दुपारचे बारा-साडेबारा वाजले असतील. रखरखीत ऊन पडले होते. झेरॉक्सच्या दुकानात, घाई-गडबडीत असलेले एक मध्यमवयीन जोडपे दोन-तीन कागदपत्रांची झेरॉक्स मारुन गेले. आणि दहा मिनिटाने पुन्हा त्याच दुकानात घामाघुम होऊन परत आले. ह्यावेळी नवऱ्याच्या हातात बँकेत खाते सुरु करण्यासाठीचा अर्ज होता. तर बायकोच्या हातात त्यासाठी लागणारी इतर कागदपत्रे होती.
त्यांना बँकेत नवीन खाते सुरु करण्यासाठीच्या अर्जावर बँकेतून आपले फोटो चिकटवून आणायला सांगितले गेले होते. बायकोकडे तिचे पुरेसे फोटो होते. परंतू नवऱ्याकडे मात्र स्वत:चा फक्त एकच फोटो होता. जो त्याने आधीच त्या अर्जावर चिकटवलेला होता. ह्या कामासाठी पुन्हा फोटो स्टुडियोत जाऊन फोटो काढायचा तर त्यासाठी पन्नास साठ रुपये खर्च करावे लागले असते आणि फोटोंसाठी पुन्हा दुसऱ्या दिवसाची वाटही पहावी लागली असती. 'एखाद्या फोटोला स्कॅन करुन त्या फोटोची प्रिंट काढता येते' हे त्यांना माहित होते. म्हणुनच ते पुन्हा त्या दुकानात आले होते. अशाप्रकारे फोटो तयार करायला किती पैसे लागतील विचारल्यावर दुकानदाराने 'अमूक' फोटोंचे चाळीस रुपये म्हणून सांगितले. दुकानदाराने सांगितलेले चाळीस रुपये त्यांच्यासाठी अधिक होते. वीस रुपयात काय येतील ते दोन चार फोटो द्या म्हणून त्यांनी सांगितले.
त्यावर दुकानदाराने तसे करता येत नाही सांगून आपली अडचण सांगितली. दुकानदाराने 'अमूक' फोटोंचे 'अमूक' पैसे, 'अमूक' कागदावर 'अमूक' इतके फोटो मिळतील. म्हणून सांगितल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील रंगच बदलला. तरीही एकदा प्रयत्न करुन बघू...या विचाराने 'आम्ही गरीब माणसे...आम्हांला इतके पैसे परवडणार नाहीत तीन दिवसांपासून बँकेच्या कामामुळे आधीच कामाच्या तीन दिवसांचे नुकसान झाले आहे. कृपा करुन वीस रुपयात येतील तेवढ्या फोटोंची प्रिंट काढून द्या' म्हणून तो माणूस दुकानदाराला विनवणी करु लागला.
त्या माणसाच्या अंगावरील कपड्यांवरुन आणि अनवाणी पायांवरून त्याच्या गरीबीचा अंदाज येत होता. त्याची ही अवस्था त्याच्या आर्थिक स्थितीची साक्ष देत होती म्हणा! त्याची ती दशा बघून दुकानदार त्यांना वीस रुपयात फोटो तयार करून देण्यासाठी तयार झाला. दुकानदाराने दाखवलेली माणूसकी पाहून त्याला भरुन आले. दोन-तीन दिवसामध्ये आपल्याबरोबर घडलेल्या घटना तो त्या दुकानदाराला आपणहून सांगू लागला.
तो कुठल्यातरी छोट्याशा कंपनीत कामाला असून, घरोघरी जाऊन सेंट व अत्तर विकण्याचे काम करणारा होता. तर त्याच्या बायकोला कुठेतरी नोकरी मिळून नुकताच महिना झाला होता. त्या कंपनीकडून तिला आपल्या नावाचा, पगाराचा धनादेश मिळाला होता. बँकेत तीच्या नवऱ्याचे खाते होते पण तीचे स्वतःचे खाते नव्हते. तीला मिळालेला तीच्या नावाचा धनादेश तिच्याच खात्यात टाकावा लागणार...ही गोष्ट सुद्धा हल्लीच त्यांना माहीत झाली होती. यावरुन त्यांच्या शिक्षणाचा अंदाज येत होता. त्या धनादेशाचे पैसे मिळवण्यासाठी सकारी बँकेत खाते उघडावे लागेल असे त्यांच्या परिचयाच्या कुठल्यातरी शहाण्याने त्यांना सांगितले होते. तेव्हापासून त्यांच्या मनस्तापाला सुरुवात झाली... ती आजपर्यंत! ते दोघेही हा मनस्ताप सहन करत होते.
