दुसरे दिवशी चहा पिताना त्यांनी हा घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला .

" ही पोरगी जरा जगावेगळी दिसते . " दिपा म्हणाली .

" अहो , दिपा वैणी ऽऽऽ " असे हाका मारीत लता आली .

" थोड़ी साखर आहे तर द्या . " लता म्हणाली .

" या लता ताई , तुम्ही पण थोडी चहा घ्या . " असे म्हणत दिपाने तिच्या समोर चहाची वाटी ठेवली .

" लताताई  , ह्यापुढे तुम्ही आमच्याकडे चावी ठेवू नका . "

" कां ? " लताने आश्चर्याने विचारल्यावर दिपाने काल घडलेला प्रकार सांगितला .

" तेव्हांच म्हणते संध्याला ताप कसा आला ? " लता म्हणाली .

" का ऽऽऽ य ... ताप ? "  स्वप्नील दचकून म्हणाला .

" उठवायला गेली तर अंग गरम लागलं . " लता म्हणाली .

" पण तुमची मुलगी आमच्याशी अशी कां वागते ? आम्ही काय बिघडवलं तिचं ? " स्वप्नील गोंधळून विचारला .

" दिपा वैणी , चला मी आता येते . संध्याला डॉक्टरकडे घेऊन जायचंच . ह्यांना नंबर काढायला सांगितलंय . " लता उठत म्हणाली .

" अहो मावशी , पण तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही . " स्वप्नील घाईघाईत बोलला .

" सांगेन आणि कधीतरी . " असे म्हणून लता निघून गेली . स्वप्नील उदास होऊन बसला .

" काय दादा , आजकाल संध्या ताई मध्ये खूप इंटरेस्ट घ्यायला लागलास . " वेणू डोळा मारत म्हणाली .

" म्हणजे ? " स्वप्नील विचारला .

" म्हणजे , मी काय सांगते ते तुला कळलंच असेल . " वेणू डोळे मिचकावत म्हणाली .

" ए , तसं काही नाही हं ... आई , मी हिला मारणार हं . " असे म्हणत स्वप्नील उठताच वेणू बॅग घेऊन धावली . ते बघून दिपा हसू लागली . दिवस असेच जात होते.

संध्याला तिच्या आईने " ह्या पुढे भिजायच नाही . " अशी ताकीद देऊन ठेवली होती . एकदा लताने फिरायला जाताना , " काका आले तर चावी दे . " असे म्हणून वेणूच्या हातात चावी दिली . त्यादिवशी स्वप्नील आणि वेणू दोघेही घरी लौकर आले होते . वेणूने कॉफी बनवली . तोपर्यंत स्वप्नील पेटिंग करायला घेतला होता . कॉफीचे चुस्के घेत स्वप्नीलचं पेटींग चाललेलं . एवढ्यात दारावरची बेल वाजली .

" अय्या , ताई ऽऽऽ तू ऽऽऽ ये ना आत . " दरवाजा उघडताच समोर संध्याला बघून वेणू आंनदाने म्हणाली .

" नाही .... नाही .... मी आत .... नाही येत . मला .... ते ..... चावी .... पाहिजे . " संध्या अडखळत म्हणाली .

" अगं , चावी आहे ना . ती कोण घेऊन जातयं कां ? तू ये बघू आत . " असे म्हणून वेणूने संध्याचा हात ओढला .

" पण .... मी .... तर चा ऽऽ वी . " संध्याच्या तोंडून शब्द फुटेनात .

" ताई , हा टॉवेल घे आणि फ़्रेश होऊन ये . तिकडे आत डावीकडे बाथरूम आहे . " वेणू म्हणाली .

" पण हे सगळं का ? " संध्या गोंधळून विचारली .

" अगं , तू जा . " असे म्हणून वेणूने तिला आतल्या बाजूला ढकललं . स्वप्नील तर कॉफी आणि पेटींग सोडून तिला बघतच राहिला . ती जाताच वेणू त्याच्याकडे आली . हलकाच धक्का देत

" दादा , कॉफी थंड झाली वाटतं . बघ जरा बोट घालून . " म्हणाली . त्यावर स्वप्नीलने कपात बोट घातले तर चटका लागला . ते बघून वेणू हसू लागली . स्वप्नील तिला मारायला धावला . त्याच वेळी संध्या बाहेर आली . दोघेही धावायचे थांबले . स्वप्नीलची आणि संध्याची नजरानजर झाली . संध्या मान खाली घालून बाहेर खुर्चीत जाऊन बसली . वेणू चहा करायला आत गेली . स्वप्नीलही गुपचूपपणे पेटींग करायला गेला .

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel