विपश्यनाभावना

हा शब्द केवळ बौद्ध संस्कृत वाङ्‌मयात सापडतो.  उदाहरणार्थ,

शमथेन विपश्यनासुयुक्तः
कुरुते क्लेशविनाशमित्यवेत्य ।
शमथः प्रथमं गवेषणीयः
स च लोके निरपेक्षयाभिरत्या ॥


या शांतिदेवाचार्याच्या श्लोकांत हा शब्द सांपडतो.  परंतु तो पालि विपस्सना या प्रसिद्ध शब्दापासून साधला आहे.  जगातील अनित्यतेच्या भावनेने विपश्यनेला आरंभ होतो.  अनित्यताभावनेचे विधान येणेप्रमाणे ः-

रूप भिक्खवे अनिच्चं ... वेदना अनिच्चा...सञ्ञा अनिच्चा...संखारा अनिच्चा...विञ्ञाणं अनिच्चं ।  यदनिच्चं तं दुक्खं, यं दुक्खं तदनत्ता, यदनत्ता तं नेतं मम, नेसो हमस्मि, न मेसो अत्ता ति ॥  एहवमेतं यथाभूतं सुभ्मप्पञ्ञाय दट्ठव्बं ॥
(खन्दसंयुत्त, वग्ग २, सुत्त ४.)

भिक्षुहो, रूप अनित्य आहे... वेदना अनित्य आहेत... संज्ञा अनित्य आहे...संस्कार अनित्य आहे... विज्ञान अनित्य आहे.  जे अनित्य ते दुःखकर, जे दुःखकर ते अनात्मक, जे अनात्मक ते माझे नव्हे.  तो मी नव्हे, तो माझा आत्मा नव्हे.  याप्रमाणे हे यथार्थतया सम्यक प्रज्ञेने पहावे.

या विधानाप्रमाणे रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान या पाच स्कंधांवर अनित्यतेची भावना करावयाची आहे,  ती कशी याचा थोडक्यात विचार करू.  रूपस्कंध चार महाभूतांचा बनला आहे.  त्यात पहिले महाभत पृथ्वी.  धरणीकंपादिकाच्यायोगाने पृथ्वीच्या स्थिर भागातहि भयंकर अदलाबदल होत असते.  नद्यांचे जेथे स्त्रोत असेल तेथे वाळवंत बनते व नदीचा प्रवाह भलत्याच बाजूला वहात असतो पण असे विलक्षण फेरफार सर्वांनाच पहावयास मिळत नसतात.  त्यांनी पृथ्वीच्या पृष्ठभागावर उगवणार्‍या-आणि ज्यात पृथ्वीचाच अंश जास्ती आहे, अशा-वनस्पतिवर्गाचे निरीक्षण करावे.  पावसाळा सुरू झाल्यावर काही काळाने जिकडे तिकडे सर्व प्रदेश हिरवागार झालेला दिसतो.  आश्विन महिन्याच्या सुमाराला धान्ये पिकास आल्याने शेते पिवळी दिसू लागतात.  पण पुढे त्यांची कापणी होऊन धान्य गोळा केल्यावर केवळ गवत शिल्लक रहाते.  थंडीचे दिवस जाऊन वसंत ॠतूला सुरुवात होते न होते तो वृक्षाला पालवी फुटते, आंब्याला मोहोर येतात, व सृष्टिमध्ये एक अभिनव चैतन्य उत्पन्न झाल्यासारखे दिसते.  इतक्यात उन्हाळा येतो, शेते उद्ध्वस्त झाल्यासारखी दिसू लागतात, आणि दुपारच्या वेळी त्याकडे पाहिले असता डोळ्याला त्रास होतो.  अशा रीतीने दृश्य सृष्टीत बाराहि महिने सारखी घडामोड चाललेली असते.  तिचा विचार करता करता जर आपण परमाणूपर्यंत जाऊन पोचलो तर त्यातहि अस्खलित क्रांति चालू असल्याचे आपणास दिसून येईल.

आपोधातूचे फेरफार अधिक दृश्य आहेत.  पावसाळ्याच्यापूर्वी नद्या वाळून गेल्या आहेत, तलाव कोरडे पडले आहेत, इतक्यात आकाशात अभ्र दिसू लागतात, मेघगर्जनेला सुरुवात होतो, वीजा चमकतात आणि पाऊस पडतो.  नदीनाले आणि तलाव भरून जातात, आणि जिकडेजिकडे पाणीच पाणी होऊन जाते.  जी नदी काही दिवसापूर्वी अत्यंत शांत दिसत होती ती बेफामपणे वाहू लागते, मोठाला धोंडा टाकला तरी वाहून नेते, मग माणसाची गोष्ट काय ?  पण पावसाळा संपल्या बरोबर ती पूर्वस्थितीवर येते आणि हळूहळू आटत जाते.  समुद्राला तर ओहोटीभरती रोजचीच असते, थोडासा वारा वाहिल्याबरोबर लाटा येतात, आणि झंझावताने तुफान होते.  एवढे कशाला ?  नदी जरी आपणास एकच दिसत असली तरी तिच्यातील पाण्याच्या प्रत्येक परमाणूला त्याच्यामागून येणारा परमाणु समुद्राच्या बाजूला लोटीत असतो.  तो समुद्रात पोचला तरी स्थिर रहात नाही, कारण समुद्रातील पाण्याचे परमाणु इतस्ततः सारखे धावत असतात.

तेजोधातूची अनित्यता याहूनहि स्पष्ट आहे.  मोठाले जंगल जाळून टाकणारा अग्निहि ते संपल्यावर आपोआप विझून जातो.  आकाशातील वीज, सूर्याची उष्णता, इत्यादिकांत वारंवार किती फेरफार होतात हे सर्वविश्रुतच आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel