'मनातले जीवन...' हा लेख संग्रह व 'नागमणी एक रहस्य' ही कादंबरी, या दोन पुस्तकांच्या यशानंतर 'बहिर्मुखी' हा लघुकथा संग्रह वाचकांच्या हाती देताना नेहमीप्रमाणेच फार आनंद होतं आहे. 'बहिर्मुखी' हा मी लिहिलेल्या कथांपैकी काही निवडक कथांचा संग्रह असून यात वाचकांना जीवनाकडे बहिर्मुख करण्याकरिता, पुस्तकाच्या नावाप्रमाणेच जीवनाची दुसरी बाजू उलगडून दाखवणाऱ्या कथा त्यात समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. हल्ली वाढलेल्या प्रवासामुळेच, कदाचित माझ्या मनात जन्माला आलेल्या यातील बहुतेक कथा रेल्वे स्थानक किंवा त्याच्या आजूबाजूच्या परिसरात घडलेल्या सत्य घटनांवर आधारित वा घडवून आणलेल्या काल्पनिक कथा आहेत.
सहजासहजी आपल्या डोळ्यांना न दिसणारी आणि दिसली तरी दखल न घेऊ वाटणारी अशी ही समाजजीवनाची दुर्लक्षित दुसरी बाजू म्हणजेच 'बहिर्मुखी' हा कथा संग्रह! आपल्या दैनंदिन जीवनात अशा शेकडो कथा नित्य जन्म घेत असतात पण त्यांची दखल घ्यायला वेळ कोणाकडे आहे? वर-वर पहाता, यातील कथा म्हणजे जीवनाची नकारात्मक बाजू असल्याचा भास होतो; परंतु खोलात जाऊन विचार केला, तर जीवनाची ही दुसरी बाजू वाटते तितकी नकारात्मक नाही याचीही प्रचिती येते. जे सत्य आहे, सहज-सोपे आहे हीच ती जीवनाची दुसरी बाजू! कितीही प्रयत्न केले, तरी त्यापासून आपण दूर पळू शकत नाही. कधी ना कधी आपल्याला तिचा सामना करावाच लागणार आहे. शेवटी आपणही याच समाजाचे एक घटक आहोत, त्याच्याशी कुठे ना कुठे एकात्म आहोत! पुनरुत्थानातुन व सृजनातून नव्या समाजाची निर्मिती करण्याकरिता, जीवनाची ही दुसरी बाजू सर्वांनी कधीतरी डोळसपणे पहावी, अनुभवावी तिचे मनन-चिंतन करावे व या प्रक्रियेतून समाजजीवनाबद्दलचा काहीतरी सकारात्मक दृष्टिकोन वा निष्कर्ष काढावा हीच अपेक्षा ठेवून केलेला लेखन प्रपंच आपल्यासमोर सादर केलेला आहे.
आपलाच,
प्रसाद शिर्के