शिरीषने डोळे उघडले, तो समोर हेमा रडत होती.

‘ये, हेमा, ये. ऱडू नको.’

‘शिरीष, तू जोपर्यंत दुःखी आहेस, तोपर्यंत मी रडू नको तर काय करु ?’

‘परंतु मी आजपासून हसायचे ठरविले आहे. तुला सुखी ठेवणे हे माझे कर्तव्य. आईबाबा तिकडे सुखात असतील. माझे मित्र त्यांची काळजी घेत असतील. बघतेस काय ? मी खरेच सांगत आहे.’

‘शिरीष, माझ्यासाठी तुला त्रास.’

‘परंतु तू स्वतःचे सर्वस्व मला दिले आहेस. माझ्यासाठी तू जगदंबेची प्रार्थना करीत असते. तुझ्या प्रेमाचा उतराई मला होऊ दे.’

‘शिरीष, माझ्या प्रेमाचा तुला का बोजा वाटतो ? तुझ्यावर प्रेम केल्यावाचून मला राहावत नाही. तू मला सोडून गेलास, तरीही मी तुझ्यावर प्रेम करीन. माझे प्रेम मोबदल्याची अपेक्षा नाही करणार. शिरीष, माझ्या प्रेमाची फुले वाहायला तुझी मूर्ती मिळाली. मी कृतार्थ झाले.’

‘उठू आता ?’

‘झोप येत असेल तर पडून राहा.’

‘प्रजेची सेवा करणा-याने निजता कामा नये. त्याने रात्रंदिवस जागृत राहिले पाहिजे. उठू दे मला.’

शिरीष उठला. आज तो उल्हसित होता. दुपारी कचेरीत गेला. शिरीषचे मुखकमल प्रसन्न पाहून आदित्यनारायणास आनंद झाला.

‘शिरीष, बरे आहे ना ?’

‘आनंद आहे. आजपासून मी प्रजेच्या कामात सर्व शक्ती ओतणार आहे.’

‘शाबास, असेच कर्तव्यपरायण व्हा.’

शिरीष आता नेहमी आनंदी असे. त्याचे दुःख दूर झाले. हेमाही आनंदली. शिरीष का आईबापांना विसरला ? तो करुणेला का विसरला ? का शिरीषला वैभवाची चटक लागली ? का हेमासाठी तो वरवर हसत होता, परंतु अंतरी जळत होता ? काय होते खरे ?

शिरीषची सर्वत्र वाहवा होऊ लागली. राजा यशोधराचे त्याच्यावर प्रेम जडले. राजधानीतील लोक शिरीषची मूर्ती दृष्टीस, पडताच प्रमाण करीत. पतीची कीर्ती ऐकून हेमाचे पोट भरुन येई.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel