एके वेळी भगवान श्रावस्ती येथ जतवनात अनाथपिंडिकाच्या आरामात रहात होता.  तेव्हा सारिपुत्त त्याजपाशी येऊन म्हणाला, ''भदंत वर्षाकाळ मी येथे राहिलो.  आता गावोगावी प्रवासास जाण्याची माझी इच्छा आहे.''  भगवंताने त्याला परवानगी दिली, आणि तो प्रवासास जाण्यास निघाला.  इतक्यात दुसरा एक भिक्षु भगवंतापाशी येऊन म्हणाला, ''सारिपुत्ताने माझा अपराध केला असून माझी क्षमा न मागता तो प्रवासाला जात आहे.''  ते ऐकून भगवंताने ताबडतोब एका भिक्षूला पाठवून सारिपुत्ताला माघारे बोलाविले.  सारिपुत्ताच्या अपराधी चवकशी होणार आहे, आणि तो त्यातून उत्तम रीतीने मुक्त होणार आहे.१  हे जाणून मोग्गल्लानाने आणि आनंदाने सर्व भिक्षूला भगवंतापाशी बोलावले.  'तू आपला अपराध करून क्षमा न मागता निघून गेलास असा एका स्र्रह्मचार्‍याचा तुझ्यावर आरोप आहे.'  असे जेव्हा भगवंताने सांगितले तेव्हा सारिपुत्त म्हणाला, ''ज्याची कायगतास्मृति जागृत नसेल तोच आपल्या साथ्याचा अपराध करून क्षमा न मागता निघून जाईल  भदंत या पृथ्वीवर नानातर्‍हेचे अशुचि पदार्थ लोक फेकीत असतात; पण त्यामुळे पृथ्वी कंटाळत नाही.  अशा उदकसमान चित्ताने मी रहात असतो.  अग्नि सर्व अशुचिपदार्थांना जाळून टाकतो.  अशा अग्निसमान मनाने मी वागतो.  वायु सर्व पदार्थांवरून वाहतो.  अशा वायुसमान चित्ताने मी वागतो... भगवान याप्रमाणे ज्याची कायगतास्मृति जागृत नसेल तोच दुसर्‍याचा अपराध करील, व क्षमा न मागता प्रवासाला जाईल.''
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१  'सारिपुत्तो भगवतो सम्मुखा सीहनादं नदिस्सती ति' या वाक्याचे शब्दशः भाषांतर केल्याने अर्थ समजणे कठीण जाईल म्हणून वरील रूपांतर केले आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हे सारिपुत्ताचे भाषण ऐकून ज्याने त्याजवर आळ आणला होता, तो भिक्षु आपल्या आसनावरून उठला, आणि भगवंताच्या पाया पडून म्हणाला, ''भदंत, माझ्या हातून मोठा अपराध घडला.  तो हा की, सारिपुत्तावर मी खोटा आळ आणला.  त्या अपराधाची मला क्षमा करा.  यापुढे असे कृत्य माझ्या हातून होणार नाही.''  भगवान् म्हणाला, ''तुझा अपराध तू कबूल केलास हे फार चांगले त्याची आम्ही तुला क्षमा करतो.  जो आपला अपराध दिसून आल्याबरोबर क्षमा मागतो, व पुनरपि तसे कृत्य करीत नाही, त्याची आर्याच्या विनयात अभिवृद्धीच होत असते.''  नंतर भगवंताने सारिपुत्तालाहि त्या भिक्षूच्या अपराधाची क्षमा करावयास लावले.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel