आनापानस्मृतिभावना

कुशलसमाधीला साधनीभूत चाळीस पदार्थ विशुद्धमार्गात सांगितले आहेत.  त्यांना पालि भाषेत कम्मट्टाने (कर्मस्थाने) म्हणतात.  ती एणेप्रमाणे -

पठवीकसिण, आपोकसिण, तेजोकसिण, वायोकसिण, नौलकसिण, पीतकसिण, लोहितकसिण, ओदातकसिण, आलोककसिण, परिच्छिन्नाकासकसिण ।  ही दहा कसिणे, किंवा मंडळे.

उद्धुमातक, विनीलक, विपुब्बक, विच्छिद्दक, विक्खायितक, विक्खित्तक, हतविक्खित्तक, लोहितक, पुळवक, अट्टिक ।  ही दहा अशुभ.

बुद्धानुस्सति, धम्मानुस्सति, संघानुस्सति, सीलानुस्सति, चागानुस्सति, देवतानुस्सति, मरणानुस्सति, कायगतासति, आनापानसति, उपसमानुस्सति ।  या दहा अनुस्मृति.

मेत्ता, करूणा, मुदिता, उपेक्खा ।  हे चार ब्रह्मविहार.

आकासानच्चायतन, विञ्ञाणच्चायतन, आकिच्चञ्ञायतन, नेवसञ्ञानासञ्ञायतन ।  ही चार आरूप्ये.

आहारे पटिकूलसञ्ञा ।  ही एक संज्ञा.

चतुधातुववत्थान ।  हे एक ववत्थान किंवा व्यवस्थान; मिळून चाळीस.

या यादीत कसिनाला अग्रस्थान देण्यात आले आहे.  त्याचा अर्थ एवढाच की, बुद्धघोषाचार्याच्या वेळी कसिणाला विशेष महत्त्व आले होते.  परंतु सुत्तपिटकांत यांचा दोन तीन ठिकाणीच काय तो उल्लेख सापडतो.१  परंतु त्यात आलोककसिणाच्या ऐवजी विञ्ञाणकसिण आहे धम्मसंगणीत (अभिधर्माच्या पहिल्या प्रकरणात) कसिणाला अग्रस्थान दिले आहे.  पण त्यात शेवटची दोन कसिणे गाळून बाकीची आठच ठेवली आहेत.  यावरून असे दिसून येते की, ज्या वेळी धम्मसंगणि रचली गेली त्या वेळी कसिणाला विशेष महत्त्व येत चालले होते, आणि बुद्धघोषाचार्याच्या वेळी ते दृढ झाले.  परंतु सुत्तपिटकाचे ज्याने परिशीलन केले असेल त्याला, सर्व कर्मस्थानात आनापानस्मृतीला२ फार महत्त्व दिल्याचे दिसून येईल.  मज्झिमनिकायांत आनापानसति नावाचे एक स्वतंत्र सुत्त आहे.  संयुत्तनिकायात आनापानसंयुत्त नावाचे एक मोठे प्रकरण आहे, आणि इतर निकायांतूनही या आनापानस्मृतीचा अनेक ठिकाणी उल्लेख आला आहे.  त्या सर्वांवरून बुद्धसमकाली आणि त्यानंतर काही काळपर्यंत हे कर्मस्थान प्रधानभूत गणले जात होते यात शंका नाही.३  म्हणून याच कर्मस्थानाचा येथे प्रथमतः विचार करण्यात येत आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*  मज्झिमनिकाय, महासकुलवायिसुत्त (नं. ७७) आणि अंगुत्तरनिकाथ, एककनिपात व दसकनिपात यांत यांचा उल्लेख आढळतो.
**  आन म्हणजे आश्वास व अपमान म्हणजे प्रश्वास ह्यांच्या स्मृतीला आनापानस्मृति म्हणतात.  तिचे विधान पुढे आलेच आहे.
***  बुद्धघोषाचार्यानेही 'इदं कम्मट्टानप्पभेदे मुद्धभूतं सब्बञ्ञुबुद्ध पच्चेकबुद्ध-बुद्धसावकानं विसेसाधिगमदिट्टधम्मसुखविहारपदट्टानं आनापानसतिकम्मट्टानं' असे म्हटले आहे यावरून त्या काळीही या कर्मस्थानाला बरेच महत्त्व राहिले होते; तरी कसिणे अग्रभागी आली होती, असे दिसते.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel