बऱ्याच वेळा अापण बोलताना म्हणींचा वापर करतो त्याच प्रमाणे संस्कृत सुभाषितांचाहि वापर करतो . संपूर्ण सुभाषित न वापरता त्यातील एखाद्या तुकड्याचा वापर सामान्यत:केला जातो .सुभाषितामुळे अत्यंत कमी शब्दांमध्ये फार मोठा आशय आपल्याला सहज मांडता येतो .ज्याला दोन ओळींमधील गुह्यार्थ असे म्हणता येईल असा भावहि या संस्कृत सुभाषिता मध्ये असतो .इंग्लिश माध्यमामुळे , व मराठी माध्यम असले तरी अनेक कारणांनी वाचनसंस्कृतीचा मुलांमध्ये र्हास झाल्यामुळे बर्याच वेळा उच्चारलेल्या म्हणीचा किंवा संस्कृत सुभाषिताचा अर्थ मुलांना कळत नाही . पालकांनी मुलांना या सुभाषितांची ओळख करून दिल्यास या प्रयोगामुळे संस्कृत सुभाषिते माहीत होतील .बोलण्यामध्ये जास्त अर्थपूर्णता लालित्य व सौंदर्य निर्माण होईल .जीभ लवचिक व भाषा कमनीय, सौष्ठवपूर्ण होईल
१
सत्यस्य वचनं श्रेय: सत्यादपि हितं वदेत् ।
यद्भूतहितमत्यन्तमेतत्सत्यं मतं मम ||
खरं बोलण हे चांगलं असतं. सत्यापेक्षा सुद्धा जे हितकारक असेल ते बोलावे. ज्यामुळे प्राणिमात्रांचे अतिशय कल्याण होईल तेच सत्य होय असे मला वाटते.
एक खाटीक सुरा घेऊन शेळीच्या मागे धावत आहे शेळी गल्लीतून निघून जाते .पाठोपाठ खाटीक धावते येतो तो विचारतो शेळी कुठच्या गल्लीत गेली डावीकडे की उजवीकडे .खरे सांगितले तर शेळी जिवानिशी मरेल, खोटे सांगितले तर शेळी वाचेल, अशा वेळी आपण काय करावे .
खोटे बोलणे हे सत्य बोलण्यापेक्षा जास्त हितकर व चांगले योग्य असे म्हणता येईल .
मुद्दा स्पष्ट करण्यासाठी आणखी एक उदाहरण देता येइल .समजा आपण सुपरवायझर आहोत आपल्या हाताखालील एक कर्मचारी उशिरा आला त्याचा मुलगा आजारी असल्यामुळे त्याला डॉक्टरकडे नेण्यासाठी तो गेला होता .त्यामुळे त्याला उशीर झाला.त्याच वेळी मालक/ वरिष्ठ ऑफिसर आले .अश्या वेळीआपण त्याला काही कामासाठी पाठविले होते असे सांगून त्याला वाचवले तर त्यात काही चूक नाही . मालक कडक असल्यामुळे त्याची नोकरी कदाचित गेली असती .
सत्याचा अवास्तव आग्रह धरू नये .सारासार विचार करून एकंदरीत सर्वांना जे हितकारक असेल ते करावे.असा या वचनाचा मतितार्थ दिसतो .--सत्यादपि हितं वदेत् --हा भाग लक्षात राहण्या सारखा आहे. (हितकर काय याबाबतीत मतभेद होण्याचा संभव आहे )
स्मरणीय
सत्यादपि हितं वदेत्
२
न भूतपूर्वं न कदापि वार्ता हेम्न: कुरंगो न कदापि दॄष्ट: ।
तथापि तॄष्णा रघुनन्दनस्य विनाशकाले विपरीतबुद्धि: ॥
पूर्वी कधीही असे घडले नाही, कुठे अशी हकीकत पण माहित नाही. सोन्याचा हरीण [कोणी ] कधीही पहिला नाही. असे असूनही श्रीरामाला हाव सुटली.(भूल पडली) त्याअर्थी विनाश होणार असेल तेंव्हा बुद्धि उलटीच चालते.(अयोग्य सल्ला देते)
---विनाशकाले विपरीत बुद्धी---हा चरण ही म्हण नेहमी वापरली जाते.प्रत्यक्ष व्यवहारांमध्ये नेहमी अनेकजण हिचा वापर करताना आढळतात .दुसरीकडे असलेले पैसे अापणआपल्या सोयीसाठी किंवा जास्त व्याजाच्या आशेने एखाद्या बँकेत ठेवतो .दुर्दैवाने ती बँक बुडते अशा वेळी ही म्हण वापरता येईल .ज्या वेळी शेअर्स, एखादा धंदा ,एखादी व्यक्ती, यांमध्ये पैसे गुंतवले जातातआणि दुर्दैवाने ते बुडतात तेव्हा हिचा सहज वापर केला जातो .एखादा निर्णय जो कोणत्यातरी आशेने किंवा प्रलोभनाला बळी पडून घेतला जातो आणि निर्णय चुकल्यामुळे त्यामध्ये नुकसान सोसावे लागते अश्या वेळी हिचा वापर केला जातो .
स्मरणीय
विनाशकाले विपरीत बुद्धि:
२७/८/२०१८ ©प्रभाकर पटवर्धन
pvpdada@gmail.com