नयनी मुळी नीरच नाही

नयनी मुळी नीरच नाही
करपून किती मम अंतर जाई।। नयनी....।।

रडूनी रडूनी सरले पाणी
वदुनी वदुनी शिणली वाणी
आत जळत परि निशिदिन पाही।। नयनी....।।

रडता मी ना आता दिसतो
लोक सकळही परि हा फसतो
अश्रुविणे रडणे अति दाही।। नयनी....।।

खाई किडा तो आता कळीस
भ्रमर आत पोखरी काष्ठास
शोक तसा हृदयास सदाही।। नयनी....।।

अमृतधारा ये घेऊन तव
शोकानळ हा प्रभु झणि विझव
आस उरे तव केवळ आई।। नयनी....।।

-पुणे, ऑक्टोबर १९३४

वेल
मी प्रभुराया! त्वदंगणांतील वेल
काळजी का न घेशील।।

मी एका या बाजुस पडलो आहे
वाट त्वत्कृपेची पाहे
त्वत्करुणेचे जल थोडे तरि मिळु दे
मज येथे जीव धरू दे
तू लक्ष जरा मधुनमधुन तरि देई
येईल धीर मम हृदयी
मज अंकुर मग फुटतील
मज पल्लव शुभ येतील
मम जीवन हे हासेल
ती येऊ दे मम भाग्याची वेळ
काळजी का न घेशील।। मी....।।

हे बघ किति रे! माझ्याभवती गवत
ते मजसि वाढु ना देत
मज झाकोळी गुदमरवी ते सतत
शिर वरि मुळि करू ना देत
हे खाऊनिया मारून टाकिल माते
उपटशिल जरी ना हाते
हे उपट विषारी गवत
जे मदंकुरा अडवीत
दे मला विकासा पंथ
ये सखया तू, मरण जरि न येशील
काळजी का न घेशील।। मी....।।

मज घालावे निज हातांनी पुरण
मग भरभर मी वाढेन
कधि खत घाली थोडे तरि तू राया
येईल भरारुन काया
कुणी काळजि ना आजवरी मम केली
म्हणून ही विकलता आली
परि पोशिल जरि कुणी मजला
प्रकटेल कला मम विमला
प्रकटेल दिव्यता सकला
मी त्वदंगणी म्हणूनिच झालो वेल
काळजी का न घेशील।। मी....।।

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel