सत्वपरीक्षा
तो तेजस्वी, करारी ध्रुव पुढे जातो. आणि सुंदर तपोवन लागते. नदी वाहत असते. सुंदर पक्षी दिसतात. फुलाफळांनी भरलेले वृक्ष दिसतात. पवित्र रमणीय जागा. ध्रुवाने आसन घातले. त्याने जप सुरु केला. हृदयात ती नारायणमूर्ती बिंबली होती. सत्वपरिक्षा सुरु झाली. श्वापदांच्या आरोळ्या कानांवर येऊ लागल्या. जणू विश्वातील सारी दुष्ट शक्ती त्या लहान बाळाला भक्षू पाहात होती. शुक्राचार्यांना सृष्टीतील सारे मोहक सौंदर्य भुलवू पाहात होते. ध्रुवाला विश्वातील भेसूरता भिववू बघत होती. परंतु शुक्राचार्य अचल राहिले. तसाच हा बाळ अचल राहिला. त्याने डोळे उघडून पाहिलेही नाही.
हृदयी बिंबले स्वरुप सुंदर
मग काय पार संसाराचा।।
अंतःकरणात प्रभुमूर्ती होती. ध्रुव अंतर्मुख होता, अंतदृष्टी होती. हृदयातील नारायणाकडे तो बघत गेला.
प्रभू आला !
सात दिवस अहोरात्र बाळाने जप केला. प्रत्यक्ष परमात्मा समोर येऊन उभा राहिला. परंतु अतःकरणातील रुपाच्या ठिकाणी ध्रुवाचे डोळे गुंतले होते, ते बाहेर बघतील कशाला ? तो आपल्या साधनेतच तन्मय होता. शेवटी प्रभूने त्या हृदयातील ती मूर्ती नाहीशी केली, बाळ कावराबावरा झाला. जणू प्रकाश गेला. ठेवा गेला. त्याने डोळे मिटले, उघडले- आत-बाहेर सर्वत्र तोच दिसू लागला. हाच तो देव !– त्याला वाटले. त्याने प्रभूचे चरण धरले. तो गहिवरला. देवा ! देवा ! म्हणू लागला. तो स्तुती तरी काय करणार ? मनातील भावना शब्दात प्रकट होऊ पाहात होत्या. भगवंताने त्याच्या गालाला शंख लावला. आणि बाळ वेदोमूर्ती झाला. एखाद्या थोर कवीप्रमाणे तो प्रभूची स्तुती करु लागला.
“बाळा, मी प्रसन्न झालो आहे. काय देऊ ?”
“न जाणारं, शाश्वत रुपाचं वैभव दे. मला क्षणभंगुर काही नको.”
“मी तुला अढळपदावर बसवतो. तू अच्युत आहेस. कुणीही तुला च्युत करु शकणार नाही, परंतु आधी घरी जा. तुझ्या वडिलांना सावत्रआईला आता दुःख होत आहे. तुझी आईही कंठी प्राण धरुन आहे. घरी जा. सर्वांना सुखव. न्यायानं राज्य कर. आणि शेवटी मेल्यावर अढळपदावर आरुढ हो. तिथून जगाला मार्गदर्शन कर.”