गेल्या तीन महिन्यांपासून इमारतीचे काम वेगाने सुरु होते. कामगारांबरोबर जागेचा मालक सुद्धा हल्ली आपला बराचसा वेळ तिथेच घालवू लागला होता. रात्री अपरात्रीपर्यंत या प्रकल्पाचे काम सुरु असायचे. घरी येण्या-जाण्यात कामगारांचा वेळ वाया जाऊ नये म्हणून मालकाने त्यांच्या रहाण्याची सोय सुद्धा तिथेच केलेली होती. मालकाला लवकरात लवकर हे काम पूर्ण करुन दुसऱ्या इमारतीच्या प्रकल्पाचे काम सुरु करायचे होते. त्यामुळे तो हे काम पूर्ण करण्यासाठी घाई करत होता. कामगारांना रात्री उशीरापर्यंत काम करण्याचे वेगळे पैसे देऊन तो त्यांच्याकडून भरपूर काम करुन घेत होता. स्वत: लक्ष दिल्याशिवाय इमारतीचे काम लवकर पूर्ण होणार नाही; हे त्याला चांगलेच ठाऊक होते. त्यामुळे तो सुद्धा रात्री उशीरापर्यंत तिथेच थांबत असे.
मालक स्वत: सिव्हील इंजिनियर होता. अनेक वर्षे बांधकाम क्षेत्रात घालवल्यामुळे त्याच्याकडे ह्या कामाचा भरपुर अनुभव होता. सुरवातीला त्याने बरीच वर्षे इतरांकडे नोकरी करण्यामध्ये घालवली होती. नंतर त्याच अनुभवाच्या जोरावर त्याने स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय सुरु केला. प्रचंड इच्छाशक्ती, मेहनत आणि जिद्दीच्या बरोबरच संपूर्ण लक्ष आपल्या कामावर केंद्रीत केल्याने त्याला हळू-हळू व्यवसायात यश मिळू लागले. आता तो मोठ-मोठ्या इमारतींचे प्रकल्पही सहज हाताळू शकत होता. बरीच वर्षे बांधकाम क्षेत्रात चांगली कामगिरी केल्याने आज शहरात त्याच्या नावाला किंमत होती.
मालकाने पैशांबरोबर माणुसकीही जपली होती. तसा तो पैशांसाठी लालची होता परंतु अडचणीच्या काळात मात्र तो पैशांचा विचार न करता कोणालाही हसत-हसत मदत करत असे. आपल्यासाठी काम करणाऱ्या प्रत्येक माणसाकडे त्याचे बारीक लक्ष असायचे. कामगारांना तो त्यांच्या कमाच्या बदल्यात योग्य मोबदला देत असे. जर कधी कोणी कामगार आजारी पडला तर त्याच्या औषधोपचाराचा खर्चही तोच स्वखुशीने करत असे. त्याचप्रमाणे आजारपणात कामगारांना आराम करायला सांगून तो त्यांना त्यांच्या रोजच्या मजुरी इतके पैसेही देत असे. त्याच्या याच स्वभावामुळे त्याने आजवर अनेक माणसे जोडली होती.
कचरु त्याच्याकडे बऱ्याच वर्षांपासून काम करत होता. कचरुच्या मुलावर कचरुप्रमाणे काम करण्याची वेळ येऊ नये म्हणून मालकाने त्याला शाळेत टाकले. त्याच्या शिक्षणाचा सर्व खर्चही तोच करत असे. घरात दोन पैसे जास्त यावेत म्हणुन कचरुची बायको सुद्धा कचरुबरोबर कामावर येत असे. इतर कामगारांच्या बायकाही कामावर येत असल्या तरी मालकाने आपल्यावर केलेल्या उपकाराच्या जणीवेने, कचरुची बायको इतर स्त्रियांच्या तुलनेत अधिक मन लाऊन काम करत असे. दिवसभर मेहनतीची कामे करुन, कसे बसे आपले पोट भरायचे आणि एक-एक दिवस पुढे ढकलत जीवन जगायचे अशी त्या सर्व कामगारांची परिस्थिती होती. अजयला आपल्या कमगारांची ही परिस्थिती पाहवत नसे म्हणून तो त्यांना आपल्या परिने शक्य तितकी मदत करत असे.
कचरुचा मुलगा दगडू तसा खुप हुशार होता. त्याला आपल्या परिस्थितीची जाणीव होती. त्यांच्या शाळेतील हुशार विद्यार्थी म्हणुन त्याची ओळख होती. कसलाही कार्यक्रम, स्पर्धा किंवा परिक्षा असली की, त्यात दगडूचा नेहमीच सहभाग असायचा. त्याची हुशारी पाहुन शाळेतील शिक्षकसुद्धा वेळोवेळी त्याचे मार्गदर्शन करायचे. दहावीच्या परिक्षेत दगडूचा त्याच्या शाळेतुन पहिला नंबर आला होता. त्यामुळे जागो-जागी दगडूचे कौतुक आणि सत्कार होऊ लागले. त्याच्या ह्या यशामुळे त्याला शिष्यवृत्ती सुद्धा मिळाली होती.
दगडू आता कॉलेजात जाऊ लागला होता. शाळेतील मित्र परिवार त्याला आता परका झाला होता. कॉलेजमधील नवीन मित्र-मैत्रिणींबरोबर तो आता रमू लागला. नवीन मित्रांच्या संगतीत राहून कॉलेजमधील तासांना हजेरी न लावताच इथे-तिथे फिरणे, मित्रांच्या संगतीत दारु-सिगारेट सारखी व्यसने करणे अशाप्रकारचे बदल त्याच्यात होऊ लागले होते. आता दगडू पूर्वीसारखा राहिला नव्हता. तो मौज-मजा करत बेफिकरीने आपले जीवन जगू लागला होता. एके काळी आपल्या परिस्थितीची जाणीव ठेऊन भविष्याची चिंता करणारा दगडू शाळेतच कुठेतरी हरवला होता.
अभ्यासातील दुर्लक्षामुळे दगडूला बारावीच्या परिक्षेत खुप कमी गुण मिळून, तो कसा-बसा पास झाला होता. आईबाप अशिक्षित असल्यामुळे, दगडूची अधोगतीकडे असलेली वाटचाल त्यांच्या लक्षात येत नव्हती. ते दोघेही दगडूच्या बोलण्यावर डोळे झाकुन विश्वास ठेवत. त्यामुळे तो त्यांना जे काही सांगत असे तेच खरे! अशीच त्यांच्या मनाची धारणा झाली होती. त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन आपल्या, नको त्या गरजा पूर्ण करण्यासाठी हल्ली तो दिवसभर घराबाहेर राहुन इथे-तिथे टवाळगिरी करु लागला होता. दगडूच्या वागण्यातील हा बदल मालकाला हळू-हळू जाणवू लागला होता.
त्यादिवशी रात्रीचे बारा वाजले, तरी मालक इमारतीचे काम पहात तिथेच थांबला होता. कचरु, त्याची बायको आणि इतर आठ-दहा कामगार तिथे काम करत होते. तेवढ्यात सकाळपासून घराबाहेर असलेला दगडू तिथे आला. चालताना त्याच्या झेपा जात होत्या. आपल्या शरीराचाही त्याला तोल सावरता येत नव्हता. समोर बसलेल्या मालकाला बघुन तो त्याच्या जवळ न येता लांबूनच पळ काढण्याच्या प्रयत्नात होता. पण तितक्यात मालकाची त्याच्याकडे नजर गेली. आपल्याच दिशेने चालत येणारा दगडू आपल्याला बघुन मागे वळला, याचे त्यालाही आश्चर्य वाटले होते. म्हणुन त्याने दगडूला हाक मारली. तसा तो मालकाकडे पाहू लागला; पण त्याची नजर मात्र खाली जमिनीवर खिळली होती. हळू आवाजात तो स्वत:शीच काहीतरी बडबडत होता. त्याच्या अशा विचित्र वर्तनामुळे मालकाला त्याची शंका आली म्हणून तोच त्याच्या दिशेने चालत गेला. दगडूच्या जवळ जाताच त्याच्या तोंडातून दारुचा भयंकर वास येऊ लागला. त्या दिवशी त्याने इतकी दारु घेतली होती की, त्याला आपल्या पायावर निट उभे रहाणे सुद्धा कठीण जात होते. त्याच्या सारख्या झेपा जात होत्या. त्याची अशी अवस्था बघुन चिडलेल्या मालकाने त्याला दारु पिण्यामागचे कारण विचारले, त्यावर "तुला काय... कराय...च...य...य.. तू कोण... म...ला विचार...नाराऽऽऽ?" असा तो तुटक-तुटक बोलू लागला. मालकाला त्याचे बोलणे ऐकुन खुप राग आला होता. रागाच्या भरात त्याने दगडूच्या एक थोबाडीत लाऊन दिली. तसा दगडू बेभान होऊन मालकालाच शिव्या देऊ लागला. आणि मालकाला मारण्यासाठी त्याने त्यावर हातही उगारला. परंतू मालकाने वेळीच त्याला तसे करण्यापासून रोखलेे. त्याच्या शिव्यांचा आवाज ऐकुन दगडूच्या आई-बापाबरोबरच इतर कामगारही तिथे जमा झाले. दगडूला पहाताचक्षणी तो दारु पिऊन आलेला आहे हे त्यांच्याही लक्षात आले. मालकाने त्यांना घडलेल्या सर्व प्रकराबद्दल सांगितले तेव्हा कचरुने घडलेल्या प्रकाराबद्दल मालकाची माफी मागीतली. परंतू ह्या प्रकारामुळे मालक मनातून खुप दुखावला गेला होता. परिस्थतीमुळे ह्या मुलावरही कचरुप्रमाणे मोल-मजुरीची कामे करुन पोट भरण्याची पाळी येऊ नये असे त्याला मनापासून वाटत होते. चांगल्या भविष्यासाठी ज्याला शाळेत टाकले, ज्याच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च केला, ज्याच्या इतर गरजा पूर्ण करण्यासाठी त्याच्या आईबापाला वेळोवेळी मदत केली, तोच मुलगा आज व्यस्थित शिक्षण घेणे सोडून व्यसनांच्या इतका आहारी गेला होता की, त्याला यामागचा जाब विचारताच, त्याला ज्याच्यामुळे हे स्वतंत्र उपभोगता आले त्या मालकालाच शिव्या देऊन त्याच्यावर हात उचलण्याचा प्रयत्न त्याने केला होता. मालकाने त्याच्या कुटुंबावर केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवता तो अविचाराने आपल्याला हवे तसे जीवन जगू लागला होता. ही गोष्ट मालकाच्या मनाला लागली होती. त्यामुळे तो आता मालकाच्या मनातुन कायमचा उतरला होता. दगडू आपल्या जीवनाचा मार्ग चुकला होता म्हणून, आपल्याच कर्मामुळे भलाई करणाऱ्यापासून कायमचा मुकला होता.