असे म्हणून तो नायक घोडेस्वरांसह निघून गेला. समारंभ संपला. आईबापांसह व पत्नीसह शिरीष घरी आला. चौघे खिन्न होऊन बसली.
‘बाळ, नको रे तू जाऊस. काय व्हायचे असेल ते होईल !’ आई म्हणाली.
‘अग, असे करुन कसे चालेल ? त्याला बांधून ते नेणारच आणि शिवाय असे बघ, नाही तरी आपण म्हातारीच झालो. बाळाचे दैव उदयास येत आहे. आपण कशाला आड यावे ?’ जाऊ दे त्याला राजधानीला होऊ दे प्रधान शेतात कष्ट करायला नकोत. राजवाड्यात राहील. हत्तीवर बसेल. जाऊ दे त्याला. आपण मायाममतेने आंधळी होऊन त्याच्या भविष्याचे का वाटोळे करावे ? मनुष्याने दूरचे पाहावे. जा हो शिरीष. आम्ही आमचे दुःख गिळू. तू मोठा हो, तुझी कीर्ती दिगंबरात जाऊ दे.’
‘बाबा, मला कीर्ती नको, वैभव नको. शेतात काम करायचा मला कंटाळा नाही. मी शेतात काम करीत असतो, त्या वेळेस सूर्य आशीर्वाद देतो. वारे वारा घालतात. पक्षी गाणी गातात. तहान लागली तर नद्या पाणी देतात. आणि मूलता प्रसन्नपणे हसते. मला शेतात काम करायला खरेच आवडते. नको ते मंत्रिपद, नकोत ते राजवाडे.’
‘बाळ, परंतु हट्ट चालणार नाही.’ ते तुझ्या मुसक्या बांधून नेतील. ’
‘तसे करतील तर मी प्राण देईन.
‘नको, असे नको करुस. कोठेही असं. परंतु सुखरुप आस. माझे तुम्ही ऐका. शिरीषला जाऊ दे.’
‘जा हो, बाळ,’ माता म्हणाली.
‘करुणे, जाऊ का ?’ शिरीषने विचारले; परंतु करुणा एकदम हुदका देऊन निघून गेली.