि आली । भ्रांति समूळ नासली ॥५॥

दोर अंधारीं न दिसे । तोंवरीच सर्प भासे ॥६॥

आप्‍तें दीप दीप्‍त केला । सर्पभाव लया गेला ॥७॥

आदिअंतीं एक दोर । मध्यें भुजंगम घोर ॥८॥

झाला नसोनी भासला । अज्ञ देखोनी त्रासला ॥९॥

तैसें ब्रह्मीं दिसे जग । झालें नसोनी वाउग ॥१०॥

जीव देखोनी घाबरे । वांया जन्ममृत्यु फिरे ॥११॥

देहीं देव ओळखिला । ’रंग’ अभय जाहला ॥१२॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel