तो पाहा एक मनुष्य आला. भिका-याच्या बाजूला आला. पै पैसा टाकीत आहे. करुणा भजनात रंगली आहे. डोळे मिटलेले आहेत. कोणते गाणे ती म्हणत होती? जा गाणे विवाहाच्या वाढदिवशी तिने म्हटले होते तेच. कर्तव्याच्या आनंदाने गाणे ती म्हणत होती. एकतारी वाजत होती. हृदयाची तार लागली होती. तो मनुष्य तेथे उभा राहिला.
आणि त्याला ते चित्र दिसले! वा-यावर नाचणारे चित्र. त्या माणसाने गाणे म्हणणा-या त्या भिकारणीकडे पाहिले. त्या चित्राकडे पाहिले. ते चित्र त्याने पटकन उचलले, घेतले व तो पुढे चालला.
करुणेने डोळे उघडले, तो चित्र नाही. कोठे गेले चित्र? कोणी नेले चित्र? वा-याने का उडाले? अरेरे!
‘कोणी नेले चित्र? तुम्ही पाहिले का?’ जवळच्या भिका-यांना तिने विचारले.
‘आम्हाला काय माहीत? आमचे लक्ष तुमच्या चित्राकडे थोडेच होते? आमचे चित्त समोरच्या फडक्यावर काय पडते त्यावर होते.’ ते म्हणाले.
‘येथे कोणी आले होते?’
‘एक मनुष्य उभा होता. आताच गेला.’
‘कोणत्या दिशेने?’
‘ह्या.’
ती एकदम निघाली. तो चित्र पळवणारा एके ठिकाणी दिव्याजवळ उभा होता. त्या चित्राकडे पाहात होता. करुणेचे एकदम लक्ष गेले. त्या माणसाने इकडे पाहिले. तो वेगाने निघाला. करुणेने चोर ओळखला. तीही त्याच्या पाठोपाठ निघाली.
रस्ते ओलांडीत तो मनुष्य ज्या बाजुला राजवाडे होते, प्रासाद होते तिकडे वळला. जरा अंतरावरुन करुणा येत होती. शिरीषचा प्रासाद आला. तो मनुष्य एकदम त्या प्रासादात शिरला. करुणा पाहात होती. किती तरी वेळ त्या प्रासादाकडे पाहात होती. शिरावे का त्या प्रासादात?
काही वेळ गेला. इतक्यात राजाकडून रथ आला. शिरीषला बोलावणे आले होते.
शिरीष पोषाख करुन त्यात बसला होता. धावत जावे व शिरीषला हृदयाशी धरावे, त्याच्या खांद्यावर मान ठेवून रडावे, असे करुणेला वाटले परंतु पाय जागचा हालेना.