देवानं वर तरी का दिले ?
अनेक दैत्यांनी तपश्चर्या करुन वर मिळवले. वर देणारे देव का मूर्ख होते? असे कसे भोळसर ब्रह्मा, विष्णू, महेश ? वर देत नि पुढे त्यांना निस्तरावे लागत. हे दैत्य उद्या त्रिभुवनाला, ‘दे माय धरणी ठाय’ करुन सोडतील, ही गोष्ट देवांना का दिसत नव्हती ? देवांना सारे दिसत होते. त्यांनी वर दिले यात चूक नव्हती, दैत्य झाले म्हणून काय झाले? त्यांनी तपश्चर्या केली असेल तर तिचे फळ त्यांना मिळालेच पाहिजे. सत्कर्म कोणीही करो, ते विपुल कसे होईल ? तेच दैत्य पुढे दुष्कर्मे करु लागल्यावर त्यांचे शासनही देवाने केले. कितीही वर मागितले तरी प्रभूला त्यांचा नाश करायला मार्ग असे. प्रभूच्या अनंत ज्ञानासमोर मानवी ज्ञान कितीसे ? हिरण्यकशिपूने दिवसा मरण नको. रात्री मरण नको. घरी नको, दारी नको. आत नको. बाहेर नको, मानव, दानव, देव कोणाकडून नको. असे शक्य तो सर्व बाजूंनी अमरत्व मिळवले होते ; परंतु त्याचे मरण तरीही टळायचे नव्हते.
पितापुत्रांचा संवाद
आईजवळून प्रल्हाद पित्याकडे आला. त्याने पित्याला प्रणाम केला. पिता जरा प्रसन्न झाला.
“बाळ, काय काय शिकलास ?”
“नमो वासुदेवाय, नमो वासुदेवाय.”
“अरे वासुदेवाय, हा तुझ्या पित्याचा शत्रू आहे. कुठून आणलास हा वासुदेव ? माझं स्तवन कर. माझी गाणी गा. गुरुजी सांगतात ते ऐक.”
“शिकवणारे गुरु म्हणजे पापाचे तरु ?”
“जपून बोल. मी सांगितलेलं ऐक.”
“इतर ऐकेन. परंतु ह्या बाबतीत नाही. सर्व त्रिभुवनाचा स्वामी तुम्हांला, मला, सर्वांना जन्माला घालणारा तो परात्पर पिता भगवान वासुदेव- त्याचं नाव घ्यावं, त्याला भजावं !”