फार प्राचीन काळची गोष्ट आहे. यशोधरा नावाचा एक राजा होता. त्याच्या राजधानीचे नाव होते मुक्तापूर. मुक्तापूर खरोखरच फार सुंदर शहर होते. मोत्याप्रमाणे शोभत होते. शीतला नदीच्या काठी ते वसलेले होते. नदीमुळे शहराला फारच शोभा आली होती. हंसांप्रमाणे शेकडो नावा नदीच्या पात्रातून ये-जा करताना दिसत. नदीतीरावर सोमेश्वराचे एक फार प्राचीन मंदीर होते. त्या मंदिरात एके काळी एक गरिब जोडपे राहात होते. त्यांना एक मुलगा होता; परंतु तो अकस्मात मरण पावला. आईबापांचा तो एकुलता एक मुलगा होता. तो मुलगा त्यांचे सर्वस्व होता. तो त्यांचे धन, तो त्यांचा देव. मृतपुत्र मातेच्या मांडीवर होता. ती त्याच्याकडे पाहात होती. मुलांचे मिटलेले डोळे उघडावे म्हणून तिच्या डोळ्यांतून अश्रुधारा सुटत होत्या; परंतु मुलाचे डोळे उघडले नाहीत आणि त्याचे डोळे उघडत ना म्हणून त्या मातेचे डोळेही मिटले आणि जवळच बसलेला पिता, त्याचेही प्राण निघून गेले!  मुलावर त्या मायबापांचे किती हे प्रेम! त्या सोमेश्वराजवळ दर वर्षी तेव्हापासून यात्रा भरत असे. आईबापांविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सारे शहर तेथे लोटे. जवळचे, दूरचे लाखो लोक येत. ज्यांचे आईबाप मेलेले असतील ते मृतांसाठी कृतज्ञता दाखवायला येत. ज्यांचे आईबाप जिवंत असतील ते जिवंत असणा-यांविषयी कृतज्ञता दाखवायला येत. मातृपितृप्रेमाची ती अपूर्व यात्रा असे.

मुक्तापूर राजधानी सोमेश्वराच्या ह्या यात्रेसाठी प्राचीन काळापासून प्रसिद्ध होती आणि आता यशोधर राजाच्या प्रजावात्सल्यामुळेही तिचे नाव सर्वांच्या तोंडी झाले होते. मुक्तापूरची प्रचंड मंदिरे, भव्य राजवाडे, सुंदर रुंद रस्ते, तेथील भव्य बाजारपेठ, तेथील विद्यापीठ, तेथील न्यायमंदिर, सारे पाहाण्यासारखे होते; परंतु यशोधर राजाचे दर्शन व्हावे म्हणून लोक येत. तो पुण्यश्लोक राजा होता.

यशोधराला एकच चिंता रात्रंदिवस असे. प्रजा सुखी कशी होईल, हीच ती चिंता. एके दिवशी सुंदर सजलेल्या नावेतून तो शीतला नदीच्या शांत गंभीर प्रवाहावर विहार करीत होता. बरोबर मुख्यमंत्री आदित्यनारायण हा होता. एक वाद्यविशारद एक मधुर तंतुवाद्य वाजवित होता; परंतु राजा यशोधर प्रसन्न नव्हता.

‘महाराज, आज उदासीन का आपली चर्य़ा ? सारी प्रजा सुखी आहे. मग का चिंता ?’ प्रधानाने विचारले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel