तब्बल तीन महिन्यानंतर आता कुठे तो गाढ, बेशुद्धावस्थेतून बाहेर आला होता. शहरातील नामांकीत इस्पितळामध्ये तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीत त्याच्यावर उपचार सुरु असूनही त्याला शुद्धीवर येण्यासाठी इतका दीर्घ काळ जावा लागला होता. ह्या तीन महिन्यामध्ये त्याच्या घरच्यांना, नातेवाईकांना मित्रांना आणि ओळखीच्या लोकांना त्याचा जीव वाचवण्यासाठी किती धावपळ किती खटपटी कराव्या लागल्या होत्या याची त्याला जराही जाणीव नव्हती. ती इतक्यात होणारही नव्हती. त्याचा जीव वाचवण्याकरिता प्रत्येकाने आपापल्या परिने शक्य तितके सहाय्य केले होते. त्यात कोणी पैशांचे सहाय्य तर कोणी डॉक्टरांची ओळख काढुन वेळप्रसंगी त्यांच्या हाता-पाया पडून त्याच्या उपचारासाठी लागणारा खर्च कमी केला होता. तर कोणी त्याच्या काळजीने दिवस रात्र झुरत होते. घरातल्यांना अन्नपाणी गोड लागत नव्हते. रात्रं-दिवस त्याचेच विचार सतत त्यांच्या मनात घोळत होते. इतका मोठा जीवघेणा प्रसंग! बऱ्याच जणांनी, तर त्याच्या जगण्याची आशाच सोडली होती. परंतु त्याच्या माणंसानी मात्र अजुनही प्रयत्न सोडले नव्हते. आजवर त्यांनी घेतलेले परिश्रम आता कुठे फळास आले होते.
नेमके काय घडले होते, त्याच्या बरोबर? हे आठवले की, आजही मन सुन्न होते. तर काही वेळा हेच मन आजच्या काळातील खोट्या आणि स्वार्थी प्रवृत्ती विरुद्ध बंड पुकारण्यासही लगेच तयार होते. स्वत:च्या स्वार्थासाठी राजकरण्यांनी, पुढाऱ्यांनी समाजाला दाखवलेल्या चुकीच्या दिशेचे हे एक जिवंत उदाहरण होते. पैशांच्या बळावर दिखाऊपणाचे सण आणि उत्सव साजरे करुन संस्कृती जपण्याची भाषा करण्याऱ्या राजकारण्यांची किव येऊ लागते. त्याचप्रमाणे पैशांच्या लालसेपोटी आणि शुल्लक प्रलोभनांच्या आहारी गेलेल्या तरुण पिढीची चिंता वाटू लागते. भरपूर पैसे खर्च करुन, संस्कृती जपण्याच्या नावाखाली आपला अधिकाधीक प्रचार कसा करता येईल याची गणितं जुळवणाऱ्या राजकारण्यांना सणांचा अर्थात तरी माहित असतो का? हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. सण साजरे करण्यामागची मुळ भूमिका न समजून घेता, आपापल्या संकल्पनेप्रमाणे केवळ आपल्या शुल्क महत्वकांक्षेपोटी, स्वार्थापोटी सण साजरे करुन अर्थाचा अनर्थ करणाऱ्या मंडळीची चीड येऊ लागते. अशाप्रकारे दिखाऊपणाचे सण साजरे करण्याच्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या चढाओढीला, प्राप्त झालेल्या विकृतीपूर्ण स्पर्धेच्या स्वरूपात साजरा होणारा एक सण म्हणजे...दही हंडी उत्सव.
सणांच्या निमित्ताने, समाजातील विविध स्थरातील लोकं एकत्र येऊन त्यांच्या विचारांची देवाण-घेवाण व्हावी, त्यांच्यातील एकोपा टिकून रहावा याकरीता सार्वजनिक स्वरुपात सण साजरे करण्याची प्रथा सुरु झाली होत ह्या गोष्टीचा बोध आजच्या काळातील फक्त दिखाऊपणासाठी भव्य स्वरुप धारण केलेल्या सणांकडे पाहून होत नाही. त्यामुळे या सणांमागची मुळ भुमिकाच नष्ट झाल्याचे आजची माणसे अगदी सहजतेने विसरु लागली आहेत. म्हणुनच तर जास्तीत-जास्त थर लावणाऱ्या पथकाला लाखांचे बक्षीस आणि त्यातूनच निर्माण झालेली...अमुक लाखांची दही हंडी तमूक लाखांची दही हंडी, या प्रकारच्या जनमाणसांत रुजु पाहणाऱ्या संकल्पना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. ज्यात सण-उत्सवांचे महत्त्व बाजुला राहुन त्याजागी पैशांचीच समीकरणे आणि त्या निमित्त मजा, मस्ती आणि थिल्लरपणाच जास्त दिसू लागला आहे. त्यात सर्वात दुर्दैवी गोष्ट म्हणजे याच अर्थहीन गोष्टींना आकर्षित झालेली आजची...अविचारी तरुण पिढी! ह्या आकर्षणापोटी आणि हौसेपोटी महिनोन्महिने थरावर थर लावून सराव करणे, दही हंडीच्या दिवशी मोठया संख्येने ट्रकांमध्ये बसून रस्त्यावरुन आरडाओरड करणे, नको त्यांची थट्टा मस्करी करण्याचे वाढलेले निंदनीय प्रकार...अशाच एका दही हंडी उत्सवाचा, त्याच्यासाठी दुर्दैवी ठरलेला तो दिवस! ह्या हांडीला अमूक थरांची सलामी देऊन अमूक बक्षीस मिळवायचे आणि मग दुसऱ्या मानाच्या हंडीच्या मडंळात जाऊन तिथेही जास्तीत-जास्त थरांची सलामी देऊन बक्षीस मिळवायचे ह्या उद्देशाने त्यांच्या मंडळातील मुलांचे ट्रक मधून इथून-तिथे फिरणे सुरु झाले .चार ठिकाणी जाऊन आल्यावर पाचव्या ठिकाणी त्यांच्या मंडळाने पुढील हंडीसाठी सात थर लावले. परंतू जर त्यांना तिथे आठ किंवा नऊ थर लावता आले असते, तर ते मोठ्या पारितोषिकाचे मानकरी ठरले असते. म्हणुन ते सराव नसतानाही ते त्याठिकाणी निदान आठ थर लावण्याच्या प्रयत्नात होते.
त्यादिवशी सकाळपासूनच तो घराबाहेर होता. आपल्या मित्र मंडळींबरोबर इथून तिथून फिरण्याच्या नादात त्याला खाण्या-पिण्याचेही भान उरले नव्हते. आता फक्त अजून एक थर...मग ते लाखांचे बक्षीस आपले हाच विचार सर्वांच्या मनात घोळत होता. ह्या संधीचे सोने करण्यासाठी कसलाही विचार न करताच त्याने सर्वात वरच्या थरावर गोविंदा म्हणून जाण्याचे आव्हान स्वीकारले. बघता-बघता थरावर थर लागले. त्यात कित्येकदा ते खाली देखील कोसळले, तरी त्यांची जिद्द कायम होती. 'काहीही झाले तरी प्रयत्न करणे सोडायचे नाही' ही गोष्ट त्यांनी मनाशी पक्की केली होती. पुन्हा त्यांचे थरावर थर लागले. सातव्या थरावरुन आठव्या थरावर जाण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. नेमक्या याच प्रयत्नात असताना सकाळपासून उपाशी पोटी झालेल्या धावपळीमुळे त्याला भोवळ आली. त्यावेळी सर्वजण बेसावध असलेल्याने त्यामुळे कोणालाही काही कळण्याच्या आतच त्याचा सातव्या-आठव्या थरावरुन तोल जाऊन तो क्षणार्धात जमिनीवर आदळला. इतक्या उंचावरुन खाली कोसळल्याने त्याच्या मेंदूला जबर दुखापत झाली.
त्याच्या घरची परिस्थिती तशी बेताची. वडील रिक्षाचालक तर आई चार पैसे अधिक मिळावे याकरीता मोलकरीन म्हणून चार घरची धुणी भांडी करत होती. त्याच्या व त्याच्या भावंडांच्या शैक्षणिक व इतर गरजा पूर्ण करण्याकरीता त्यांची सतत धावपळ सुरु असे. परंतु ह्याला त्याची जराही जाणीव नव्हती. दिवसभर रिकामटेकड्या मुलांबरोबर इथे-तिथे फिरणे, नको त्या ठिकाणी टिंगल टवाळक्या करणे कुठल्याही राजकारण्यांच्या नादाला लागून त्यांच्या इशाऱ्यावर नाचणे ह्या सर्व गोष्टी करण्यातच त्याला शहाणपण वाटे. दिवसेंदिवस हा मुलगा अधिकच आवारा बनत चालला आहे हे चित्र त्याच्या आईबापाच्या डोळ्यासमोर स्पष्ट होते. त्याच्या अशा वागण्यामुळे त्यांच्या घरी सतत भांडणेही व्हायची. तरी हा काही सुधारणाऱ्यातला नव्हता. परंतू त्या दिवसाची गोष्ट थोडी वेगळी होती. त्याच्या घरच्यांनी त्याने दही हंडीसाठी घेतलेली मेहनत आपल्या डोळ्यांनी पाहिलेली असल्याने निदान ह्या मार्गाने तरी घरी पैसे येतील या आशेने त्याला घरातुन मुकपणे संमती मिळाली होती. त्यांच्या याच मुक संमतीमुळे त्यांच्यावर पुढे केवढा मोठा अनर्थ ओढवणार आहे याची ते कधी कल्पनाही करू शकत नव्हते.
तीन महीने त्याच्यावर चाललेल्या उपचारासाठी त्यांना आपले रहाते घर विकून भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली होती. आत्तापर्यंत याच्या-त्याच्याकडून उधारीवर पैसे घेऊन त्यांच्या डोक्यावर कर्जाचा मोठा डोंगर झाला होता. कित्येकांच्या उपकाराच्या ओझ्याखाली त्यांची मान कायमची खाली गेली होती. बरे इतके सर्व करुनही मेंदूच्या गंभीर जखमेमूळे तो कायमचा वेडा झाला होता. शुद्धीवर येऊनही...शुद्ध नसल्यासारखा! आता सण काय? आणि उत्सव काय? त्याच्यासाठी सर्वच दिवस सारखे! ह्यासर्व गोष्टींसाठी जबाबदार असणारा पुढारी जेव्हा इस्पितळात त्याला बघायला आला तेव्हा त्याची खोटी नाटकीय वर्तणूक आणि दिखाऊपणाची काळजी...कोणाच्यातरी मनातील ज्वालामुखीचा उद्रेक करण्यास कारणीभुत ठरली. त्या ठिकाणी त्याची चाललेली वायफळ बडबड अपघात ग्रस्त मुलाच्या पित्याला सहन होणारी नव्हती. रागाच्या भरात त्याने कसलाही विचार न करता त्या पुढाऱ्याच्या थोबाडीत मारुन त्याला तिथून हाकलवून दिले. तेव्हा कुठे हा सर्व प्रकार वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पसरला आणि झोपलेला समाज काही अंशी जागा झाला. तरी अजुनही समाजाला पुरेसे संस्कृतीचे भान यायला बराच वेळ जावा लागणार आहे. क्वचित घडणाऱ्या घटनांकडे दुर्लक्ष करण्याची सवय असलेला निद्राधीन समाज, भानावर येण्यासाठी कदाचित यापेक्षाही काहीतरी मोठे भयंकर घडण्याच्या प्रतिक्षेत असावा...