अशी ती गोष्ट आहे. पाणी नाही म्हणजे काही नाही. बाहेर ऊन मी म्हणत असावे. तहानेने जीव खालीवर होत असावा, आणि थंडगार पाणी पेलाभर मिळावे. तो केवढा आनंद असतो ! पूर्व खानदेशात असताना एकदा मी नि माझे मित्र अजिंठ्याची लेणी बघायला पहूर गावातून पायी निघालो. ऊन कडक होते. नदीवर फराळ करुन पाणी भरपूर पिऊन निघालो. परंतु पुढे वाटेत तहान तहान झाले ! कोठे पाणी दिसेना. दूर शेतात कोठे विहीर दिसेना. चिंचेची पाने खाऊन आम्ही तोंडाला ओलावा आणीत होतो. केव्हा आढळेल पाणी असे झाले. वाटेत एक आंधळा भेटला.
“पाणी कुठं मिळेल ?” आम्ही विचारले.

“आता जवळच नाला आहे. भरपूर पाणी आहे.” तो म्हणाला. आम्ही आनंदलो. खिशातून दोन आणे काढून त्याला दिले. मला तो प्रसंग नेहमी आठवतो. मनुष्य अन्नावाचून राहील, वस्त्रावाचून राहील, परंतु पाण्यावाचून कसा राहणार? पाणी हा जीवनाचा आधार ! रखरखलेली झाडे-माडे, रखरखलेली पृथ्वी- पाण्याची किती आतुरतेने वाट बघतात. आणि पावसाचे पाणी पडताच सारी पृथ्वी रोमांचित होते. हिरवे हिरवे हर्षाचे रोमांच तिच्या अंगावर उभे राहतात.

आपण जेथे वस्ती करतो तेथे पाणी बघतो. नदीनाला बघतो. मग घरे बांधतो. पाण्याच्या आधारावर राहायचे, जगायचे. पाण्यामुळे शेतेभाते पिकतात. बागा फुलतात. मळे तरारतात. पाणी खेळेवून आपण हिरवी हिरवी भूमी सर्वत्र फुलवतो, हसवतो. अन्नमय प्राण असे आपण म्हणतो, परंतु पाणी नसेल तर ते अन्न कोठून मिळणार ?

पाणी म्हणजे प्रभूचे रुप. नदी पाहून आपण प्रणाम करतो, उगाच नाही. रवींद्रनाथ म्हणतातः ‘या नद्या म्हणजे ईश्र्वराची वाहती करुणा !’ पाणी म्हणजे प्रभूची कृपा. ते सर्वांना जवळ घेते. सर्वांना जिरवते. ते कोणाला वाईट म्हणत नाही. हिडिसफिडिस करीत नाही. वाघ आला त्याची तृषा हरील, गाय आली तिचीही तहान भागवील. राव येवो ;  रंक येवो; चोर येवो; साव येवो…सर्वांना पाणी तृप्त करते. सर्वांना शांत करते. पाण्याजवळ अशी ही समता आहे. परमेश्र्वर ज्याप्रमाणे सर्वांना स्वतःचे मानीत असेल त्याचप्रमाणे हे पाणी !

आणि पाण्यामध्ये समान पातळीचा महान धर्म आहे. पाण्याचे बिंदू एकमेकांच्या मदतीसाठी धावतात. विहीरीतून हजारो घागरी पाणी काढलेत तर जेथून काढलेत, तेथे खळगा दिसतो काय? नाही.  आजूबाजूचे जलबिंदू तेथे धाव घेतात. खळगा भरुन काढतात. रस्त्याच्या कडेला खडीचे ढीग असतात. आपण घमलेभर खडी नेली तर तेथे खळगा पडेल. आजूबाजूचे दगड थोडेच धावून येणार आहेत ! तसे पाण्याचे नाही. पाण्याची ही समता पाहूनच त्याला सज्जनांच्या मनाची उपमा देण्यात आली असेल. पंपा सरोवराचे पाणी कसे होते ? आदिकवी वाल्मीकी म्हणतात, “ सज्जनानां मनो यथा !”


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel