‘शिरीष, तू आहेस मुख्य प्रधान. मला नाही समजत असली गूढे.’
‘तू मुख्य प्रधानाची मुलगी आहेस. तू मागे एकदा मला अनुत्तीर्ण केले होते, तू माझ्यासाठीच देवीला नवस का केलास ते तुला सांगता आले नव्हते.’
‘शिरीष, तुला मी एक विचारु?’
‘विचार.’
‘तू रागावशील.’
‘हेमा, मी तुझ्यावर एकदाच रागावलो होतो. दुष्काळात खीर केलीस म्हणून. एरवी कधी रागावलो होतो का? खरे सांग. तू मात्र अनेकदा रागावली आहेस.’
‘शिरीष, बायकांचा राग खरा का असतो? पुरुषांच्या रागाची जशी भीती वाटते, तशी बायकांच्या रागाची वाटते का? बरे, ते जाऊ दे. तुला एक विचारते हां.’
‘विचार.’
‘मला अद्याप मुलबाळ नाही. म्हणून का तू दुःखी आहेस? खरे सांग. होय ना? पण मी काय करु? शिरीष, तू दुसरे लग्न करतोस? मला वाईट नाही वाटणार. मी पाहू तुझ्यासाठी सुंदरशी मुलगी? हे काय? रागावलास?’
‘काही तरी विचारतेस.’
‘काही तरी नाही. पुत्र नसेल तर सदगती नाही. पितरांचा उद्घार होत नाही, कुळपरंपरा कोण चालवणार? तुमचे सेवाव्रत कोण चालवील? तुमचे गुण का तुमच्याबरोबर मरु देणार?’
‘हेमा, मुले आपल्यासारखीच होतात असे थोडेच आहे? कैकयीच्या पोटी भरत येतो, हिरण्यकश्यपूला प्रल्हाद होतो. नेमानेमाच्या गोष्टी. आपले चारित्र्य आपल्या पाठीमागून राहील. आपले गुण राहातील. आपल्या कृती राहातील; दुस-यांच्या जीवनात त्यांचा उपयोग होईल. आपण पुत्ररुपाने जगतो त्यापेक्षाही अधिक आपण आपल्या सत्कृत्यांनी मरणोत्तर जगत असतो. तू उगीच मनात आणू नकोस वेडे वेडे आणि तुला एक सांगू का, मी माझ्या बाबांना उतारवायतच झालो; कदाचित देव अजूनही तुझ्या मांडीवर मूल देईल. कष्टी नको होऊ.’