अशा प्रकारे बराच काळ चिंतन चालविल्यावर चित्त स्थिर होऊन योग्याला प्रथम ध्यान साध्य होते.  कायगतास्मृतीवर किंवा अशुभावर प्रथम ध्यानापलीकडील ध्याने साध्य होणे शक्य नाही, असे आभिधर्मिकांचे म्हणणे आहे.  याचे कारण ते असे देतात की, चित्तांतील अशुभ वितर्क नष्ट न झाल्यामुळे वरच्या ध्यानांवर जाता येत नाही; आणि रक्त किंवा हाडे यावर ध्यान करीत असता जर अशुभे वितर्क निघून गेला.  तर त्यांचा समावेश कायगतास्मृतीत किंवा अशुभांत न होता अनुक्रमे लोहित आणि अवदात (पांढरे) या दोन कसिणांत होतो.  वर दिलेल्या कायगतासतिसुत्तांत चारहि ध्याने दिली आहेत.  आभिधार्मिकांच्या मते त्यांचा अर्थ लावावयाचा म्हणजे पहिल्या ध्यानापर्यंत योग्याचा अशुभ वितर्क कायम असतो; पण या वितर्काचा जेव्हा त्याला कंटाळा येतो,  तेव्हा त्या शरीरावयवाचा जो वर्ण असेल तोच काय तो त्याच्या डोळ्यांसमोर राहतो, व त्यालाच विश्वव्यापक स्वरूप देऊन तो पुढील ध्याने साध्य करतो.  नीलपीतादिक कसिणांचे ध्यान कसे साध्य होते याचे वर्णन सातव्या भागात येणारच आहे, ते तेथे पहावे.

कायगतास्मृतीची भावना करणार्‍या योग्याचे आनापानस्मृतीची भावना मुळीच केली नसली तर फायदा न होता नुकसान होण्याचा संभव असतो; आपल्या देहाचा कंटाळा आल्यामुळे तो आत्महत्त्येला प्रवृत्त होतो.  या संबंधाने आनापानसंयुत्तांत (सुंत्त न. ९) गोष्ट आहे ती अशी ः-

एके समयी भगवान् वैशालीजवळ महावनात कूटागारशालेत रहात होता.  त्या समयी भगवान अनेक पर्यायांनी अशुभ भावनेची स्तुति करीत होता.  एके दिवशी भगवान भिक्षूंना म्हणाला, ''मी पंधरा दिवसपर्यंत एकांतात राहणार आहे.  तेथे मजपाशी अन्न घेऊन येणार्‍या भिक्षूशिवाय दुसर्‍या कोणत्याही भिक्षूने येता कामा नये.''  त्याप्रमाणे भगवान एकांतात राहता झाला.  इकडे अशुभाची भावना करून भिक्षु आत्महत्त्या करू लागले.  पंधरा दिवसानंतर भगवान एकांतातून बाहेर आला, आणि आनंदाला म्हणाला, ''भिक्षुसंघ कमी दिसतो याचे कारण काय ?''

आनंद म्हणाला, ''भदंत, आपण अनेक पर्यायांनी अशुभ भावनेची स्तुति केलीत, त्यामुळे पुष्कळ भिक्षूंना शरीराचा कंटाळा आला, व त्यांनी आत्महत्या केली.''  भगवान म्हणाला, ''असे जर आहे तर तू वैशालीच्या आसपास जेवढे भिक्षु असतील तेवढ्यांना उपस्थानशालेत (जमण्याच्या जागी) एकत्र कर.''  भगवंताच्या सांगण्याप्रमाणे आनंदाने सर्व भिक्षूंना तेथे गोळा केले.  तेव्हा भगवान तेथे जाऊन बसला आणि म्हणाला, ''भिक्षुहो, आनापानस्मृति समाधि देखील भावित आणि प्रगुणित केली असता शांतिदायक आणि निष्काम सुखदायक होते; आणि पापकारक विचार उत्पन्न झाले असता त्याला ताबडतोब दाबून टाकते.  उन्हाळ्याच्या शेवटी उडत असलेल्या धूळीला जसा महामेघ दाबून टाकतो, तशी ही समाधी पापविचारांना दाबून टाकते.  (यानंतर भावनेचे विधान आहे.  ते तिसर्‍या प्रकरणात दिलेच आहे.)

याचसाठी आनापानस्मृति कायगतास्मृतीच्या आरंभी घालण्यास आली असावी.  अशा रीतीने वैराग्य विकोपाला जाऊ न देता जर ही समाधी साध्य झाली, तर त्यामुळे अनेक फायदे होतात.  अत्यंत सुंदर रूप देखील आपणाला मोहित करू शकत नाही.  हा सर्वात पहिला फायदा समजावयास पाहिजे.  यासंबंधाने 'बुद्ध, धर्म आणि संघ' या पुस्तकांत (आवृत्ती २, पृष्ठ ३७) दिलेली महातिष्य भिक्षूची गोष्ट अवश्य वाचावी.  बाह्य सौंदर्याचा आपणावर परिणाम झाला नाही म्हणजे आपले चित्त कामविकारांपासून आपोआप मुक्त होते.

कायगतास्मृतिपासून दुसरा मोठा फायदा म्हटला म्हणजे ती ज्याला साध्य झाली असेल त्याजकडून सहसा दुसर्‍याचा उपमर्द होत नाही.  या संबंधाने अंगुत्तरनिकायाच्या नवकनिपातांत (सुत्त१ नं. ११) सारिपुत्ताची गोष्ट आहे ती अशी ः-
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१  या सुत्ताला अट्टकथाचार्यांनी थेरसीहनादसुत्त हे नाव दिले आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel