अनन्वित छळ
आणि त्या कुमाराचे शत-छळ झाले. त्याला आगीत टाकले. तरी तो फुलाप्रमाणे टवटवीत होता. त्याला पर्वतावरुन लोटले तरी तो सुरक्षित होता.
“न मरे यास्तव नेला पर्वतशिखरासि लोटला खाली.
परी तो निर्भय चित्ती बाहे नारायणासी लाखोली।।१।।
तो मनात वासुदेवाचा, नारायणाचा धावा करीत होता. तो अचल होता, निडर होता.
प्रल्हादाला पित्यासमोर उभे करण्यात आले.
“तू मरत कसा नाहीस ? काय आहे जादू ?”
“प्रभू सर्वत्र आहे. तो मला सांभाळीत आहे. त्याच्या इच्छेनं आपण जगतो. त्याच्या इच्छेने मरतो.”
“त्याच्या इच्छेनं ?”
“हो. तुम्ही मला कुठंही न्या, तिथं तिथं तो मला सांभाळील. अग्नीत तो अमृतरुप होऊन मला शांतवील. पर्वताचं अंग मला फुलाप्रमाणं मऊ लागेल. पाषाणाची पारिजातकं होतील. प्रभू सर्वत्र आहे-”
“ सर्वत्र ? इथं आहे ? या खांबात आहे ?”
“हो, अणुरेणूत तो आहे.”
पित्याने लाथ मारली. स्तंभातील अणूंचा स्फोट झाला. नारसिंह रुप प्रकट झाले. त्या वेळेस दिवस नव्हता, रात्र नव्हती. संध्या-समय होता. नारसिंह म्हणजे धड ना मानव ना पशू. सजीव-निर्जीव नको म्हणून नखे हे साधन. नखे म्हटली तर, सजीव, म्हटले तर निर्जीव. घरी-दारी नको म्हणून उंब-यात. हिरण्यकशिपूला जमिनीवर नको म्हणून आपल्या मांडीवर नारसिंहाने फाडून मुक्त केले!