प्रस्तावना

समाधिमार्ग फार प्राचीन आहे.  आळार कालाम आणि उद्दक रामपुत्त हे दोघे समाधिमार्गाचे पुरस्कर्ते होते, व त्यांचा पंथ कोसल देशात बुद्धसमकाली अस्तित्वात होता.  लहानपणी बोधिसत्त्व कालामाच्या आश्रमात जाऊन समाधीचा अभ्यास करीत असण्याचा बळकट संभव आहे.  हा जुना समाधिमार्ग कशा प्रकारचा होता, याचे विस्तृत वर्णन कोठेही सापडत नाही; तथापि त्याचाच एकदेश सध्याच्या योगसूत्रांत आला आहे, असे समजण्यास हरकत दिसत नाही.  कालामादिक योगी केवळ ध्यानाला महत्त्व देत असत; त्या ध्यानाच्यायोगे चित्ताची एकाग्रता स्थापित करणे हेच त्याचे ध्येय होते.  ध्यानप्राप्‍तीसाठी ते कोणत्या उपायांची योजना करीत हे कोठे स्पष्ट सांगितले नाही.  पण सध्याच्या योगसूत्रावरून असे अनुमान करता येते की, या कामी ते प्राणायामालाच महत्त्व देत असावे; परंतु त्यांत पूरक, कुंभक, रेचक वगैरे प्रकार नव्हते.  या पुस्तकात सांगितलेल्या आनापानस्मृतीसारखाच कालामादिकांचा प्राणायाम होता असे दिसते.

कोसल देशात जसे कालमाच्या पंथाला महत्त्व आले होते, तसे ते मगध देशात अनेक तपस्वी पंथांला होते.  या पंथांपैकी एक पंथ श्वासोच्छ्वास दाबून ध्यान करणे हा तपश्चर्येचा प्रकार समजत असे.  आळार कालाम आणि उद्दक रामपुत्त यांचा पंथ सोडून बोधिसत्त्व मगध देशात आला, आणि तेथे त्याने अनेकविध तपश्चर्या चालविली.  त्या वेळी तो आश्वासप्रश्वास दाबून अशा प्रकारचे ध्यान करीत असल्याचा दाखला महासच्चकसुत्तात सापडतो.  त्यात सच्चकाला उद्देशून भगवान् म्हणतो, ''हे अग्गिवेस्सन, माझ्या मनात असा विचार आला की, मी आश्वासप्रश्वास दाबून (अप्राणक) ध्यान करावे.  तो मी मुखातून, आणि नाकातून निघणारे आश्वासप्रश्वास दाबीत असे तेव्हा अंतर्वात माझ्या कानांतून निघण्याचा प्रयत्‍न करीत, व त्यामुळे लोहाराच्या भात्यातून शब्द निघावा त्या प्रकारचा विलक्षण शब्द निघत असे...कानांतूनही मी आश्वासप्रश्वास दाबीत होतो, व त्यामुळे तलवारीच्या टोकाने माथा फोडून टाकल्याप्रमाणे माझ्या डोक्यात वाताभिघात (वेदना) होत असत.''

परंतु आळार कालमाचा राजयोग किंवा अशा प्रकारचा हठयोग हे दोन्ही बुद्धाला सारखेच त्याज्य वाटले; का की, त्यांच्यायोगे जगाचे दुःख कमी होण्याचा संभव नव्हता.  बुद्धाच्या धर्ममार्गात समाधीला स्थान नाही असे नाही, पण ते केवळ गौण आहे.  अष्टांगिक मार्गांत समाधि शेवटची पायरी आहे; व सम्यक् दृष्टि सर्वांत पहिली आहे.  जगात दुःख ओतप्रोत भरलेले आहे, व ते कमी करण्यासाठी आपली आणि इतरांची तृष्णा नष्ट करण्याचा सतत प्रयत्‍न केला पाहिजे, हे सम्यक् दृष्टीचे सार आहे.  तेव्हा आपलेच दुःख वाढविणारा हठयोगी समाधि, किंवा केवळ आपल्याच सुखावर भार देणारी कालामादिकांची समाधि, या दोन्हीही बोधिसत्त्वाला त्याज्य वाटल्या यात नवल नाही.  या दोहोंच्या मधला मार्ग म्हटला म्हणजे ज्या समाधीच्यायोगे आपल्या कुशल मनोवृत्ति वृद्धिंगत करून व तृष्णेचा नाश करून सामान्य जनसमूहाचे हित साधण्यास आपण समर्थ होतो, ती समाधि होय.  याच समाधीचा भगवंताने अष्टांगिक मार्गांत समावेश केला आहे.

प्राणायामाची प्राचीन पद्धती भगवंताने कायम ठेवली खरी, पण त्यांत आपल्या तत्त्वज्ञानाला अनुकूल असे पुष्कळ फेरफार केले आहेत.  मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा, यांना तर भगवंतानेच महत्त्व आणले असे म्हणण्यास हरकत नाही.  अभिभ्वायतनांच्यायोगे (प्रकरण ७ पाहा.) सृष्टिसौंदर्यावर ध्यान करण्याचा प्रकारही बुद्धानेच प्रचलित केला, आणि समाधिमार्गांत विविधता आणली.  याशिवाय जगताच्या अनित्यतेवर ध्यान करण्याचा व तद्द्वारा समाधि साधण्याचा प्रकार केवळ बौद्ध वाङ्‌मयांतच सापडतो.  इतर समाधि क्षणभर विश्रांति मिळण्यासाठी आहेत; परन्तु अनित्यतेवर ध्यान करून मिळविलेली समाधी तत्त्वबोध करून देणारी आहे; आणि इतर समाधींची मदत याच कार्यासाठी करून घ्यावयाची असते.

पाली भाषेतील विशुद्धिमार्ग ग्रंथांत या सर्व समाधींचा विस्तारपूर्वक विचार केला आहे, पण त्या ग्रंथाचे समग्र भाषांतर करणे शक्य नसल्यामुळे त्याचा सारांश मूळ सुत्तपिटकाला अनुसरून या पुस्तकांत आणण्याचा प्रयत्‍न केला आहे.  जेथे सुत्ताचा आणि विशुद्धिमार्गाचा विरोध दिसला तेथे सुत्ताचा सिद्धांतच स्वीकारण्यात आला आहे.

हिंदुस्थान योगमार्गाविषयी फार प्रसिद्ध आहे, व सध्या या देशात त्याचे थोडेबहुत पुनर्जीवन होऊ पहात आहे.  ब्राह्मणवर्गात मौजीबंधनाच्या दिवसापासूनच प्राणायाम करण्यास शिकविण्याची वहिवाट अद्यापि चालू आहे.  पण तिच्यात एवढे शैथिल्य आले आहे की, त्या प्राणायामापासून एक क्षणभर देखील कोणाला शांति मिळत असेल असें वाटत नाही.  परन्तु पाश्चात्य देशांत या प्राणायामाचा निराळ्या रीतीने विकास होत आहे.  प्राणायाम (Breathing Exercise) हा एक तिकडे उत्कृष्ट व्यायामाचा प्रकार होऊन राहिला आहे.  अभिभ्वायतनाच्याद्वारे सृष्टिसौंदर्यावर ध्यान करणे याला पाश्चात्य देशांत विशेष महत्त्व मिळालेले नाही, तरी वर्डस्वर्थसारख्या कवीच्या काव्यांतून मधून मधून त्याची थोडीशी झुळूक दिसून येते.  उदाहरणार्थ, त्याची डाफोडिल ही कविता पाहा.  या कवितेत*  कवि डाफोडिल नावाच्या फुलांचे वर्णन करीत आहे.  एकाकी फिरत असताना अशा फुलांकडे पाहून त्याचे मन एकाग्र होते, एवढेच नव्हे, तर या पुस्तकाच्या सातव्या प्रकरणात वर्णिलेले प्रतिभागनिमित्त त्याला मिळत, आणि घरी आल्यावर जेव्हा जेव्हा त्याचे मन नीरस किंवा विषण्ण होऊन जाते, तेव्हा तेव्हा हे प्रतिभागनिमित्त त्याला उपयोगी पडते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel