भारतीय महर्षीने हा थोर संदेश दिला, जणू भारतात नाना जाती-जमाती येणार, धर्म येणार, संस्कृती येणार हे त्याला दिसत होते. विविधतेत एकता पाहाल तर भराभराटाल, असे जणू तो सांगत आहे. तत्वज्ञानानेही परिस्थितीतून जन्मतात. गरजांतून जन्मतात, आणि मग अशी दृष्टी घेणा-याला सारे शुभ नि मंगल वाटते. त्याला दिवस-रात्र दोन्ही गोड वाटतात.
“उषा मला गोड, निशाही गोड.
दिशा मला गोड नि धूळ गोड.”
सर्वत्र त्याला सौंदर्य दिसते. सर्व विरोधातून, वेदनांतून, वाईटातूनही शेवटी अमृत बाहेर येईल असे त्याला वाटते.
अशी दृष्टी ते थोर महर्षी देऊ लागले. मरण म्हणजे जीवन म्हणू लागले. मरण म्हणजे विश्र्वाशी एकरुप होणे. झाडामाडांशी, फुलाफळांशी, ता-या-वा-यांशी तुम्ही मिळून जाल, असे ते सांगतात. वाटले तर पुन्हा मर्यादित आकार घ्याल. जीवनसिंधूत विलीन व्हावे; वा पुन्हा विशिष्ट रुप जन्मावे. आपण जाण्यासाठी येतो; येण्यासाठी जातो. कशाचे दुःख, कशाचा शोक ? सर्वत्र अनंत जीवन भरलेले आहे. मृत्यू म्हणजे जणू माया.
प्रत्यक्ष व्यवहारात वेदान्त
थोर थोर विचार ते ऋषीवर देत आहेत. आणि केवळ विचारांत ते रमत नाहीत. जीवन सुधारण्यासाठी तत्त्वज्ञान असते. पायरी-पायरीने वाढत जा, असे ते सांगतात. प्राण्यांवर प्रेम करायला सांगतात; परंतु आधी गायीवर तरी करा. अरे, ही गाय म्हणजे अमृताची कुपी आहे. “मा गाम् अनागां अवधीः” अरे, या निरपराधी गायीला नका रे मारु, असे ऋषी कळवळून सांगतो. दूध देणारी, शेताला बैल देणारी, प्रेममयी, कारुण्यमूर्ती गाय ! तिचा महिमा त्यांनी वाढवला. गोपाळकृष्णाने पुन्हा शिकविला. परंतु मानसांना दुर्लक्षून ते गायीचा कळवळा करणारे नव्हते. सर्व भावांना सांभाळा असे सांगत. “अनुदार मनुष्याचा त्यांनी धिक्कार केला आहे. जो शेजा-याला देत नाही, त्याच्या घरी कशाला धान्याची कोठारे ? ते धान्य नसून साठवणा-या मूर्खाचे ते मरण आहे.” असे ऋषी गर्जून सांगतो. “सत्यं व्रवीमि वद इत् सत्यस्य।” ऋषीला खोटे बोलून काय करायचे?