इतक्यात दारावरची बेल वाजली . वेणूने दरवाजा उघडला .
" पप्पा , आलात तुम्ही " असे म्हणून तिने त्यांच्या हातातलं बॅग घेतलं .
" आज काय खूप खुष दिसते माझी राणी . काही खास आहे कां ? " असे म्हणत गोपालरावने रेनकोट काढला आणि आत आले .
" काका , तुम्ही भिजलेले दिसत नाहीत . पाऊस गेला कां ? " संध्याने विचारले .
" अरेच्या , संध्या तू आलीस होय . पाऊस आहे . आम्हाला भिजलेलं खपत नाही . मी रेनकोट घालून आलोय . तुम्ही तरुण मुलं . तुम्हाला ते चालते . " असे म्हणून गोपालराव बाथरूम मध्ये हातपाय धुवायला गेले . मग वेणूने दोघांसाठी चहा आणला . दोघेही चहा पीत पीत थोडा वेळ गप्पा मारले . मग पाऊस गेला असे बघून संध्या जायला उठली . तेव्हां तो भानावर आला . वेणूने हे सर्व ताडले .
संध्याला पाहिल्या पासून स्वप्नीलचं चित्त थार्यावर नव्हतं . पूर्वी सारखं त्याचं मन पेटींग मध्ये रमत नव्हतं की , आभ्यासात लक्ष लागत नव्हतं . वेणू ही गोष्ट आपल्या आईला स्वप्नीलच्या नकळत सांगितली होती . दिपाला कळलं असलं तरी , ' चोरी रंगे हात पकडायची असं ठरवलं . ' पण स्वप्नील उदास होता . काही वर्षा पूर्वी घडलेली घटना , . झालेली चूक त्याला सतावू लागली . वेणूची फरट टर्म एक्झाम सुरु झाली . मग स्वप्नीलला पेटींगला बुट्टी मारून स्वतःचा आणि वेणूचा अभ्यास सराव करावे लागले . त्याचं मन मात्र संध्याचाच विचार करू लागले .
एकदा दिपा आणि लता असेच संध्याकाळचे फिरावयास गेलेले असताना ,
" दिपा वैणी , आता तुम्हीच सांगा एखादी मुलगी मुंड्या हाता गळ्याची बरी दिसते कां ? "
" मुळीच नाही . "
" आमच्या संध्याला समजावून समजावून मी थकले . तिला तर काहीच घालायला नको . "
" पण कां ? " दिपाने आश्चर्याने विचारलं .
" उद्या तुम्ही आमच्या कडे या . घरीच बसून बोलू या . इकडे नको लोकं सगळे ऐकतात . " लता म्हणाली . त्यावर दोघी घरी परतल्या . दुसरे दिवशी दिपा लताकडे जायला निघाली.
" आई , आज तुम्ही फिरायला जाणार नाही कां ? " तेव्हा स्वप्नील विचारला .
" नाही . आज आम्ही घरीच बसून गप्पा मारणार आहोत . " असे म्हणून दिपा लताकडे आली .
" या वैणी , बसा . चहा घेणार कां ? " लताने खुर्चीकडे हात दाखवत विचारले .
" नको हो , मी पिऊनच आले . तुम्ही घ्या . " दिपा बसत म्हणाली . " ताई , तुम्ही मला काही सांगणार होता ना संध्या बद्दल . "
" होय . आता वैणी संध्या आम्हाला एकलुती एक मुलगी . तिचे लाड , हट्ट , हौस पुरवायचं आमचं कर्तव्य . "
" होय ते तर बरोबरच आहे . "
" तिचं मन आम्ही कधी दुःखावलं नाही . कधी तिला रडू दिलं नाही . " असे म्हणून लता थोडा वेळ गप्प राहिली . गतकाळात ती हरवल्यासारखी दिसताच
" अहो ताई , बोला ना काय झालं ? " दिपा विचारू लागली .
" काय सांगू वैणी तुम्हाला ?नशीबाचे एकेक खेळ . आमची संध्या शिकण्यात एवढी हुशार होती की , तिने पहिला - दुसरा नंबर कधी सोडला नाही . मॅट्रीक नंतर ती कॉलेज शिक्षणासाठी आपल्या मामाच्या घरी मुम्बईला जाऊन राहिली . तेव्हां आम्ही कोल्हापूरला होतो राहायला . मग तिथून तीन वर्षा नंतर ती परतली . तेव्हां तिचं पूर्णपणे परिवर्तन झालेलं होतं . भावाला फोन करून विचारलो , तर तो म्हणाला की ,
'आपल्याला काही माहीत नाही . ' हिला पण आम्ही खूप वेळा विचारण्याचा प्रयत्न केला . पण सरते शेवटी कळलं की , कॉलेजतर्फे पिकनिक होती . तिथेच हिच्या रूप रंगावरून टारगट पोरांनी टिंगल उडवल्याचं कळलं . संध्या माझ्या कुशीत तोंड लपवून ढसा ढसा रडू लागली . तिला रडताना पाहून आमचं मन खूप कळवलं . पूर्वीची हसरी , खोडकर , बडबडी संध्या आता अबोल आणि एकांत प्रिय झाली होती . अभ्यासातही मागे मागे पडू लागली . आम्ही कपाळाला हात मारून घेतला . " असे म्हणून लता रडू लागली .
हे सगळं स्वप्नील गच्चीत उभा राहून ऐकत होता . त्याला कळून चुकलं की , ' संध्याच होती ती . आता तिच्याकडे क्षमा याचना करावी लागणार . त्या शिवाय उपाय नाही . '
इकडे दिपा स्वप्नीलचं सांगू लागली .
" तो आभ्यासात हुशार आहे . पेटींगची आवड आहे . खेळातही तो पहिला क्रमांक मिळवितो . पण वरचेवर आरोग्याच्या तक्रारी असतात . "
" आणि वेणू ? " लताने डोळे पुसत विचारले .
" वेणूला आभ्यासाची आवड आहे . पण लक्षात म्हणता ते काही राहात नाही .. अगदी विसराळू आहे . कामे मात्र झटपट आवरते . देवधर्माची सुद्धा आवड आहे . " दिपा म्हणली .
" अहो , चहा थंड झाली ना . " असे म्हणून लताने दिपाच्या हातात चहाचा कप दिला व स्वतःही घेतली . मग दिपा जायला उठली .
" बरं ताई , येते मी खूप उशीर झाला . बोलता बोलता वेळ कसा गेला कळलच नाही बघा . तुम्ही काही काळजी करू नकात . मी एखादा दुसरा प्रयत्न करून बघेन . देवाची कृपा झाली तर तिच्यात नक्कीच बदल होईल . " असे म्हणून ती घरी आली . पहातो तो स्वप्नील मोठा अस्वस्थ होऊन इकडून तिकडे येऱ्या झाऱ्या घालत होता .
" अरे नील , काय झालं ? तू एवढा अस्वस्थ कां दिसतोस . "
" काही नाही . " तो म्हणाला
" आई मी जरा मित्राकडे जाऊन येतो . " असे म्हणून तो मोटरसायकलची चावी घेऊन गेला . दिपा थोड्या आश्चर्याने त्याला बघतच राहिली . नंतर ती रात्रीच्या जेवणची तयारी करू लागली .
एके दिवशी रविवारी दामोदरराव गोपालरावांकडे गप्पा मारत बसले होते . स्वप्नील घरात नव्हता . वेणू नुकतीच टुशनहून घरी आली होती . बोलता बोलता दामोदरराव ,
" पुण्याहून संध्याला स्थळ आलय . परवा ते बघायला येणार आहेत . " म्हणाले . वेणूने हे सर्व ऐकताच मनात घाबरली . ती पडदा हळूच बाजूला करून बघीतली तर दामोदरराव खुषीत दिसले . त्या दिवशी स्वप्नील रात्री उशीरा आला . येताच हंतरुणात जाऊन पड़ला . दिपा त्याला उठवत
" अरे नील , झोपलास कां ? जेवत नाही ? " वैगरे विचारू लागली .
" अगं आई , मी मित्राच्या पार्टीत गेलेलो तेथून जेवूनच आलोय . " स्वप्नील म्हणाला .
" कपडे तरी बदल . "
" आई , मी खूप दमलोय आणि सकाळी लौकर उठायचय . प्लीज तू ही जाऊन झोप . " स्वप्नील असे म्हणताच , दिपा निघून गेली .