‘का?’
‘ते कैदी आहे. पिंज-यात आहे. ज्याने अनंत आकाशात उडावे त्याला ह्या एवढ्याशा पिंज-यात पंख फडफडावे लागतात. त्याच्या पंखांची शक्ती मेली असेल. आता सोडलेस तरी त्याला उडवणार नाही. फार तर खुंटीवर बसेल आणि पुन्हा पिंज-यात येईल. अरेरे!’
‘परंतु येथे त्याला संरक्षण आहे. रानात हजारो शत्रू.’
‘हेमा, परंतु बाहेर स्वातंत्र्य आहे. दुस-याच्या संरक्षणाखाली सुरक्षीत असे गुलाम म्हणून जगण्यापेक्षा ज्यात धोका आहे असे स्वातंत्र्य सहस्त्रपटींनी बरे. पाखरा, माझ्यासाठी तू बंधनात पडलास.’
‘सोडू का ह्याला?’
‘नको सोडू. इतर पक्षी त्याला मारतील. गुलामगिरीत जो जगला, गुलामगिरीत जो पेरू डाळिंबे खात बसला, तो त्या स्वतंत्र पक्ष्यांना आवडत नाही. त्याची अवलाद वाढू नये, त्याने गुलामगिरीचे जंतू आणू नयेत म्हणून ते त्याला ठार करतात. आता राहू दे पिंज-यात. एकदा गुलाम तो कायमचा गुलाम. पाखरा, डोके आपटून प्राण का नाही दिलास? अनशन व्रत का नाही घेतलेस? गुलाम म्हणून बंधनात जगण्यापेक्षा उपवास करुन मेला का नाहीस? तसा मरतास, तर हुतात्मा झाला असतास. लाखो स्वातंत्रप्रेमी विहंगांनी तुझी स्तुतिस्त्रोत्रे म्हटली असती. वृक्षवेलींनी तुझ्या मृत शरीरावर फुले उधळली असती; परंतु भुललास, गुलामगिरीच्या गोंडस वंचनेला भाळलास. आता पिंज-यातच बस. तेथेच नाच व खा.’
‘शिरीष, तुझ्या सुखासाठी जे जे म्हणून मी करावे ते ते तुला त्रासदायकच वाटते.’
‘हेमा, सुख हे स्वतःच्या जीवनातून शेवटी झ-याप्रमाणे बाहेर पडले पाहिजे. बाहेरची लिंपालिंपी काय कामाची? तू कष्टी नको होऊ. लवकरच आपण सुखी होऊ. अभ्रे नेहमी टिकत नाहीत. जातातच.’
ऐके दिवशी शिरीष झोपला होता; परंतु झोपेत काही तरी बोलत होता. हेमा जागी झाली. ते बोलणे ती ऐकत होती. काय बोलत होता शिरीष?