बँकेने दिलेला नविन खाते सुरु करण्यासाठीचा अर्ज भरता येणे, त्या दोघानांही शक्य नव्हते. तो अर्ज कोणीतरी आपल्याला भरुन देईल या उद्देदेशाने तशा व्यक्तीचा ते दोघेही त्याच बँकेत शोध घेऊ लागले. बँकेत आपापल्या कामांसाठी उभ्या असलेल्या सात-आठ जणांकडे त्यांनी तो अर्ज भरुन देण्यासाठी विनवणी केली. परंतू एकही व्यक्ती त्यांना तो अर्ज भरुन देण्यासाठी तयार झाली नाही. जो-तो आपापल्या कामात व्यस्त! आज इतरांकडे लक्ष द्यायला वेळ तरी कोणाकडे शिल्लक आहे म्हणा...आणि वेळ जरी असला तरी आपला काहीच फायदा नसताना तो इतरांसाठी खर्च करायला तयार होणाऱ्यांची संख्या किती या गोष्टीचा त्यांना चांगलाच अनुभव आला होता. विचारलेल्यांपैकी सगळ्यांचा नकार ऐकुन, बँकेच्या ज्या ठिकाणावरुन त्याला तो अर्ज मिळाला होता, त्याच ठिकाणी जाऊन 'मला हा अर्ज भरता येत नाही' म्हणून तो सांगून आला. त्यावर बँकेचा कर्मचारी त्याच्यावर मोठ्याने खेकसला 'अर्ज भरता येत नाही मग खाते तरी कशाला हवे आहे?' त्याच्या प्रश्नाने हा बिचारा निरुत्तर झाला होता. 'याला काही बोललो तर हा पुन्हा आपल्यावर ओरडायचा' याविचाराने तो तिथे शांतपणे उभा होता. त्याच्या याच शांतपणे उभे राहण्याने बँकेच्या कर्मचाऱ्याच्या दृष्टपणाला अधिकच बळ मिळाले. ''लिहता वाचता येत नाही आणि आले बँकेत खाती उघडायला!'' आपसूकच त्याच्या तोंडून हे उद्गार बाहेर पडले. त्याच्या बोलण्याने ते दोघे नवरा बायको अधिकच खजिल झाले. दुसऱ्या दिवशी कोणाच्यातरी हाता-पाया पडून त्यांनी तो अर्ज कसाबसा भरुन घेतला. बँकेच्या त्या अर्जासोबत जोडाव्या लागणाऱ्या इतर कागदपत्रांची जमवाजमव करुन त्यांनी बँक गाठली. खाते उघडण्यासाठी असलेला तो साधा अर्ज देण्याकरिता जवळपास तासभर रांगेत उभे राहिल्यानंतर त्यांचा नंबर आला. तेव्हा बँकेच्या कर्मचाऱ्याने त्यांचा अर्ज तपासून झाल्यावर त्यात त्यांनी न भरलेली माहिती आणि तो अर्ज भरताना त्यात झालेल्या चुका त्यांच्या निदर्शनास आणून पुन्हा नवीन अर्ज भरा म्हणून सांगितले. बँकेच्या कर्मचाऱ्याने सांगितल्याप्रमाणे अर्ज भरताना त्यात बऱ्याचशा चुका झाल्या असतील असे मानून ते दोघे मुकाट्याने नवीन अर्ज घेऊन घरी आले. घरी आल्यावर त्यांच्या डोळ्यासमोर सारखा-सारखा तोच अर्ज येऊ लागला; इतके ते दोघे त्या अर्जाला कंटाळले होते. त्या दिवशी पुन्हा दुसऱ्या कोणालातरी विनवणी करुन त्यांनी कसा-बसा तो अर्ज त्याच्याकडून भरुन घेतला आणि पुढच्या दिवशी सकाळ-सकाळीच त्यांनी बँक गाठली. ह्या वेळी बँकेच्या कर्मचाऱ्याने अर्जारोबर जोडाव्या लागणाऱ्या कागदपत्रांची मागणी करत, 'हे आणा' 'ते आणा' असे सांगून तीन-चार वेळा त्यांना धावपळ करयला लावली. त्यासर्व कागदपत्रांची जमवा-जमव झाल्यानंतर शेवटी फोटोंवर त्यांचे गाडे पुन्हा अडले. त्याचे हे सर्व बोलणे ऐकुन विचारमग्न झालेल्या दुकानदारावर एक क्षणभर तरी स्तब्धच होण्याची वेळ आली होती. सरकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना शुल्लकशा कामासाठी तीन दिवसापासून दिलेल्या मनस्तापानंतर त्यांची झालेली दयनीय अवस्था बघून अश्रु गाळावे की, ह्या माणसांच्या परिस्थितीचा आणि त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांना सहाय्य करणे सोडून, त्यांना वारंवार बँकेच्या चकरा मारायला लावणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची निदनीय वर्तणूक बघुन, डोळ्यात क्रोधाग्नी निर्माण करावा हे त्याच्या सुन्न झालेल्या मनाला क्षणभर कळेनासे झाले होते. आतापर्यंत फोटोही प्रिंट झाले होते. ते मिळाल्यावर ठरल्याप्रमाणे दुकानदाराला वीस रुपये देऊन ते जोडपे लगबगीने तिथून निघुनही गेले, तरी त्यापुढील बराच वेळ, अशा गरीबांना वेठीस धरणाऱ्या सरकारी बँका खरोखरच ग्राहकांच्या सेवेसाठी आहेत का? याप्रश्नाने त्याला भांबावून सोडले होते.