पावसाळ्याचे  दिवस होते. सर्वत्र मुसळधार पाऊस पडत होता. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मुंबईत बऱ्याच  ठिकाणी पावसाचे पाणी साचले होते. नद्या, नाले आणि गटारे तुडुंब भरुन वाहत होती. काही  ठिकाणी तर गटारातील पाणी रस्त्यावरील साचलेल्या पाण्यात मिसळले होते. रस्त्यावर जागोजागी पाणी साचल्याने, माणसांना रस्त्यावरुन चालणे कठीण झाले होते. रस्त्यावरील वाहनांची वाहतुक ठप्प होण्याच्या मार्गावर होती. तरी नाईलाजाने कामाच्या निमित्ताने घराबहेर पडलेली माणसे जीव मुठीत घेऊन रस्त्यावरुन कशी बशी मार्ग काढत ये-जा करत होती.

त्याची परिक्षा असल्यामुळे तो कॉलेजला जाण्यासाठी निघाला होता. त्याने रिक्षा पकडली आणि काही वेळातच तो स्टेशनला पोहोचला. स्टेशन परिसरात सर्वत्र पावसाचे पाणी साचले होते. रिक्षा स्टँड ते रेल्वे स्टेशन यांच्यामधील रस्त्यावर जवळपास दोन ते तीन फुट पाणी जमा झाले होते. त्याची परिक्षा असल्यामुळे काहीही झाले तरी त्याला कॉलेजमध्ये पोहोचणे भागच होते. त्याने आपली पँट थोडी वर केली आणि तो कसा बसा ते अंतर पार करुन तो रेल्वेच्या फलाटापर्यंत पोहोचला. 'आज ट्रेन तीस ते चाळीस मिनिटे उशिराने धावणार आहेत.' नुकतीच अशी घोषणा झाली होती. स्टेशनवरील इंडीकेटर बंद होते. त्यामुळे कुठली ट्रेन कधी येईल हे रेल्वे प्रशासनाच्या घोषणेशिवाय कोणालाही सांगता येण्यासारखे नव्हते.

तो ट्रेनची वाट बघत त्या स्थानकावर  उभा होता. आपला वेळ घालवण्यासाठी हातात पुस्तक घेऊन तिथल्या तिथेच फेऱ्या मारत होता. अधुन-मधुन तिथे जागोजागी लावलेले जाहीरातींचे बॅनर बघत होता. तितक्यात आपल्याच नादात चालणारा एक मध्यम वयीन गृहस्थ त्याच्या हाताला हलकासा धक्का लाऊन त्याच्या बाजुने निघून गेला. त्याची नजर समोर असलेल्या बाकड्यावर होती. त्या बाकड्यावर आधीच एक वृद्ध साधु बसला होता. खाली जमिनीवर पाणी असल्यामुळे त्याने आपले काही सामानही त्या बाकड्यावरच ठेवलेले होते. त्या माणसाने साधुला ते सामान खाली ठेऊन, त्याला बसण्यासाठी ती जागा मोकळी करण्यास सांगितले, नव्हे जवळजवळ ठणकावले. परंतु खाली सर्वत्र पाणी असल्यामुळे साधू त्याचे सामान खाली ठेवण्यास तयार नव्हता. साधुने आपल्याला बसण्यास जागा रिकामी न केल्यामुळे तो व्यक्ती त्याच्यावर चिडला आणि त्याने रागाने त्या वृद्ध साधुच्या थोबाडीत एक सणसणीत चपराक ठेऊन दिली. तसे तिथे उपस्थितअसलेल्या सर्वांचे लक्ष आपोआपच त्या दोघांकडे गेले. बरं फक्त थोबाडीत मारुन त्या माणसाचा राग शांत झाला नव्हता. त्यानंतर त्याने त्या साधुच्या पोटात गुच्छे मारण्यास सुरुवात केली. दोन-तीन गुच्छयांचा मार सोसल्यानंतर तो वृद्ध साधु वेदनेने कळवळला. त्याने मोठ्या प्रयत्नानंतर कसे बसे त्या माणसाचे शर्ट पकडले. तसे त्या माणसानेही साधूला आपल्या एका हाताने आवळले आणि तो त्याला दुसऱ्या हाताने गुच्छे मारु लागला. आत्तापर्यंत साधुसुद्धा त्याचा प्रतिकार करत त्याला मारण्याचा प्रयत्न करु लागला होता. एकमेकांना मारण्याच्या प्रकारात त्या माणसाने त्या साधूला बाकडयावरुन खाली जमिनीवर पाडले आणि तो त्याला जमेल त्या पद्धतीने अमानुषपणे मारत होता.

आत्तापर्यंत त्यांच्या आजुबाजुला माणसांची बरीचशी गर्दी जमा झाली होती. त्यातील काही जणांनी त्यांची हाणामारी सोडवली. त्यांनी साधूला त्या माणसापासून दुर केले. घडलेला हा सर्व प्रकार पाहुन तिथे उभी असलेली एक महिला त्या माणसावर खुप चिडली होती. ती सर्वांसमक्ष त्या माणसावर जवळ-जवळ ओरडलीच. ‘‘ही काय पद्धत आहे का? असे कोणी म्हाताऱ्या माणसावर हात उचलतं का?’’ अशा प्रकारे ती त्याला घडलेल्या प्रकाराचा जाब  विचारत होती. यावर ‘‘त्याने मला बसायला जागा  दिली नाही’’ हे एकच उत्तर तो सारखे-सारखे पुढे करत होता. ‘‘थांब मी पोलीसांनाच बोलावते’’ असे ती महिला त्याला म्हणाल्यापासुन तो थोडा वरमला होता. तितक्यात तो साधू त्या माणसावर धाऊन गेला आणि त्याने त्या माणसाच्या थोबाडीत एक जोरदार चापट मारली. तसे जमलेल्या लोकांनी त्या साधुला मागे ओढुन पुन्हा त्या माणसापासुन दुर केले. साधुने मारल्यामुळे तो माणुस आता त्या साधुवर फारच चिडला होता. लोकांना न जुमानता तो पुन्हा त्या साधुच्या अंगावर धाऊन जाण्याच्या प्रयत्नात होता, तितक्यातच त्या साधुने तेथील एका बाकड्याजवळ उभी केलेली आपली लाकडी काठी आपल्या हातात घेतली आणि तो माणूस त्याला मारण्यासाठी त्याच्यावर हात उगारण्याच्या आतच, त्याने त्या काठीने त्या माणसाच्या थोबाडावर हल्ला चढवला. तिथे जमलेल्या लोकांनी साधुला रोखण्याचा खुप प्रयत्न केला. परंतू साधु आता काही ऐकण्याच्या मन: स्थितीत दिसत नव्हता. तो आपल्या हातातील काठी हवेत  भिरकाऊन लोकांना बाजुला करु लागला. जशी लोकं मागे हटली तसा त्याने पुन्हा काठीचा एक जोरदार फटका त्या माणसाच्या थोबाडीत मारला. आणि त्यानंतर एक फटका त्याच्या डोक्यावर मारला. त्या माणसाला मारण्याच्या नादात त्या साधुचा धोतर सैल होऊन सुटला होता. पण त्याला त्याची जराही जाणीव वा चिंता नव्हती. जणु त्या माणसाला मारण्यासाठी त्याचे रक्त सळसळत होते. त्या माणसाला मारण्यासाठी त्या वृद्ध साधुच्या शरीरात अचानक संचारलेली स्फूर्ती सर्वांनाच  थक्क करणारी होती. तो तशाच विवस्त्र अवस्थेत त्या माणसाला काठीचे फटके मारत राहीला. बघता-बघता त्याने त्या माणसाच्या थोबाडावर त्या काठीचे चार-पाच फटके मारले होते. त्यामुळे आता त्याच्या तोंडातुन रक्त वाहु लागले. ते रक्त त्याच्या शर्टवर वगळू लागले होते. साधुने त्याला मारलेल्या काठीचे फटके इतके जोरदार होते की, त्याच्या चेहऱ्यावर जागोजागी जखमा झाल्या होत्या. त्याला त्या काठीचे इतके जोरदार फटके बसल्याने त्याचे दात जवळ जवळ तुटलेच असणार याची जाणीव, हे सर्व  दृष्य लांबून बघणाऱ्या त्या मुलाला झाली होती. त्याच्या डोळ्यासमोर अचानक घडलेला हा सर्व विचित्र प्रकार पाहुन तो थोडासा घाबरला होता.

आतापर्यंत  तिथे जमलेल्या लोकांनी साधुला त्या माणसापासून कसे-बसे दुर केले होते. त्या माणसाच्या तोंडातुन अजुनही रक्त वाहतच होते. शरीरातून इतके रक्त गेल्याने, त्याला भोवळ येऊन, त्याच्या डोळ्यासमोर अंधार पसरु लागला होता. परंतु त्याने कसे-बसे स्वत:ला खाली कोसळण्यापासून सावरले होते. काही क्षणापूर्वी त्या वृद्ध साधुची बाजु घेऊन त्या माणसाला बडबडणारी, तिथेच उभी असलेली महिलासुद्धा आता फार घाबरली होती. मनाशी काहीतरी  विचार करत ती आता तिथुन थोडीशी लांब जाऊन उभी राहिली. साधुला लोकांनी पकडून ठेऊन त्याच्या हातातुन त्याची ती काठी त्यांनी काढुन घेतल्याने तो सुद्धा आता शांत झाला होता. ह्या प्रकरणामध्ये लोकांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे ह्या दोघांची हाणामारी आता पूर्णपणे मिटली होती. परंतू त्यात तो माणूस बराच जखमी झाला होता. त्याचा रक्ताने माखलेला चेहरा आता खुपच विदृप दिसू लागला होता. त्याचा जवळ-जवळ संपूर्ण  शर्टच आता रक्ताने  भिजला होता. त्याने स्वत:ला त्या जखमी अवस्थेतुन कसे बसे सावरले होते.

तो साधू आता आपला जमिनीवर पडून ओला झालेला धोतर साफ करुन नेसण्याच्या नादात होता. तितक्यातच अचानक तो जखमी माणुस त्या साधुच्या दिशेने जोरात पळत गेला. साधूला आपण इतर माणसांना काही कळायच्या आतच त्याने त्या साधुची काठी घेऊन उभ्या असलेल्या माणसाच्या हातातुन ती काठी खेचून आपल्या ताब्यात घेतली. क्षणाचाही विलंब न करता त्याने त्याच काठीचा एक जोरदार फटका त्या साधूच्या डोक्यावर मारला. त्या क्षणी तो साधू बेसावध असल्याने त्याला तो फटका इतका जोरात लागला की, साधू आपल्या जागीच कोसळून खाली पडला. ह्यावरुन, त्याच्या डोक्यातुन रक्त जरी येत नसले तरी त्याला आतून खुप मोठा मुका मार लागला असणार हे स्पष्ट झाले होते.

क्षणार्धातच घडलेला हा सर्व प्रकर बघुन सर्वांचीच मने सुन्न झाली होती. साधुला मारल्यानंतर तो माणुस कोणाशीही काहीही न बोलता शांतपणे  तिथुन हळू-हळू चालत निघुन गेला. कोणीही त्याला अडवण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न केला नाही. सर्वांचे लक्ष आता खाली आडव्या पडलेल्या त्या वृद्ध साधुकडे होते. त्याच्या शरीराची हालचाल आता मंदावली होती. बघता-बघता सर्वांच्या डोळ्यादेखत ती पूर्णपणे थांबली.

डोक्यावर बसलेल्या काठीच्या फटक्यामुळे त्या सधुचा जागीच मृत्यु झाला होता. आता त्याच्या आसपास उभे राहण्याची देखील कोणाची हिंमत होत नव्हती. थोड्या वेळाने फलाटावर ट्रेन आली. सर्वजण ट्रेनमध्ये शिरले. तरी बऱ्याच जणांच्या नजरा मात्र त्या साधुवरच खिळल्या होत्या. काही क्षणात ट्रेन पुढे जाऊ लागली. फलाटावर मृत अवस्थेत पडलेला साधु आता दिसेनासा झाला होता. घरी केलेल्या अभ्यासामुळे परिक्षेत  विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे हा सर्व प्रकार आपल्या डोळ्यांनी बघितलेल्या त्या मुलाला माहीत होती. परंतू डोळ्यासमोर घडलेल्या विकृत घटनेत चुक कोणाची होती? हा प्रश्न मात्र अजुनही अनुत्तरीतच होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel