उपशमानुस्मृतीचे विधान सुत्तपिटकांत सापडत नाही.  तिचा उल्लेख तेवढा सापडतो.  अर्थात येथे बुद्धघोषाचार्याच्या अनुरोधानेच या अनुस्मृतीचे विधान सांगणे प्राप्‍त आहे.  आचार्याचे म्हणणे की, उपशम म्हणजे निर्वाण आणि त्याचे गुण स्मरण करावयाचे; ते येणेप्रमाणे ः-  यावता भिक्खवे, धम्मा संखता वा असंखता वा विरागो तेस धम्मानं अग्गमक्खायति यदिदं मदनिम्मदनो पिपासविनयो आलयसमुग्घातो वट्टुपच्छेदो तण्हाक्खयो विरागो निरोधो निब्बानं ति ।  भिक्षुहो, मिश्रित किंवा अमिश्रित धर्मात (पदार्थात) मदाचे निर्मदन करणारा तहान भागविणारा आसक्तीचा घात करणारा, पुनर्जन्माचा नाश करणारा, तुष्णेचा क्षय करणारा असा विराग, असा निरोध-निर्वाण-श्रेष्ठ आहे.

अशा रीतीने निर्वाणगुणाचे चिंतन केले असता मनाला शांति मिळून उपचारसमाधी प्राप्‍त होते.  वात, पित्त आणि कफ या त्रिदोषांनी जशी शरीराची प्रकृती बिघडते तद्वत लोभ द्वेष आणि मोह, या त्रिदोषांनी मनाची बिघडत असते त्या त्रिदोषांपासून मुक्त अशी जी स्थिती, तिचे सतत चिंतन केले असता मनाला शांति मिळणे साहजिकच आहे.  या भावनेचा फायदा हा की, ज्या ज्या वेळी मनुष्य प्रापंचित संतापाने संतप्‍त होतो, त्या त्या वेळी, या संतापाला शांत करणारी अशी एक श्रेष्ठ शक्ति जगामध्ये आहे, या भावनेने त्याचे मन निवते, व ती स्थिती प्राप्‍त करून घेण्याचा उत्साह वृद्धिंगत होतो.
*******************************************************************************
संज्ञा म्हणजे आहाराविषयी प्रतिकूल संज्ञा, हे वर सांगितलेच आहे. हिचेहि विधान सुत्तपिटकांत सापडत नाही.  बुद्धघोषाचार्याने जे काही लिहिले आहे त्याचा सारांश एवढाच की, आहाराविषयी मनुष्याला अनेक खटपटी कराव्या लागतात, आणि तो आहार एकदाचा या शरीरात गेल्याबरोबर अत्यंत गलिच्छ होऊन जातो.  अशा रीतीने आहारात प्रतिकूलता पाहिली म्हणजे तो मनुष्य जिव्हालोलुप होत नाही; आहाराविषयी निःस्पृह रहातो; व या चिंतनाने त्याच्या मनाला उपचारसमाधि मिळते.
*******************************************************************************
व्यवस्थापन म्हणजे शरीरांतर्गत चार महाभूतांचे पृथक्करण.  याचा अंतर्भाव कायगतास्मृतीत (पाचव्या कलमांत) झालाच आहे.  तरी पण विशुद्धिमार्गात हे एक निराळेच कर्मस्थान सांगितले आहे.  त्याचे विधान असे की, शरीरांतील अस्थिचर्मादिक जे कठीण भाग आहेत, ते पृथ्वी समजून त्यांचा एक विभाग करावा.  पित्तश्लेष्मादिक विभागात पाण्याचा अंश जास्त आहे, म्हणून त्यांचा आपोधातूंत अंतर्भाव करावा.  अंगांतील उष्णता तेजोधातु समजावी; व आश्वास-प्रश्वासादिकांना वायुधातूंत घालावे.  येणेप्रमाणे चार विभाग करून शरीराचे निरीक्षण केले असता हे कर्मस्थान साध्य होते.  पण याचा विषय दृश्य किंवा व्यापक नसल्याकारणाने व पुनः पुन्हा चार विभागांकडे लक्ष गेल्याकारणाने, याच्यायोगे ध्यान प्राप्‍त होत नाही; केवळ उपचारसमाधि साध्य होते.  याचा मुख्य फायदा असा की, मनुष्याला इतर प्राण्यासंबंधी जी आसक्ति किंवा भय उत्पन्न होते ते होत नसते.  सगळे प्राणी जर या चार महाभूतांचेच बनलेले आहेत, तर त्यांविषयी आसक्ति तरी कशाला ?  किंवा त्याचे भय तरी बाळगा कशाला ?  अशा रीतीने अनासक्त आणि निर्भय होऊन लोकांत संचार करणार्‍या माणसाच्या हातून स्वपरकल्याण विशेष घडेल यात शंका कोणती ?
*******************************************************************************
तिसर्‍या प्रकरणाच्या आरंभी दिलेल्या यादीत एक संज्ञा व व्यवस्थान ही दोन कर्मस्थाने अगदी शेवटी आली आहेत, ती या प्रकरणात देण्याचे कारण हे की, येथे दिलेल्या आठ अनुस्मृतींच्यायोगे जशी केवळ उपचारसमाधि साधते, तशी ती यांच्याहि योगे साधते.  त्या दृष्टीने पहाता यांना या प्रकरणात घालणे योग्य दिसले.  ही दहाहि कर्मस्थाने ध्यान साध्य करू शकत नाहीत.  तरी पण व्यवहारिक माणसाला त्याजपासून बरेच फायदे आहेत.  ते त्या त्या प्रसंगी वर्णिलेच आहेत.
*******************************************************************************
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel