ध्रुव म्हणताच प्रल्हादही आठवतो. ही अमर अशी जोडी आहे. दोघेही बंडखोर; दोघेही पित्याविरुद्ध बंड करणारे. एकाने पित्याचा त्याग केला. दुसरा तेथेच पित्याच्या क्रोधाला तोंड देऊन लढत राहिला. सत्याग्रही पद्धतीने सारे सहन करीत अविचल असा तो राहीला. प्रल्हाद हिरण्यकशिपूचा मुलगा. त्याच्या आईचे नाव कयाधू. हिरण्यकशिपू हा मोठा सम्राट होता. त्याचे नावच हिरण्यकशिपू म्हणजे सोन्याची पेटी. जगातील सारी धनदौलत त्याच्याजवळ होती. सा-या सोन्या-चांदीचा, हिरेमाणकांचा तो स्वामी होता. त्याच्याहून कोण मोठा, कोण पूजार्ह, कोण मानार्ह? बाळ प्रल्हाद हे पित्याचे वैभव पाहात होता, परंतु ते त्याला रुजले नाही, ती पापमय सत्ता त्याला आवडली नाही. जगाला गुलाम करुन लुटून आणलेले ते भाग्य ! त्याची काय किंमत ? काय त्यात अर्थ ? त्याला पित्याचा मोठेपणा पटेना, विश्वाचे भक्षण करणारा मोठा, की रक्षण करणारा मोठा ? कोण मोठा ? आपला पिता तर जगाला छळत आहे. तरीही हे विश्व चालले आहे. माझ्या पित्यासारखे सहस्त्रावधी सम्राट पृथ्वीला छळणारे झाले असतील, पुढे होतील... परंतु पृथ्वी आहे ; हे सम्राट मात्र धुळीला मिळाले. कोण मोठा ? प्रल्हादला सर्वत्र पित्याची स्तुतीस्तोत्रे ऐकायला येत. दरबारात पित्याचे भाट. सर्वत्र पित्याचे खुशामत्ये, परंतु पाठीमागे पित्याची निंदाही त्याला ऐकू आली असेल. वरवरच्या स्तुतीच्या खालचे सत्य त्याने पाहिले असेल.

शिक्षण
प्रल्हाद शिकू लागला. गुरु धडे देऊ लागले. कोणते शिक्षण त्याला मिळणार ? सम्राटांच्या राज्यात सम्राटांचे गोडवे. हुकूमशाही राज्यपद्धतीत दुसरे शिक्षण नसते. त्या हुकूमशाहीचे सर्वत्र समर्थन असते. प्रल्हादला तेच शिक्षण मिळू लागले. गुरु सांगतः “पित्याला प्रणाम कर. हिरण्यकशिपू हाच देव. हाच त्रैलोक्यात थोर. सर्वांहून यांची स्तोत्रं हात जोडून म्हण.”

माझा देव वासुदेव
परंतु प्रल्हाद ऐकेना, तो म्हणे, “माझा पिता जन्मदाता म्हणून पूज्य असला तरी तो थोर नाही ; खरा थोर तो परमेश्वर. तो वासुदेव. तो विश्वंभर. तो सर्व व्यापून राहणारा भगवान् विष्णू. ज्याच्या इच्छेनं हे विश्व जन्मतं, ज्याच्या इच्छेनं हे चालतं, तो विश्वंभर खरा पूजार्ह. मी त्याचं नाव घेईन. त्याला नमो नमो म्हणेन. दुसरं दैवत मला नको. पिता आज आहे, उद्या जाईल. परमेश्वर सनातन आहे. त्या सनातनाला मी भजेन. क्षणभंगुराची पूजा करण्यात काय अर्थ ?”

गुरु म्हणत, “असं बोलू नकोस, कोणी ऐकलं तर काय म्हणेल ? मीच असं शिकवतो असं होईल. माझी नोकरी जाईल. मला सुळावर चढवतील. असं नको करु बाळ. म्हण, “हिरण्यकशिपू मोठा ; तो सर्वांहून थोर. त्याला भजावं ; त्याला नमावं. म्हण.” प्रल्हादाने ऐकले नाही. तो एकच धडा शिकत होता, “वासुदेवाय नमः। वासुदेवाच नमः !” गुरुने धाक दाखवला. शिक्षा केली. छड्या मारल्या. प्रल्हाद तरीही वासुदेवाचे नाव सोडीना.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel