प्रकाशाची उपासना
मानवाने प्रकाशाचे उपासक व्हावे. प्रकाश कोठूनही येवो, तो घ्यावा. सकाळची संध्याही पवित्र, सांयकाळचीही पवित्र. जीवनाची दारे सारी उघडी असू देत. ज्याप्रमाणे झाडाची मुळे सर्व दिशांना जाऊन पोषण मिळवतात, त्याप्रमाणे आपणही सर्वत्र जावे नि प्रकाश मिळवावा.
प्रकाश म्हणजे ज्ञान
प्रकाशात आपणाला सारे दिसते. प्रकाश तारतो. तो खड्डा दाखवतो, काटे दाखवतो, साप दाखवतो, धोका दाखवतो. परंतु या बाहेरच्या खड्ड्यापेक्षाही अज्ञानाचे खड्डे धोक्याचे असतात. ज्ञानाच्या प्रकाशात पावले टाकली पाहिजेत. केवळ बाहेरचा सूर्य असून काय उपयोग ? अंतःसूर्यही हवा. आत ज्ञानाचा सूर्य, ज्ञानाचा दिवा आहे का ? ‘अंतरिचा ज्ञानदिवा मालवू नको रे’ असे संत सांगतात.खरा प्रकाश तो हा. बाहेरच्या प्रकाशाची उपासना करून सारे जीवनच अंतर्बाह्य प्रकाशमय करायचे. सूर्याजवळ खळमळ नाही, कश्मल नाही, त्याप्रमाणे आपल्या बुद्धीजवळ खळमळ नको. सारी संकुचितता, स्वार्थ यांची राख केली पाहिजे. बुद्धी भव्यदिव्य असो. प्रकाशाच्या उपासनेचा हा अर्थ.
जर्मन कवी गटे मरताना म्हणाला, “ आणखी प्रकाश, आणखी प्रकाश !” थोर उद्गार ! गटे प्रकाशाचा भक्त होता. हे मरण मला आणखी प्रकाशाकडे नेईल असे त्याला वाटले. मरणाच्या दारातून तो आणखीच प्रकाशमय जगात जणू जात होता. आपण ‘मृताला अग्नी घेऊन जावो’ असे म्हटले आहे.
“अग्ने नय सुपथा राये”
हे अग्नीदेवा, या मृतात्म्याला सन्मार्गाने ने, वैभवाकडे, कल्याणाकडे ने. अग्नी म्हणजे त्या ज्वाळा ! तया ज्वाळा मृताला नेतात. त्याला प्रकाश देतात. प्रकाशाहून थोर वाटाडया कोण ?