आकाशापासून अलिप्तता शिका
आकाश कोणाला प्रतिबंध करीत नाही. आलेत या, जाता जा; असे जणू ते मूकपणाने सांगत असते. सुख ना दु:ख. केवळ अनासक्तता, निर्विकारता. श्रीअरविंदांच्या ‘योगासंबंधी सूचना’ पुस्तकरूपाने प्रसिद्ध आहेत. त्यांत ते म्हणतात: “मन शून्य करण्याचा, केवळ रिकामे करण्याचा अभ्यास करावा. काही नाही. विचार दूर करीत आहोत, मानवी बुद्धीची खोली झाडून साफ करीत आहोत, ही भावना, ही जाणीवही नसावी. काहीच नाही. नाही हेही नाही. ज्याप्रमाणे आकाशात पक्षी उडतात; धूळ उडते; धूर येतो; ढग येतात; परंतु हे सारे जाऊन मागे आकाश निळे असते; त्याचप्रमाणे आपण मनाच्या आकाशात, हृदयाच्या, बुद्धीच्या आकाशात करावे. आलेत या, गेलेत जा. मी सारे झाडून मोकळा आहे., बुद्धीवर, हृदयावर बोजा पडणार नाही. आकाशापासून हा अलिप्तता शिका.” अशा अर्थाचे विचार त्यात आहेत. आकाश हा सारा बोजा आपल्या छातीवर घेत नाही. परंतु आपले मन बघा. आपण असे भारावून गेलेले असतो. मनावर किती बोजा. कच-याचे ढीग डोक्यावर घेऊन जणू आपण उभे असतो. मान-अपमान, आशा-निराशा, सुख, नाना दु:खे, नाना ईच्छा, नाना वासना-कल्पना, नाना भावना, चिंता. सारे जणू हृदयाशी धरून बसतो. आणि मग कुढत बसतो. दडपले गेलो असे ओरडतो. यातून निसटण्याचा मार्ग एकच, की या
सा-या गोष्टी थोडा वेळ तरी हाकलून द्यायला शिकले पाहिजे. अनासक्तता, नि:संगता शिकायला हवी. आकाशाची हीच मोलाची शिकवण आहे. समाजात वागताना, वावरताना वादळे येणार; टीकांचे विद्युत्पात होणार; उपहास, विडंबन, अपवाद, निंदा यांची धुळवड होणार. परंतु या सा-या गोष्टी दूर ठेवून मनाचा तोल नि शांती निळ्या आकाशाप्रमाणे ठेवायला शिकणे ही यशाची, आनंदाची, शांतीची गुरुकिल्ली आहे.

तेथे आपपर-भाव नाही
आकाश अलिप्त आहे. नि:संग आहे तसेच मोकळे आहे. ते आपले पंख मिटीत नाही, जणू अधिकच पसरते. आकाशाप्रमाणे मोकळे असावे. आत, गाठीचे काही नाही. लपवालपव नाही. निःस्वार्थ मनुष्यच हे करु शकतो. कारण त्याला इतरांना वगळून काही मिळवायचे नसते. मोकळेपणा हवा असेल तर अधिकाधिक नि:संग नि नि:स्वार्थ व्हायला हवे. आकाशाजवळ काही नाही. ते केरकचरा, धूळधुरोळा जवळ ठेवीत नाही;  त्याचप्रमाणे सूर्य, चद्र, ता-यांनाही जवळ घेत नाही. धूळ नको, हीरे-माणकेही नकोत. अशी वृत्ती झाली म्हणजे मोकळेपणा येतो. मग सारे मित्र. सर्वांना जवळ घेता येते. आकाशाला आपपर नाही. गरुडाने भरारी मारावी. चिमणीने भुरभूर करावी. सजल मेघाने लोंबावे, निर्जल मेघाने गर्जावे. सर्वांना प्रवेश सर्वांना परवानगी. सर्वांना जवळ घ्यायला अनंत हात सदैव सिद्धच आहेत!

आकाशाप्रमाणे मोकळे, व्यापक, नि:संग व्हावे असे मला वाटते. सर्वांना भेटावे. सर्वांपासून दूर जावे. म्हटले तर सर्वांचा, म्हटले तर कोणाचाच नाही. परंतु ही माझी वृत्ती टिकत नाही. कोठे तरी आसक्ती जडते. आपलेपणा निर्माण होतो. धडपडत राहणे हीच मौज आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel