या आवरणांना पालि भाषेत नीवरणे म्हणतात.  ती विद्याभ्यासात देखील आपायकारक आहेत, मग समाधीला घातक आहेत हे सांगण्याची गरजच राहत नाही.  एकांतात जाऊन आपण समाधिसाध्य करण्याच्या प्रयत्‍नाला लागलो, आणि इतक्यात कामच्छंद उद्‍भवला तर र्‍ही (आत्मलज्जा) आणि अवत्रपा (लोकापवादभय), या दोन मनोवृत्ति वाढवून त्याचे दमन करावे.  'अरे, तू चांगल्या कूळात जन्मलास, सर्व इंद्रियात संपन्नता तुला मिळाली, पण आता मनाचा भयंकर दोष कमी करण्यासाठी एकांत स्वीकारला असता कामच्छंदाने तुझे मन व्यग्र होऊन जावे, हे तुला शोभते काय ?  आणि दुसरे सुज्ञ लोक तुला काय म्हणतील ?  मोठ्या उत्साहाने याने एकांत पत्करला, पण तेथे सारा दिवस कामोपभोगांचेच चिंतन करीत बसला असे ते म्हणणार नाहीत काय ?  अशा रीतीने मनास बोध करावा.  चवथ्या प्रकरणात सांगितलेल्या कायगतास्मृति आणि अशुभभावनाहि कामच्छंदाचे निवारण करण्यास फार उपयोगी पडतात.  तेव्हा ज्याच्या मनात कामच्छांदांचा जोर फार असेल त्याने त्या भावनांची माहिती आगाऊ करून घ्यावी.

व्यापादाच्या शमनासाठी र्‍ही आणि अवत्रप्य यांचा उपयोगी होतोच होतो.  'रे, भल्या माणसा, तू आप्‍तइष्टांना सोडून या एकांतात येऊन राहिलास, तरी क्रोधासारख्या भयंकर शत्रूला उराशी घट्ट धरून बसलास, याबद्दल खरोखरच तुला लाज वाटावयास पाहिजे.  आणखी साधुपुरुष तुला काय म्हणतील ?  हा इतके सारे शिकला, पण आपला क्रोध आवरण्यांस शिकला नाही, असे म्हणून ते तुझा उपहास करणार नाहीत काय ?  याशिवाय पाचव्या प्रकरणात वर्णिलेली मैत्रीभावना क्रोधोपशमाला फार उपयोगी आहे.  तेव्हा ज्याच्या मनात क्रोधाचे प्राधान्य असेल, त्याने ती भावना प्रथम संपादावी.

थीनमिद्ध किंवा आळस हे तिसरे नीवरण होय.  त्याचेही दमन र्‍ही आणि अवत्रप्य यांच्यायोगे करता येतेच.  'रे, तू या एकांतवासात नंदिबैलासारखा रंवथ करून स्वस्थ पडून रहाण्यासाठी आला नाहीस.  प्रापंचिक लोकात जो उत्साह असतो, त्याच्या शतपटीने तुझ्या मनात उत्साह असावयास पाहिजे.  तरच या एकांतवासात राहिल्याचे श्रेय आहे.  आणखी दुसरे उत्साही सज्जन तुला काय म्हणतील ?  प्रपंचाचा भार घ्यावयास नको म्हणून योग्याचे ढोंग करून हा खुशाल झोपत राहिला, असे ते म्हणणार नाहीत काय ?'  याशिवाय वारंवार ईर्यापथांच्या परिवर्तनानेही आळस दूर करता येतो.  अंथरुणावर पडून राहणे, बसणे, उभा राहणे व चक्रमण करणे या चार शरीराच्या अवस्थांना ईर्यापथ म्हणतात.  आपण अंथरूणावर पडून असलो, व त्या स्थितीत आळस उद्‍भवला तर झटदिशी उठून बसावे; बसलो असता आळस उद्‍भवला उभे रहावे; आणि उभा असता आळस उद्‍भवला तर चंक्रमण करावे.  याप्रमाणे विचारपूर्वक ईर्यापथांचे परिवर्तन केले असता आळस जाऊन अंगी हुषारी येते.  सहाव्या प्रकरणात वर्णिलेली मरणस्मृतीही आलस्योपशमाला कारणीभूत होते.  तेव्हा ज्याच्या मनात आळसाचे प्राधान्य असेल त्याने ती भावना प्रथमतः संपादावी.

उद्धच्च किंवा भ्रांतता या दोघांचे निवारण समाधीनेच होत असते.  तरी ज्या ज्या बाजूला मन धावत असेल तेथून तेथून त्याचे आकलन करून समाधीचा जो विषय असेल त्या विषयात मग्न होऊन जाईल, असा प्रयत्‍न करावा.  विशेषतः तिसर्‍या प्रकरणात वर्णिलेला आनापानस्मृतिभावना उद्भ्रांततेपासून चित्ताचे रक्षण करण्यास फार उपयोगी पडते.  तेव्हा ज्याचे चित्त वारंवार विक्षिप्‍त होत असेल त्याने प्रथमतः ती भावना संपादावी.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel