ट्रेन सुरु झाली. कसे बसे धावत-पळत ट्रेनच्या दरवाज्याजवळील दांड्याला पकडून एका साठ-पासष्ठ वयाच्या वृद्धाने ट्रेनमध्ये प्रवेश केला. ट्रेनमध्ये प्रवाशांची बरीच गर्दी असल्यामुळे त्याला दरवाजाजवळ उभे राहून प्रवास करावा लागणार होता. आयुष्यात पहिल्यांदाच त्याने एवढ्याशा जागेत जमा झालेली इतकी प्रचंड गर्दी पाहिली असावी. त्या गर्दीत त्याचा जीव घुसमटू लागला होता. अधिक काळ तो त्या गर्दीत राहूच शकला नसता. कदाचित त्यामुळेच बहुतेक त्याचा ट्रेनने प्रवास करण्याचा निर्णय बदलला. काहीच वेळाने आलेल्या पुढच्या स्थानाकावर तो उतरला आणि फलाटावरील बाकड्यावर बसून मोकळा श्वास घेऊ लागला.
त्या बाकड्यावर बसून तो सर्वत्र आपली नजर फिरवू लागला. जसा काही तो कुठल्यातरी दुसऱ्याच जगात आला आहे अशा प्रकारे त्या स्थानकावरील येणाऱ्या जाणाऱ्या गर्दीकडे तो पाहू लागला. तिथुन ये-जा करणाऱ्या बहुतेक सर्वांच्याच हातात असलेले मोबाईल हा त्याच्या कुतूहलचा विषय होता. 'गावातील काही श्रीमंत मंडळी सोडली, तर इतर कोणाच्याही हातात सहजा-सहजी न दिसणारी ही वस्तू ह्या शहरात मात्र बहुतेक जणांकडे आहे. त्यावरुन इथे बरेच श्रीमंत लोकं राहतात' असाच काहीसा त्याच्या मनाचा अंदाज होता. त्याच्या मालकाकडेही अशाच प्रकारचा एक मोबाईल होता. पण त्याने त्याला अद्याप हातही लावला नव्हता. त्याचा वापर कसा करायचा हे माहित नसलेल्या त्याच्यासारख्या गरीब व भोळ्या-भाबड्या आशिक्षितांना 'लाईट पेटणाऱ्या ह्या यंत्राचा शॉक लागतो' असे त्याच्या मालकाने बजावून सांगितल्यापासून, त्याची मोबाईल सारख्या यंत्राला हात लावण्याची हिंम्मत होणे शक्य नव्हते. आतापर्यंत 'हे यंत्र हाताळणे खुप कठीण असावे' असा त्याचा समज होता. परंतू इथे शहरात तर बहुतेक जणांच्या हातात ते यंत्र पाहून 'शहरात खरोखरच खुप बुद्धीमान लोकं राहतात'. यावर त्याचा विश्वास बसला. तसाही त्याने मालकाच्या मोबाईलला हात लावण्याचा प्रश्नच उदभवत नव्हता. त्याला कुठे कोणाला फोन लावायचा होता? त्याचं होतचं कोण ह्या जगात?
तो बसलेल्या बाकड्यापासून काही अंतरावरच त्याला एक दुकान दिसले. तसा तो तिथुन कसा बसा उठला. हळू-हळू पावले टाकत त्या दुकानापर्यंत पोहोचला आणि त्या दुकानाचे निरीक्षण करण्यात रमला. दुकानात विक्रीसाठी ठेवलेल्या खाद्यपदार्थांची नावे त्याला माहित नव्हती. ''ओ बाबा, काय हवयं?'' दुकानदाराने त्याला प्रश्न केला. त्यावर ''नाही बघतोयऽऽ फक्त...काय मिळेल खायला?'' त्यावर दुकानदाराने दोन तीन खाद्यपदार्थांची नावे सांगितली. तसा तो विचारात पडला. काहीसा विचार करुन ''समोशा मिळलं का?'' म्हणून त्याने विचारले.
''काय? समोसा का... नाही इथे समोसा नाही मिळत.''
''बरंऽऽ मग... हेच दे.'' त्याने बोट दाखवून दुकानाच्या काचेच्या कपाटातील एक पदार्थ दाखवला. तसे लगेच दुकानदाराने तो पदार्थ त्याच्यासमोर ठेवला. क्षणाचाही विलंब न करता त्याने तो पदार्थ पटापट खाण्यास सुरुवात केली. दोन मिनिटातच त्याने तो संपवूनही टाकला. त्यानंतर तो, दुकानदाराने दिलेले पाणी गटागट पिऊ लागला. तेवढ्यातच ''चहा देऊ का?'' म्हणून दुकानदाराने प्रश्न केला.
''हां... दे बाबा एक कपभर चहा दे.'' तो लगेचच उद्गारला. दुकानदाराने लगेचच त्याला चहा दिला. त्याचा चहा पिऊन झाल्यावर दुकानदार आता त्याच्याकडून मिळणाऱ्या पैशाची वाट पाहू लागला. परंतू तो मात्र आता इकडे-तिकडे बघत आपल्या रुमालाने तोंड पुसण्यात दंग होता. काही क्षण वाट पाहून झाल्यावर, न राहून दुकानदाराने ''तीस रुपये झाले तुमचे'' म्हणून त्याला सांगितले. ते ऐकताच, ''काय? तीस रुपए... इतके नाय माझ्याकडं. थांब बघतो किती हायतं ते...'' एवढे बोलून त्याने बऱ्याच वर्षांपासून वापरून जीर्ण झालेल्या आपल्या बॅगमध्ये हात टाकला. त्यातुन त्याने दहा रुपयाची एक नोट आणि काही सुट्टे पैसे बाहेर काढले. ''इतकचं हायतं. ते घे बाबा.'' असे म्हणून त्याने ते पैसे दुकानदारासमोर ठेवले. हे पाहून दुकानदार प्रचंड खवळला. ''च्या आय... (त्याने दोन-तीन शिव्या दिल्या.) पैसे नाय तर कशाला येता रे फुकट खायला.'' म्हणून तो त्याच्यावर खेकसला. त्यावर ''फुकट कुठं खाल्ले बाबा? माझ्याकडं होत तेवढ सगळं दिलं ना तुला.'' तो थोडासा खजील होऊन म्हणाला. ''बरं चल निघ इथुन आता. परत तोंड दाखवू नको...'' दुकानदाराच्या मुखातून तुच्छतेने बाहेर पडलेले हे उद्गार ऐकुन तो वृद्ध तिथुन निघण्याच्या तयारीतच होता. तेवढ्यात तो दुकानदार स्वत:शीच ''याच्या आय... कुठुन आलयं हे थेरडं सकाळ-सकाळी डोक्याची...'' असं बरचं काही बोलत असताना, ते ऐकुन ''ये दादा पैसं नाय म्हनून ऐकुन घेतोय. पन शिव्या देऊ नको हां...'' तो थोडासा रागाने म्हणाला. यावर ''ये तू आता मला शहाणपणा शिकवणार काय? आता गप्प निघतो की देऊ एक लाऊन'' हाताचा इशारा करत तो तुच्छतेने म्हणाला. ''जातो रे बाबा... तुझी पण वेळ येलं कदीतरी वेळ कुठं सांगून येते?'' त्याच्या तोंडून आपसूकच बाहेर पडले. ते ऐकुन दुकानदाराचा पारा भरपूर चढला ''हेच्या आय...काय रे... कसली वेळ येलं माझ्यावर... म्हणालास?'' त्याने एका हाताने त्या वृद्धाचा सदरा पकडून त्याला प्रश्न केला आणि त्याच्या थोबाडीत एक झापड लाऊन दिली. ''तुझ्या... एक तर तुला कमी पैशात खाऊ घातलं पण काय रुबाब रे तुझा... चल निघ...''(शिव्या) दुकानदाराकडून खाल्लेली झापड आणि झालेल्या अपमानामुळे तो वृद्ध आता त्याला काही बोलण्याच्या स्थितीत नव्हता. तो मुकाट्याने तिथुन चालता झाला. आणि आपल्या आधीच्याच जागेवर येऊन शांतपणे बसला.
त्या वृद्धाबरोबर घडलेला सर्व प्रकार आतापर्यंत त्याच दुकानात उभे राहून खाणाऱ्या ज्या व्यक्तीने पाहिला होता, तो त्या वृद्धाच्या जवळ आला. त्याने आपल्या खिशातुन शंभर रुपयाची एक नोट काढुन त्या वृद्धाच्या हातावर ठेवली. परंतू वृद्धाने ती नोट स्वीकारण्यास नकार दिला. ''जीव गेला तरी चालेल पन अजून फुकटचं नको बाबा.'' असे म्हणून त्याने त्या व्यक्तीसमोर हात जोडले.
पुढील चार दिवस तो म्हातारा त्या व्यक्तीला त्याच स्टेशनवर कुठे ना कुठे बसलेला दिसला. परंतू, पाचव्या दिवशी मात्र तो त्याला तिथे झोपलेला दिसला...तो कायमचाच! गेली पाच दिवस तो उपाशी राहिला. पण त्याने कोणाकडूनही काहीही घेतले नाही. ही गोष्ट त्याला त्याच दुकानदाराकडून समजली होती. पाच दिवसांपूर्वी त्यांच्यात जे काही घडले त्यामुळे त्या वृद्धाने आपल्या मनाशी केलेला त्याचा निर्धार खरोखरच खरा करुन दाखवला होता; या गोष्टीचा त्या दुकानदाराला आता पश्चाताप होत होता.
तो कोण होता, कोठुन आला होता व त्याला कुठे जायचे होते, कुठल्या परिस्थितीमुळे त्याच्यावर अशी रेल्वे स्थानकावर राहण्याची वेळ आली हे कळायला त्यावेळी कुठलाही मार्ग नसला तरी, परिस्थितीपुढे लाचार होऊन, पोटाची खळगी भरण्याकरिता स्वाभिमान गमावून उपेक्षितांचे जिणे जगण्यास तो अजून तयार झाला नव्हता हे मात्र खरे!