रविवारचा दिवस असल्यामुळे ट्रेनला फारशी गर्दी नव्ह्ती. दिवसभर धावपळ करुन तो आज खूप थकला होता. सुदैवाने ट्रेनमध्ये बसायला जागा मिळाल्याने त्याला थोडी-तरी विश्रांती मिळणार होती. रोज एकाच सीटवर चार-चार जणं बसल्यामुळे आखडून बसण्याची सवय त्याच्या अंगवळणी पडली होती. परंतू आजची परिस्थिती मात्र रोजच्या सारखी नव्हती. सिटवर त्याला पकडून दोनच प्रवासी असल्याने त्याला आरामात हात-पाय पसरवून बसायची मोकळीक होती. तो डोळे मिटून झोप येण्याची वाट पाहत होता पण काही केल्या त्याला झोपच येत नव्हती.
कुठलेतरी स्थानक आले. ट्रेन थांबली. त्याबरोबरच काही माणसे ट्रेनमध्ये शिरली. ट्रेनच्या त्या डब्यामध्ये बऱ्याच सीट रिकाम्या असल्याने नुकत्याच आलेल्या सर्व प्रवाशांना बसण्यासाठी जागा मिळाली होती. ट्रेनमध्ये शिरलेल्या पुरुषांबरोबर एक स्त्रीसुद्धा ट्रेनच्या त्या डब्यात शिरली होती. रिकामी जागा बघून तीने आपल्यासाठी एक सीट पटकावली. तिचे वय जवळपास चाळीस-पंचेचाळीस वर्षे असावे. संपूर्ण चेहऱ्याला फासलेले लाल कुंकु, दोन्ही डोळ्यांमध्ये काळा सुरमा, लाल रंगाच्या मेहंदीने भरलेले हात-पाय, विस्कटलेली केसं, मळलेले नि धुळीने माखलेले कपडे, शरीरावर धारण केलेले चांदीचे दागिने अशा विचित्र वेशातील त्या स्त्रीची शरीरयष्टी एखाद्या पुरुषाप्रमाणे बळकट होती. तीच्या अशा अवतारामुळे ती खुपच भयावह दिसत होती. डब्यात शिरताच तीने आपल्या विचित्र वेशभुषेमुळे सर्वांचे लक्ष स्वतःकडे वेधुन घेतले होते.
ट्रेनमधील आसनावर बसताच तिने आपल्याजवळील बॅग सीटवर, आपल्या बाजुला ठेवली. समोर बसलेल्या माणसांची पर्वा न करता ती एखाद्या महाराणीप्रमाणे पाय पसरुन बसली. ज्यामुळे ट्रेनमध्ये येणाऱ्या नवीन प्रवाशांना दोन सीटच्या मध्ये असलेल्या जागेत उभे रहाणे तर दुरचेच पण त्या जागेत शिरणेच अशक्य होईल, अशा प्रकारे ती त्या ठिकाणी पाय पसरुन बसली होती. तिच्या अशाप्रकारे बसण्यामुळे तिच्या बाजुच्यांना तीचा राग येत होता. तरी तिला समजवण्याचा प्रयत्न कोणीही करताना दिसत नव्हते. हा सर्व प्रकार थकुन भागुन आलेला तरुण, त्याला झोप न येत असल्यामुळे अस्वस्थ होऊन शांतपणे बघत बसला होता.
काही वेळाने ती स्त्री आपल्या आजुबाजुच्या माणसांकडे पाणी मागु लागली. परंतू त्यांच्याकडे पाणी नसल्याने किंवा कोणालाही तिला पाणी द्यायचे नसल्याने सर्वजण तीच्याकडे दुर्लक्ष करत होते. म्हणुन मग तिने तीच्या बाजुच्या सीटवर कडेला बसलेल्या व्यक्तीकडे पाहिले. त्याने आपले डोके मोबाईलमध्ये खुपसलेले असल्याने त्याचे तिच्याकडे लक्ष नव्हते. म्हणून तीने त्याला हात लाऊन तिला पाणी हवे असल्याचा इशारा केला. परंतू, त्याच्याकडेही पाणी नव्हते. ह्या व्यक्तीच्या बाजुलाच झोप न येणारा अस्वस्थ तरुण बसला होता. त्याच्याकडे पाणी सुद्धा होते. पण तिने अद्याप त्याच्याकडे पाण्याची मागणी केली नसल्याने तो आपल्या जागेवर शांतपणे बसून, ह्या विचित्र स्त्रीला पाणी द्यावे की देऊ नये? या विचारात गुंतला होता.
आजुबाजुच्या माणसांकडे पाणी मागून झाल्यावर ती कंटाळून आपल्या जागेवरुन उठली आणि तिच्या मागच्या सीटवरील प्रवाशांकडे पाणी मागू लागली. परंतू तिला सर्वांकडून नकारच मिळू लागला. अनेक जणांकडे पाणी मागूनही, त्यातील एकाने सुद्धा तिला अद्याप पाणी दिले नव्हते. म्हणून मग शेवटी कंटाळून ती पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसली. आणि आपली नजर सर्वांच्या चेहऱ्यावरुन फिरवत ती सर्वांकडे रागाने पाहू लागली. तिचा अनावर झालेला राग तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागला होता. तिने त्या डब्यात बसलेल्या माणसांना शिव्या देणे सुरु केले. शिव्या देत असताना ती आपली छाती बडवत मध्ये-मध्ये टाळ्या वाजवत होती. "तुम्ही एका माणसाची तहान भागवू शकत नाही. मग तुमच्या जगण्याला काही अर्थ आहे का? कशाला करता मग रोज इतकी खटपट...नोकरी-धंदा. त्यापेक्षा तुम्ही पुरुषांनी आपल्या हातात बांगड्या घालून नाचण्याचे काम तरी सुरु करा.'' इतके बोलून ती पुन्हा शिव्या देऊ लागली. आतापर्यंत तीला पाणी देऊ की नको ह्या विचारात अडकून पडलेला मुलगा आता चांगलाच भयभीत झाला होता. ती स्त्री त्याच्यापासून काही अंतरावर असलेल्या सिटवर बसून सर्वांना दिलखुलासपणे शिव्या देत होती. त्या स्त्रीचे असे विचित्र वर्तन पाहून 'तिच्या नादाला न लागलेलेच बरे!' हा विचार करुन, त्याने आपले डोळे बंद केले आणि तो झोपण्याचे सोंग करु लागला. परंतू त्याचा तो प्रयत्न यशस्वी होण्याच्या आतच त्या स्त्रीने त्याला हात लाऊन उठवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नाईलाजाने त्याला आपले डोळे उघडून 'आपल्याला काही माहितच नाही' अशाप्रकारचे भाव आपल्या चेहऱ्यावर आणावे लागले. तो निरागसपणे तीच्याकडे पाहू लागला. तिने त्याच्याकडे पाणी मागितले. क्षणाचाही विलंब न करता त्याने तीला नाही म्हणुन सांगीतले. तशी ती पुन्ह मोठ-मोठ्याने शिव्या देत टाळ्या पिटू लागली. ''माणसाचे हृदय नसलेल्या, तुम्हा सर्वांना माझी हाय लागेल... एक दिवस तुम्ही सुद्धा पाण्याअभावी तडफडून मराल. स्वत:ला माणूस म्हणवून घेण्याचा तुम्हांला काहीच अधिकार नाही. तुम्ही सर्व आपापल्या धर्माचे गुलाम आहात. तुम्ही लोक आपल्या धर्मानुसार, गरज नसतानाही नकोत्या दिवशी नकोत्यांना दान कराल. पण गरजवंतांना पाणी पाजण्याची तुमची लायकी नाही.'' इतके बोलून झाल्यावर ती आपल्या जागेवरुन उठली आणि तिच्या पुढच्या बाजुला बसलेल्या प्रवाशांकडे पाणी मागू लागली. आतापर्यंत तिने दिलेले शिव्या शाप त्या डब्यातील सर्वांनीच ऐकले होते. म्हणून तिच्या नादाला लागण्याची कोणीही हिंमत करणार नव्हते.
काही वेळाने कुठलेतरी स्टेशन आले. क्षणाचाही विचार न करता जसे आपल्याला ह्याच स्टेशनवर उतरायचे होते असे भाव चेहऱ्यावर आणून, घाबरलेला तो तरुण ट्रेन मधून उतरला आणि पुन्हा त्याच ट्रेनच्या दुसऱ्या डब्यामध्ये शिरला. त्याने मोठ्या हुशारीने ट्रेनच्या त्या डब्यातील भयावह वातावरणापासून आपली सुटका करुन घेतली होती. चुकीच्या पद्धतीचे वर्तन करुन सर्वांकडे पाणी मागणारी ती स्त्री...स्त्री नसून आपल्या जीवनातील व्यापाला कंटाळलेला एक तृतीयपंथी होता; ही गोष्ट आतापर्यंत त्याच्या चांगलीच लक्षात आली होती.