कधि शुभ्र सुरेख चांगले
कधि काळे तुज रंग मी दिले
सजवीत तुला जसे सुचे
नटशी तूही तसा, तुला रुचे।।
न कधी तुज रुष्ट देखिले
किति तू प्रेम मला सदा दिले
चढशी पडशी बरोबर
बसशी वा पळशी भराभर।।
प्रगती अथवा अधोगती
त्यजिली तू न मदीय संगती
गगनी चढवूनिया वरी
तुज मी दाखविली पुन्हा दरी।।
कधि वैभवता तुला दिली
कधि कष्टस्थिति तीहि दाविली
तुज ना कुरकूर माहिती
तव निष्ठा तरि वर्णु मी किती।।
कधि रम्य विलास मांडिले
झणि सारे परि ते झुगारिले
वदशी परि एक शब्द ना
करु मित्रा तव केवि वर्णना।।
मम बाल्य तसेच यौवन
बघुनी जाशिल काय सोडुन
न मदीय विकास जोवरी
सखया तू न वियोग आदरी।।
मज सोडुन घोर या तमी
नच जाई, वरती चढेन मी
तुजला नटवीन मी बघ
पसरीन त्रिजगात सौरभ।।
घसरेन न मी अत:पर
मम कर्तृत्व दिसेल सुंदर
धवलोज्वल कांति देइन
तुजला जाउ नकोच सोडुन।।
पुरवीन गड्या तुझे लळे
पिकवीतो बघ मुक्तिचे मळे
बघ हे दिसती मुके कळे
न फुलावे वद का? तुला कळे।।
कसुनी खपुनी किती बरे
बघ केली मृदु शुद्ध भूमि रे
झणि येइल खास पाउस
सखया जाइ न तू, न रे रुस।।
जरि मी फिरलो इतस्तता
क्षण मी ना दवडीन रे अता
घडली जरि हातुनी अघे
मज कंटाळुन जाइ ना, बघे।।
करितो अध- मार्जनाप्रती
सखया! नित्य करीन सत्कृती
अजिपासुन नूतना दिशा
मज लागे, मग सोडिशी कसा?।।
अपुले रमणीय गोड ते
स्मरणीय स्मर तू प्रसंगी ते
भरसागरि तू न सोडिले
दिसते तीर न सो, ना भले।।
किति रे अनुरक्त आपण
कधि झालो न वियुक्त रे क्षण
अशनी शयनी जिथे तिथे
अविभक्त, स्मर, अंतरंगि ते।।
जरि वृंत गळून जातसे
जगती या जगणे फुले कसे?
जरि नीर समग्र आटले
तरि ते नीरज केवि रे फुले?।।