प्राचीन अट्ठकथांतून पृथ्वीकसिणादिकांचे जे विधान बुद्धघोषाचार्याने विशुद्धिमार्गात घेतले आहे, ते येणेप्रमाणे ः- पठवीकसिणं उग्गण्हन्तो पठवियं निमित्तं गण्हाति कते वा अकते वा, सन्तके, नो अनन्तके, सकोटिये, नो अकोटिये, सवटुमे, नो अवटुमे, सपरियत्ने, नो अपरियन्ते, सुप्पमत्ते वा सरावमत्ते वा ।

पृथ्वीकसिणाचे चिंतन करणारा, कृत्रिम१ किंवा अकृत्रिम, अमर्यादित नव्हे पण मर्यादित, अकोटिक (अपरिमित) नव्हे पण कसोटिक (परिमित), अवर्तुळ नव्हे पण सवर्तुळ, अपर्यंत नव्हे पण सपर्यंत, सुपाएवढ्या किंवा मातीच्या कटोर्‍याएवढ्या पृथ्वीचे निमित्त ग्रहण करतो.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१  कृत्रिम पृथ्वी म्हणजे जिचे मंडळ तयार करण्यात आले आहे अशी माती; व अकृत्रिम म्हणजे जिचे (शेती नांगरल्या ठिकाणी वगैरे) मंडळ आपोआप तयार झाले आहे अशी माती.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पृथ्वीकसिणांच्या जागी इतर कसिणांचे नाव घातले असता त्याचे विधानही असेच आहे.  याच आणि अभिभायतनात पहिला मोठा फरक हा की, यांचा आरंभ अगदी आकुंचित स्वरूपापासून व्हावयाचा.  फार झाले तर यांची मर्यादा सुपाएवढीच असावयास पाहिज.  मात्र ती मातीच्या कटोर्‍याहून लहान नसली म्हणजे झाले.  दुसरा फरक हा की, ही कसिणे कृत्रिम रीतीने बनवता येतात.  ती कशी करावी व त्याचे निमित्त कसे ग्रहण करावे यासंबंधाने विशुद्धिमार्गात विस्तृत वर्णन आहे.  त्यांचा सारांश तेवढा येथे देतो.

अकृत्रिम पृथ्वीचे निमित्त घ्यावयाचे म्हणजे एखाद्या नांगरलेल्या जागी किंवा अशाच दुसर्‍या जागी वर्तुळाकार पृथ्वीकसिणाचे निमित्त लक्षात घेऊन त्याचे वारंवार चिंतन करावयाचे.  हे ज्याला साध्य नसेल त्याने कृत्रिम पृथ्वीमंडळ तयार करावे.  निळी, पिवळी, तांबडी, किंवा पांढरी माती न घेता अरुणवण माती घेऊन तिचे एक वीत आणि चार आंगळे व्यासाचे मंडळ बनवावे. जर हे मंडळ घेऊन दुसर्‍या ठिकाणी जावयाचे असेल, तर ते चटईच्या किंवा फळ्याच्या तुकड्यावर बनवावे, व दगडाने घासून साफसूफ करावे.  त्याच्यांत गवताच्या काड्या किंवा कंकर राहू देऊ नये.

आपोकसिण करणार्‍याने शुद्ध पाणी घेऊन ते एक वीत चार आंगळे व्यासाच्या भांड्यात काठापर्यंत भ्रावे, व ते स्थिर झाल्यावर भावना करावी.

तेजोकसिण करणार्‍याने चांगली वाळलेली लाकडे घेऊन त्याची आग करावी व त्याच्यासमोर दोन खुंटाला मध्यंतरी एक वीत चार आंगळे व्यासाचे वर्तुळाकार भोक असलेला चटईचा किंवा कपड्याचा तुकडा बांधावा.  त्या भोकांतून वरचे ज्वालाग्र व खालची लाकडे न दिसता केवळ ज्वालेचा मध्य भाग तेवढा दिसावा असा बंदोबस्त करावा, व योग्य अंतरावर बसून त्या तेजोकसिणाची भावना करावी.

वायुकसिणात कृत्रिमता आणणे शक्य नाही. त्याची भावना करणार्‍याने वार्‍याने हालणारी झाडाची फांदी किंवा असाच दुसरा पदार्थ पाहून त्यावर भावना करावी नीलकसिण करणार्‍याने एक वीत चार आंगळें व्यासाचे भांडे घेऊन त्यात निळ्या रंगाची फुले भरावी व त्यांच्या भोवताली दुसर्‍या कोणत्या तरी रंगाची फुले लावावी; अथवा भिंतीवर किंवा कपड्यावर एक वीत चार आंगळे व्यासाचे निळे मंडळ तयार करावे व ते दुसर्‍या कोणत्या तरी रंगाने परिछिन्न करून त्यावर भावना करावी.  हाच प्रकार पीत, लोहित आणि अवदान (शुभ्र) कसिणांचा समजावा.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel