अशी थट्टा चालली होती. परंतु शिरीष तेथे थांबला नाही. का नाही ?
एके दिवशी हेमा शीतला नदीच्या तीरी मैत्रिणींसह हिंडत होती. शिरीषही नदीतीरी होता. शेकडो लोकांची जा-ये सुरु होती. शिरीष एकटाच नदीतीराने गेला व एका झाडाखाली बसला. तो शून्य दृष्टीने कोठे तरी पाहात होता. त्याला का आईबापांची आठवण येत होती? करुणेची आठवण येत होती ?
ती पाहा हेमा पळत पळत येत आहे.
‘काय झाले ? का पळता ?’ शिरीषने विचारले.
‘तुमच्याजवळ दोन शब्द बोलावे म्हणून.’
‘त्यासाठी पळत येण्याची काय जरुरी ?’
‘मैत्रिणींना चुकवण्यासाठी. हं, बोला. दोन शब्द बोला.’
‘दहा शब्द झाले,’ तो म्हणाला.
‘शब्दात पकडणे बरे नव्हे.’
‘मग कशात पकडावे ?’
‘प्रेमात पकडावे.’
‘मला काही समजत नाही.’
‘तुम्ही तर सर्वात हुशार असे सारे म्हणतात.’
‘म्हणोत बिचारे.’
‘तुम्ही दुःखी का ? तुम्हाला घरची आठवण येते ? आईबापांची येते. होय ना ?’
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.