दुरुन संध्याला हसताना पाहून दामोदराव आणि गोपालराव आनंदाने चकीतच झाले . ' ती संध्याच का ? की आणि कोण ? ' हे बघण्यासाठी दामोदरराव भरभर चालत तिच्या पाशी आले . तर खरंच ' अरे , ही तर आपली मुलगी संध्याच आहे . ' ह्याची खात्री झाल्यावर दामोदरराव तिला मिठी मारून रडू लागले . त्यांना रडताना बघून स्वप्नीलचे आणि गोपाल रावचे ही डोळे पाणावले .

" पोरी , मी तुला किती वर्षानी हसताना बघतोय गं . स्वप्नील , ही बदलली कशी ? " दामोदरराव डोळे पुसत विचारले .

" काका , प्लीज शांत व्हा . मी तिला समजावलंय . आता ती अशीच राहणार आहे . " हळू आवाजात स्वप्नील म्हणाला .

इतक्यात वेणू तिथे आली . " ताई , तू इथे आहेस  . मी तुला कुठे कुठे शोधलं ? अय्या , किती छान दिसतेस गं . " संध्या ला निरखत वेणू म्हणाली . आणि गालाची पप्पी घेतली .

" थांब तुला कुणाचीच नजर लागू नये . " असे म्हणून वेणूने आपल्या डोळ्यातल काजळ काढून तिच्या गालाला लावलं . संध्या हसून लाजली . स्वप्नील तिला बघतच राहिला . इतक्यात लता आणि दिपा तिथे आले . त्यांनीही संध्याच गोड कौतुक केलं .

" लता ,  देव पावला आम्हाला . आपले वाईट दिवस संपले . " दामोदरराव म्हणाले . त्यावर तिनेही हसून सम्मती दिली . मग सगळे घरी परतले .

दुसरे दिवशी संध्या भल्या पहाटेच उठली . काल जे पण काही घडलं , ते पुन्हा पुन्हा आठवू लागली . तिला खूप मोकळं मोकळं वाटत होतं . मनावरचं सारं दडपण दूर झालं होतं . नव्या उत्साहाने ती अंघोळ करून देवाची पूजा केली . नविन कपडे , दागिने घातले . तिला नटलेलं सजलेलं बघून , तिच्या आई - वडिलांना . समाधान वाटलं . आता संध्या सर्वांशी हसू , बोलू लागली . आनंदाने , उत्साहाने वावरू लागली

स्वप्नीलला सतत बडबडत , बोलत राहायची सवय होती . तो काहीतरी कारण काढून तो संध्याशी बोलत राहायचा . ' संध्या , आपल्या कडे बोलत राहिली म्हणजे , तिच मन मोकळं राहिल . तिच्या मनावर कसलंच दडपण राहणार नाही . ' हा विचार करून तो कधी कधी तिला बाहेर न्यायचा . रात्री उशीरा पर्यंत दोघे बोलण्यात गढलेले असत . मग बोलता बोलता चहा , कॉफी , आईस्क्रीम किंवा इतर खाणं व्हायचं . जीवन जगण्याची नविन पद्धत स्वप्नीलने संध्याला लावून दिली . रात्री उशीर झाला तर लता घाबरायची . ' संध्या स्वप्नील सोबत आहे . ' हा विचार करून  ती शांत राहायची . ' तिच्यात बदल होत आहे . जीवनाकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन संध्याला मिळाला ' हा विचार करून लता गप्प बसे ..

हल्ली लता व दिपाला संध्याकाळ चं फिरायला जायला मिळेना . कारण दिवाळी जवळ येत असल्याने घराची साफ - सफाई , सजावट , पेंटीग , खाद्यपदार्थ  इत्यादीच्या तयारीला दोघी लागल्या . लताला तर उत्साहाचे उधाण आले होते . संध्यासाठी तिने नविन कपडे , दागदागिने , तिच्या आवडीच्या वस्तू , खाद्यपदार्थ सर्व काही केलं . स्वप्नीलनेही संध्यासाठी तिच्या आवडीच्या रंगाची साडी घेतली . सोबत ज्वेलरी पण घेतली . दिवाळीची खास भेटवस्तू म्हणून गिफ्ट पॅक केलं . तो ही संध्याच्या सुख - दुःखाची काळजी घेऊ लागला .

झालं ! दिवाळी दोन दिवसांवर येऊन ठेपली . धनत्रयोदशीचा दिवस उजाडला . दिपाने हंड्या , कळशी सजविल्या . त्यांची मनोभावे पूजा केली . इकडे लतानेही तेच केलं . संध्याकाळी दारात पणत्या पेटविल्या . स्वप्नीलने आणि वेणूने दोघांनी मिळून आकाश दिवा लावला . इकडे संध्याला आकाश दिवा लावायला जमेना . तेव्हां स्वप्नीलने जाऊन लावला .

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel