प्रेमाचे गाणे

(भूतकाळ भविष्यकाळाला उद्देशून गाणे म्हणतो)

बा नीज, सख्या! नीज गड्या लडिवाळा!
राजसा परम वेल्हाळा।।

या सकळ जगी उठले विषमय वारे
द्वेषाचे उडत फवारे
ही अखिल मही सूडबुद्धिने भरली
हृदयेच जणु कुणा नुरली
जगि झाला रे सुळसुळाट कामाचा
क्रोधाचा मात्सर्याचा
परि भिऊ नको तू, बाळ!
धरि प्रेमवृत्ति तू अढळ
प्रेम हेच तव दिव्य बळ
या प्रेमाच्या सामर्थ्ये जगताला
देशील वळण नव, बाळा।। बा नीज....।।

सत्प्रेमाची आहे अदभुत शक्ती
प्रेम हीच खरि चिच्छक्ती
या प्रेमाचे वर्णन कोण करील
तोकडे शब्द पडतील
तू प्रेमाचा सागर हृदयी जमवी
सुकलेले जग हे फुलवी
शमवाया विश्वद्वेष
ये घेउन तू प्रेमास
भरपूर वाटि जगतास
तू देशील प्रेम जरी जगताला
बदलशिल आजच्या काळा।। बा नीज....।।

ना जगति कधी प्रेम दिल्याने सरते
हे प्रेम कधी ना मरते
ते दिधल्याने वाढतसे, जागविते
परहृदयि सुप्त जे असते
परहृदयाचा विकास करिते प्रेम
प्रेम एक जगदभिराम
बाळ तू नजोनी आज
प्रेमाने हृदयी साज
हो सज्ज पुढे किति काज
तू नीज अता येइल तव कृतिवेला
करि तेव्हा प्रेम-सुकाळा।। बा नीज....।।

-त्रिचनापल्ली तुरुंग, डिसेंबर १९३०

आत्मा ओत रे ओत

आत्मा ओत रे ओत
निर्मावा दिव्य तेजाचा झोत।। आत्मा....।।

फुलवी रे फुलवी
सुकला फुलवी
हलवी रे हसवी
विद्या हसवी
राष्ट्रात पेटव निर्मळ ज्योत।। आत्मा....।।

होऊ दे होऊ हो
राष्ट्रविकास
होऊ दे होऊ हो
शास्त्रविकास
वाहु दे शतमुख संस्कृतिस्त्रोत।। आत्मा....।।

प्रकट करी रे
अंतरिचा देव
प्रकट करी रे
अंतरिचा भाव
असशी तू दिव्य रे वतनाचा खोत।। आत्मा....।।

परमात्म्याचा
पुत्र तू अभिनव
बळवंताचा
पुत्र तू अभिनव
निर्भय असशी तू केसरिपोत।। आत्मा....।।

स्वातंत्र्याचे
मंदिर सुंदर
शास्त्रकलांचे
कळस मनोहर
दैदीप्यमान त्याला झळकोत।। आत्मा....।।

-नाशिक तुरुंग, फेब्रुवारी

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel