रोजच्या प्रमाणे आजही तो, घाईगडबडीत सर्व काही आवरुन त्याच्या कामावर जायला निघाला. पटापट पावले टाकत त्याने रिक्षा स्टॅन्ड गाठला आणि रिक्षात जाऊन बसला. रिक्षात त्याच्या शिवाय एकही प्रवासी नव्हता म्हणून शिक्षावाला रिक्षात माणसे भरण्याची वाट पहात होता. "अजून किती वेळ इथेच बसावे लागणार? आधीच उशीर झालाय! लवकर कोणीतरी येवो आणि रिक्षा सुरु होवो." अशाप्रकारचे विचार वजा प्रार्थना तो आपल्या मनात करत होता. तितक्यातच दोन माणसे तिथे येऊन, रिक्षात त्याच्या बाजूला बसली. "नशीब भरली एकदाची रिक्षा, आता रिक्षा सुरु होणार!" असा विचार तो करत होता. पण कुठे काय? रिक्षावाल्याला अजुन एक भाडे हवे होते. त्याला तो रिक्षातील, आपल्याच सीटवर आपल्या बाजूला बसवणार होता. एवढ्यात एक साठ-पासष्ठ वयाची वृद्धा रिक्षात बसण्यासाठी आत डोकावू लागली. रिक्षाच्या तीन सीट आधीच भरल्या होत्या. आणि तसेही तो त्या वृद्धेला पुढे आपल्या बाजुला बसवू शकत नव्हता म्हणुन त्याने त्या मुलाकडे आशेने पाहिले. तो त्याला काही बोलण्याच्या आतच तो बिचारा निमुटपणे आपल्या जागेवरुन उठला आणि पुढे नाईलाजाने रिक्षावाल्याच्या बाजुला येऊन त्या अर्ध्या सीटवर कसा-बसा बसला. नाहीतरी असा छोटा-मोठा त्याग करण्याची त्याला आता सवयच झालेली होती. त्यामुळे तक्रार कसली? आणि ती करायची तरी कोणाकडे? रिक्षावाल्यांकडे की इतर प्रवाशांकडे की, त्या वृद्धेकडे? त्याला याच्याशी काही देणे घेणे नव्हते. तो या सर्व शुल्लक गोष्टींच्या पलीकडे जाऊन पोहोचला होता. शेवटी परिस्थिती आणि अनुभव माणसाला सर्व काही शिकवतो; शहाणे करुन सोडतो हेच खरे!
"कधी एकदा रिक्षा स्टेशनला पोहोचते? आणि आपण कशी ट्रेन पकडतो? याच गोष्टींचे विचार त्याच्या मनात घोळत होते. सर्व प्रवासी रिक्षात बसण्याआधीच तो रिक्षामध्ये बसला होता. तरीसुद्धा त्याला रिक्षावाल्याच्या बाजुला अर्ध्या सीटवर अवघडून बसावे लागले होते. असे असूनही या गोष्टीचे त्याला जराही वाईट वाटले नव्हते. कारण यासर्व गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असल्याचे सत्य त्याने कधीच स्वीकारले होते. "सामान्य माणुस आणि तडजोड" हे समीकरण त्याच्या डोक्यात आता पक्के झाले होते. त्यामुळे त्याच्या मनाला त्याग कींवा उपकार या भावनेचा सहजा-सहजी स्पर्श होणेच आता कठीण झाले होते.
उशीरा का होईना पण एकदाची रिक्षा सुरु झाली. त्यातच त्याने समाधान मानले होते. पण हे समाधान काहीच क्षणांचे सोबती होते. रिक्षा सुरु झाली खरी पण त्याचबरोबर टप-टप आवाज करत पावसाला सुरुवात झाली. बघता-बघता पावसाच्या मोठ्या सरी कोसळू लागल्या त्यातच सोसाट्याचा वारा सुटला. त्यामुळे पावसाचे पाणी रिक्षात शिरुन प्रवाशांना भिजवू लागले. पावसामुळे भिजणाऱ्या प्रवाशांची जाणीव होताच, रिक्षावाल्याने मागे वळून प्रवाशांना रिक्षाच्या दोन्ही बाजुला असलेले पडदे लाऊन घेण्यास सुचवले. एका बाजुच्या प्रवाशाने लगेचच आपल्या बाजुच्या पडद्याची गाठ सोडून तत्परतेने रिक्षाचा पडदा लाऊन घेतला. तर दुसऱ्या बाजुच्या वृद्धेला आपल्या बाजुच्या पडद्याची गाठ सोडून ते पडदे लाऊन घेणे जमत नव्हते. त्यामुळे त्या बाजुने रिक्षाच्या आत पावसाचे पाणी शिरत होते. तरी ती बिचारी आपल्या परिने त्या पडद्याची गाठ सोडवण्याचा निरर्थक प्रयत्न करत होती. अशा स्थितीत तीच्या बाजुला बसलेला व्यक्ती जणू आपलं याच्याशी काहीच देणं घेणं नाही याच वृत्तीने रिक्षात बसला असावा. इतका तो यासर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत होता. त्याच्या दोन्ही बाजुंना माणसे बसल्याने त्याच्यापर्यंत पावसाचे पाणी पोहोचत नव्हते. म्हणुन तो एखाद्या सुस्त अस्वलासारखा कसलीही हालचाल न करता फक्त शांतपणे बसून होता. बाजुच्या वृद्धेला रिक्षाच्या पडद्याची गाठ सोडवायला मदत करावी असा विचारही त्याच्या मनाला शिवला नसणार हे त्याच्या वागण्यातुन अगदीच स्पष्ट होत होते. पण त्याला अस्वलच का म्हणावे? आजूबाजूच्या स्थितीची जाणीव नसणारा तो एक गेंडाही असू शकतो. शरीराभोवती संवेदनाहीन जाड कातडी असलेला गेंडा. गेंडाच तो! बाजुला पाणीच काय पण आग जरी लागली असती तरी त्याला त्या प्रकरणाची दखल घेऊन त्यात हस्तक्षेप करावासा वाटला नसता हे नक्की. म्हणून मग शेवटी नाईलाजाने त्या रिक्षचालकानेच रिक्षाचा वेग थोडा कमी केला आणि मागे वळून त्याने आपल्या एका हाताने रिक्षाच्या पडद्याची गाठ सोडवली. हा सर्व प्रकार पुढे बसलेला मुलगा शांतपणे फक्त बघत होता. रिक्षाच्या दोन्ही बाजुंचे पडदे लाऊन झाल्याने मागे बसलेल्या प्रवाशांचे पावसापासून संरक्षण झाले होते. परंतू पुढे बसलेल्या त्या मुलावर मात्र रिक्षाच्या पुढच्या बाजुस पडदे नसल्यामुळे,रिक्षात शिरणाऱ्या पावसाच्या पाण्याने भिजण्याची वेळ आली होती. सर्वात आधी येऊनही त्या वृद्ध स्त्रीच्या सोयीसाठी कसलीही तक्रार न करता त्याने पावसात भिजत पुढे बसणे स्वीकारले होते. हा त्याने केलेला एक प्रकारचा त्यगच नव्हता का? कुठे तो जगाशी काहीही देणे घेणे नसलेला गेंड्याचे कातडं पांघरुन स्वार्थानं स्वत:च्याच विश्वात आकंठ बुडालेला असंवेदनशील प्राणी. आणि कुठे हा... मुकपणे सर्व काही सहन करणारा मुलगा. या दोघांची तुलना होणे शक्यच नव्हते. पण ही तुलना करणार तरी कोण होतं? त्याच्या त्यागाची जाणीव होतीच कुणाला? तो बिचारा कसलीही तक्रार न करता मूकपणे पावसाच्या सरी अंगावर घेत भिजत होता. परंतू यात दोष कोणाचा होता? सर्वात आधी येऊन रिक्षात बसणाऱ्या त्या मुलाचा की, सर्वात उशीरा आलेल्या त्या वृद्धेचा की, चार-चार प्रवासी रिक्षात भरुन, थोडे अधिक पैसे कमवण्याची लालसा असलेल्या त्या रिक्षाचालकाचा? की पावसाचा? ह्याच विचारात तो काही क्षण हरवून गेला असताना स्टेशन कधी आले हे त्याचे त्यालाच कळले नाही. जेव्हा रिक्षावाल्याने झटकनं ब्रेक लाऊन रिक्षा थांबवली तेव्हा कुठे तो भानावर आला. पटकन सुटे पैसे रिक्षावाल्याच्या हातावर देऊन त्याने आपली छत्री उघडली. पण आता छत्री उघडून तरी काय फायदा होता? आतापर्यंत त्याचे संपूर्ण कपडे पावसाच्या पाण्याने पूर्णपणे भिजले होते.
पावसामुळे रस्त्यात जागोजागी चिखल साचला होता. त्या रस्त्यावरील, जागोजागी असलेल्या खड्ड्यांमधुन मार्ग काढत तो मोठ्या मुश्कीलीने चालत होता. पण शेवटी जी गोष्ट तो टाळत होता नेमके तेच घडले. चुकुन त्याचा पाय रस्त्यावरील एका खड्ड्यात पडला. सकाळीच त्याने आपल्या बुटांना चकाचक पॉलिश केले होते. जे आता पूर्णपणे चिखलाने माखलेले होते . बुटांबरोबरच त्याच्या पॅन्टीच्याही काही भागाला चिखल लागला होता. तो त्याच जागी उभा राहून तो चिखल साफ करण्यासाठी आपले पाय झटकू लागला. पण त्याच्या या कृतीचा फारसा काही उपयोग होणारा नव्हता. तो चिखल खुपच घट्ट असल्याने त्याचा थर अजुनही त्याच्या बुटांवरच साचलेला होता. म्हणुन त्याने रस्त्याच्या बाजुला असलेल्या खड्ड्यामध्ये साचलेल्या पाण्यात आपला पाय बुडवला. तेव्हा कुठे त्याच्या बुटावरील थोडासा चिखल नाहीसा झाला. दोनदा-तीनदा आपला पाय त्या पाण्यात बूडवून आणि त्यानंतर आपले पाय झटकून झाल्यानंतर तो पुन्हा आपल्या मार्गाने चालू लागला.
आज स्टेशनपर्यंत पोहोचायला त्याला रोजच्या वेळेपेक्षा जास्तच उशीर झाला होता. आतापर्यंत त्याची रोजची फास्ट लोकल ट्रेन निघुनही गेली होती. परंतू त्या ट्रेननंतर किमान अर्धा तास तरी दुसरी फास्ट ट्रेन नसल्याने तो स्लो ट्रेन पकडण्याच्या उद्देशाने धावा-धाव करु लागला. सुदैवाने तितक्यातच त्याला एका फलाटावर ट्रेन येताना दिसली म्हणून तो पुलावरुन धावत-धावत पटापट जिने उतरुन त्या फलाटापर्यंत पोहोचला आणि कसा बसा त्या ट्रेनमध्ये चढण्यात यश्स्वी झाला. ट्रेनमध्ये भरपूर गर्दी होती. आतल्या सीट पासून ते ट्रेनच्या दरवाजापर्यंत त्या डब्यात लोकं खचाखच भरलेली होती. माणसांच्या त्या गर्दीला बाजुला करत तो कसा बसा पुढे-पुढे जाण्याचा प्रयत्न करु लागला.
पायात काहीसा चिखलाने माखलेला बुट, हातात पावसाने ओली झालेली छत्री असुनही संपूर्ण भिजलेले कपडे अशा अवस्थेत ट्रेनमध्ये शिरल्याने इतर लोकं त्याच्याकडे कहीशा कुत्सित नजरेने बघत होती. काही लोकं तर, "कुठुन आलायं हे? अशी लोकं ट्रेनमध्ये इतरांना त्रास द्यायला येतातच कशाला?" अशाप्रकारच्या चर्चा करण्यात धन्यता मानत होते. ही गोष्ट आतापर्यंत त्याच्याही लक्षात आली होती. तरीही त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तो त्या ट्रेनच्या डब्यातील सीटजवळ जाण्यात यशस्वी झाला. तिथे दोन्ही बाजुंना एकेका सीटवर चार-चार माणसे कशी-बशी आखडून बसली होती. तर दोन सीटच्या मधील जागेत आधीच तीन माणसे उभी होती. त्यातच हा चौथा तिथे जाऊन उभा राहिला. नशीबाने त्याला त्या डब्यात निदान नीट उभे रहाण्याइतकी तरी जागा मिळाली होती त्यातच तो धन्यता मानत होता.
ट्रेनच्या त्या डब्यात प्रत्येक जण कशाना-कशात गुंतलेले होते. काही लोकांची अवेळी पडणाऱ्या पावसावर चर्चा सुरु होती. त्यातील काही लोकं कुठल्यावेळी पाऊस पडायला हवा, कुठल्यावेळी पडायला नको या विषयावर आपापली मते मांडत चर्चेत रमली होती. उभ्या असलेल्यांपैकी काही जण शांतपणे उभी होती तर काही जणांची ट्रेनमधील गर्दीमुळे नुसती चीड-चीड होत होती. सीटवर बसलेल्या काही मंडळींनी आपले डोके मोबाईलमध्ये खुपसलेले होते, तर काही मंडळी निवांतपणे डुलक्या घेत होती. त्या वृद्धेसाठी रिक्षातील स्वत:ची सीट सोडलेला हा मुलगा मात्र ह्या सर्व गोष्टींपासून अलिप्त राहून, कुठला प्रवासी आपल्या जागेवरुन कधी उठतो आणि आपल्याला सीटवर बसायला जाग देतो याच आशेने बऱ्याच वेळेपासून सर्वांची तोंडे बघत तिथे उभा होता. परंतू त्याच्याकडे लक्ष होतेच कुणाचे? जो तो आपल्याच विश्वात गुंतलेला. ज्याला त्याला ट्रेनमधील सार्वजनिक सीट आपल्याच मालकीची वाटत होती. अशावेळी माणसाच्या या वृत्तीवर त्याच्या मनात जन्म घेतलेल्या काही ओळी त्याच्या मनात स्वतःची जागा निर्माण करत होत्या.
ट्रेनच्या सीटवर आपली
हक्काची एक जागा असावी
सार्वजनिक असली, तरी ती
आपल्याच मालकीची असावी
इतकी स्वार्थी माणसाची बुद्धी नसावी
माणसाचे हृदय असूनही, शरीरावर
पांघरलेली, गेंड्याची कातडी नसावी.