प्रशिक्षण वर्गातल्या सर्व उपस्थित प्रशिक्षणार्थींनी वर्गात बोललं पाहिजे, आपली मतं मांडली पाहिजेत, अनुभव शेअर केले पाहिजेत, आपल्या मनातल्या शंकांचं निरसन व्हावं यासाठी प्रश्नही विचारले पाहिजेत असा माझा नेहमीच आग्रह असतो. वर्गात कधीच न बोलणाऱ्या व्यक्तिला मी जाणीवपूर्वक बोलायला संधी देतो. प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी समारोपाच्या प्रसंगी बहुतेक प्रशिक्षणार्थी माझ्या या कृतीचा आवर्जून उल्लेख करतात. हा माझा नेहमीचा अनुभव आहे.
सुनिता ही माझ्या अशाच एका जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झालेली प्रशिक्षणार्थी महिला अधिकारी होती. पाच दिवसांच्या प्रशिक्षणात पहिले तीन दिवस संपल्यावर देखील सुनिताने वर्गात आपले तोंड उघडले नव्हते. गटचर्चेचे सादरीकरण करताना सुनिताला बोलावेच लागणार होते. मी तिच्या तोंडून काहीतरी ऐकायला उत्सुक होतो. पण यावेळीही सुनिता काहीच बोलली नाही. तिच्या गटाचे सादरीकरण सुरु झाले अन् सुनिता कानाला फोन लावून हाताने मला खुणावित बाहेर निघून गेली. ती थेट त्यांच्या गटाचे सादरीकरण पूर्ण होवून सर्वजण आपापल्या जागी बसल्यावरच वर्गात परत आली होती. मला सुनिताच्या या कृतीने खूप वाईट वाटले. तिचा तो फोन खोटाच असावा, वर्गात उभं राहून सर्वांच्या समोर बोलणं टाळण्यासाठी तिनं ऐनवेळी असा फोन आल्याचं नाटक केलं असावं अस मला क्षणभर वाटून गेलं.
सुनितानं असं का केलं असावं? हा प्रश्न माझ्या मनात फेर धरु लागला आणि मग तिच्या या कृतीमागच्या नेमक्या कारणांचा मी शोध घ्यायचं निश्चित केलं. त्याचाच एक भाग म्हणून रात्रीच्या जेवणाच्या वेळी मी सुनिताच्या टेबलवर जेवायला बसायचं ठरवलं. नेहमीप्रमाणे ती एका स्वतंत्र टेबलावर एकटीच जेवायला बसली होती. मी तिच्या शेजारी माझं ताट घेवून जेवायला बसलो. मी नेहमीच कोणत्या ना कोणत्या प्रशिक्षणार्थी सोबत जेवायला बसतो ही माझी सवय सर्वांना परिचित असल्याने मी आता सुनिताच्या टेबलवर का बसलोय? हे कुणाच्या ध्यानीमनी येण्याची सुतराम शक्यता नव्हती.
जेवता जेवता मी सुनिताशी बोलायला सुरुवात केली- "सुनिता, कसं वाटतंय प्रशिक्षण?"
"प्रशिक्षण खूप छान चाललंय सर!" सुनिता म्हणाली. "सर्व समजतंय ना?" मी पुढं विचारलं.
तिनं आत्मविश्वास पूर्वक उत्तर दिलं- "हो, तर!"
मी लगेच प्रश्न केला- ''तुम्ही गेल्या तीन दिवसांत वर्गात काहीच बोलला नाहीत. कायम कुठल्यातरी दडपडणाखाली असल्यासारखं दिसता. असं का? काही प्रॉब्लेम आहे का? तसं काही असेल तर मला सांगा. मी मदत करीन तुम्हाला."
"सर, मी नवीन आहे. इथली सर्व लोकं मला खूप सिनिअर आहेत. ही लोकं काय म्हणतील? याची मला भीती वाटते." सुनिता उत्तरली.
सुनिताच्या या उत्तराने आलेलं हसू मला आवरता आलं नाही. मी मोठ्यानं हसलो. कदाचित सगळयांनीच त्यावेळी आमच्याकडे पाहिलं. सगळ्यांनी आमच्याकडे असं एकदम पाहिल्यामुळं सुनिता खजिल झाली होती. मी मात्र काहीच घडलं नाही अशा रीतीनं सुनिताशी बोलत राहीलो.
"अच्छा म्हणजे तूला 'एलकेके' ची लागण झाली आहे तर.."
' मला एलकेके' ची लागण झाली? म्हणजे काय सर?'' सुनिताने घाबरलेल्या सुरात विचारणा केली.
मी वापरलेला 'एलकेके' हा शब्द तिला कळलाच नाही, हे माझ्या लक्षात आलं. मी हलकंसं स्मित करीत म्हणालो - " सुनिता, 'एलकेके' हा एक मानसिक आजार आहे. अलिकडे खूप लोकांना या आजारानं पछाडलं आहे 'एलकेके' म्हणजे 'लोग क्या कहेंगे?'
लोकं काय म्हणतील? या विचारानं ग्रासलेली माणसं आपल्या अवतीभवती मोठ्या संख्येनं दिसून येतात. रोजच्या दैनंदिन जगण्यातसुद्धा प्रत्येक क्षणी या लोकांच्या मनात लोकं काय म्हणतील? हा एकच प्रश्न कायम पिंगा घालीत असतो. अशा लोकांना 'एलकेके' ची लागण झालेली असते."
सुनिता माझं बोलणं लक्षपूर्वक ऐकतेय हे पाहून मी तिच्याशी पुढं बोलत राहिलो. मी तिला सांगत होतो- "ही माणसं आपल्या स्वतःचा विचार फारच कमी करतात किंवा स्वतःचा विचार करीतच नाहीत. आपल्या प्रत्येक कृतीवर 'लोक काय म्हणतील?' याचा विचार ही माणसं अतिशय गांभीर्यानं करतात. बरेचदा लोक आपल्याला चांगलं म्हणणार नाहीत, लोक आपल्याला हसतील, नावं ठेवतील, 'आपल्याला काहीच करता येत नाही' किंवा 'आपल्याला काहीच कळत नाही' असं म्हणतील अशी भीती या लोकांच्या मनात पक्कं घर करुन बसलेली असते. अनेक लोकांना तर आपणास वेडसर किंवा मूर्ख ठरवलं जाईल असं वाटतं. त्यामुळं त्यांच्या हातून काहीच घडत नाही. ही माणसं एकलकोंडी बनत जातात. त्यांच्यातील निष्क्रियता हळूहळू वाढू लागते आणि अखेरीस ही माणसं निराशेच्या गर्तेत खोलवर अडकत जातात."
एव्हाना सर्वांची जेवणं आटोपली होती. तोंडातला मुखवास चघळत सर्वजण आपापल्या रुमकडे रवाना झाले होते. नाही म्हटलं तरी रात्रीचा गृहपाठ पूर्ण करायचं प्रेशर सर्वांनीच घेतलेलं होतं. आमचंही जेवण आता संपत आलं होतं. आता या क्षणाला सुनिताला गृहपाठाचा विसर पडला होता. ती अगदी मंत्रमुग्ध होऊन माझं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होती. मी माझं बोलणं थांबवूच नये असा सकारात्मक प्रतिसाद दर्शवणारे भाव तिच्या चेहऱ्यावर जमा झालेले दिसत होते. तुम्हा वाचकांनाही आता मी माझा लेख इथेच थांबवू नये असंच वाटलं असणार याबाबत माझ्या मनात कोणतीच शंका नाही.
सुनिताचा सकारात्मक प्रतिसाद मिळतोय हे पाहून मी तिच्याशी 'एलकेके' बाबत सविस्तर बोललो. कदाचित तुमच्यापैकी कुणाला सुनितासारखी 'एलकेके' ची लागण झालेली असेल तर तुमच्याही उपयोगाला येईल म्हणून सुनिताशी बोलताना मी 'एलकेके' बाबत जे काही सांगीतलं, ते जसंच्या तसं इथं पुन्हा सांगतो आहे-
१) स्तुती ही माणसाची मूलभूत मानसिक गरज आहे हे मानसशास्त्रानं सविस्तरपणे आणि अतिशय सोप्या शब्दांत स्पष्ट केलं आहे. हे नीट समजून घेण्यासाठी मॅस्लोने मांडलेला मानवी गरजांचा पिरॅमीड आपणास खूप उपयोगी ठरतो.
२) सर्वानी आपली स्तुती करावी, सर्वानी आपल्याला चांगलं म्हणावं, सर्वानी आपलं कौतूक करावं म्हणजेच कुणीही आपल्याला वाईट ठरवू नये, आपल्याला नावं ठेवू नयेत, आपल्यावर कोणीही टीका करु नये अशी प्रत्येक माणसाची सुप्त इच्छा असते.
३) आपलीही सुप्त इच्छा पूर्ण व्हायची असेल तर आपल्या फक्त वागण्या-बोलण्यालाच नव्हे तर आपल्या प्रत्येक कृतीला इतरांची मान्यता मिळणे आवश्यक ठरते.
४) या मान्यतेच्या गरजेपोटीच आपण सर्वजण स्वतःची आवड, अपेक्षा, इच्छा, आकांक्षा, महत्वाकांक्षा या साऱ्यांना प्रसंगी बाजूला सारुन इतरांची आवड, अपेक्षा, इच्छा, आकांक्षा, महत्वाकांक्षा जपण्याचा प्रयत्न करतो. ५) आपल्या या कृतीमुळे आपली स्तुतीची गरज पूर्ण होत असते हे अगदी नैसर्गिक आहे. अगदी नकळत्या वयातील बालकांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येक माणूस हेच करीत असतो.
एखादे लहान मुल खेळताना पडले तर पटकन इकडे तिकडे पाहते, आपल्याला पडताना कुणी पाहिले तर नाही ना याची खात्री करते. त्याला पडताना कुणी पाहिले नसेल तर ते पुन्हा खेळायला लागते. मात्र त्याला कुणी पडताना पाहिलं असेल तर ते लगेच भोकाड पसरुन रडायला लागतं. हे आपण सर्वांनीच अनुभवलं असेल.
६) अर्थात कधी कधी आपल्या स्तुतीची ही गरज भागविण्याच्या प्रयत्नात आपण इतरांच्या मान्यतेला अगदी 'अत्यावश्यक' समजून बसतो. इथेच आपली खरी चूक होते. इतर लोक आपल्याला हसतील, नावं ठेवतील, आपल्यावर टीका करतील, आपल्याला वेडं किंवा मूर्ख ठरवतील याची आपल्याला अधिक भीती वाटायला लागते तेव्हा अपरिहार्यपणे आपली स्तुतीची गरज 'अत्यावश्यक' ठरते.
७) अशावेळी आपण अगतिक, हतबल होतो आणि आपल्या वागण्या-बोलण्याला किंवा आपल्या प्रत्येकच कृतीला इतरांची मान्यता मिळवणे आपल्याकडून 'अत्यावश्यक' ठरवले जाते.
८) इतरांची मान्यता अत्यावश्यक झाली की आपल्या स्वतःची आवड, अपेक्षा, इच्छा, आकांक्षा, महत्वाकांक्षा यांना दुय्यम स्थान मिळते, त्यांच्याकडे आपले अक्षम्य दुर्लक्ष होते.
९) परिणामी इतरांच्या गुडबुकमध्ये आपण राहणार की नाही याची चिंता आपल्या मनात मुक्कामाला येते. आपण कायम भयग्रस्त राहतो. मनात जन्मलेला न्यूनगंड बाळसे धरुन मोठा व्हायला लागतो. एका अर्थाने अंतर्मनाचा बहिर्मनाशी संघर्ष सुरु होतो. एकदा इतरांकडून मान्यता मिळवणे ही आपली अत्यावश्यक गरज बनली की या संघर्षात बहिर्मनाचा विजय होतो आणि अंतर्मन हरते.
१०) दरवेळी अंतर्मनाचा असा पराभव होऊ लागला की, आपले मन आजारी पडते. म्हणजेच आपण मानसिकदृष्ट्या आजारी पडतो. आपलं व्यक्तिमत्व निष्प्रभ होतं. आपल्याला आपली स्वतःचीच ओळख पटेनाशी होते.
म्हणूनच 'लोकं काय म्हणतील?' किंवा 'लोग क्या कहेंगे?' याचा अति विचार करणे आपण टाळायला हवे!
याची दुसरी बाजू अशी की माणूस समाजशील असतो. त्याला आपली सुरक्षिततेची गरज भागविण्यासाठी इतरांची साथ सोबत हवी असते. कदाचित म्हणूनच आदिम काळातही माणूस एकेकटा न राहाता टोळ्यांमध्ये राहात असावा. आजच्या प्रगत मानवाला सुध्दा त्यांचं कुंटूब, नातेवाईक, मित्रमंडळी, सम व्यावसायिक, सहकारी, मदतनीस, अशा वेगवेगळ्या टोळयांमध्ये अपरिहार्यपणे राहायचं असतं. याशिवाय जाती, धर्म, वंश, वर्ग अशाही काही टोळ्या आहेत ज्यांत माणसाला नाईलाजाने राहणं क्रमप्राप्त होतं.
वास्तविक पाहाता, सर्वांची मर्जी राखणं किंवा सर्वांना खूश ठेवणं पृथ्वीच्या पाठीवर कोणालाही कधीच शक्य झालेलं नाही. या जगात ज्याच्यावर कधीच कोणी टीका केली नाही, ज्याला कुणीच कधी नावं ठेवली नाहीत असा कोणीही माणूस या जगात आजवर जन्मलेला नाही. अगदी संत, महात्मे, थोर महामानव अशा कुणाचंही जीवन तपासलं की हे शाश्वत सत्य आपल्या लक्षात येतं. थोडक्यात काय, तर आपल्यावर टीका होणार हेच अटळ सत्य आहे. या अटळ सत्यापासून आपण असे कुठवर दूर पळणार आहोत?
त्यापेक्षा इतरांची मान्यता आपल्यासाठी 'अत्यावश्यक' ठरु नये यासाठी आपण खालील गोष्टी करणे अत्यावश्यक आहे.
१) तुमच्यावर कोणी टीका करणार असेल तर करु द्या. त्यामुळे तुम्हाला सुधारण्याची संधी मिळेल. ती संधी गमावू नका.
२) तुमच्या मनातल्या भावनांवर तुमचे नियंत्रण असायला हवे, इतरांचे नाही. तुमचा आनंद, सुख, समाधान तुमच्या हाती ठेवायचं असेल तर तुमचं प्रेम, काळजी, चिंता, दुःख, राग, द्वेष या सर्व भावना तुमच्या मुठीत, तुमच्या हातात म्हणजे तुमच्या नियंत्रणातच असायला हव्यात.
३) प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉ. अल्बर्ट एलिस यांनी विकसित केलेल्या लज्जा /भीती निवारण तंत्रानुसार ज्याची भीती वाटते त्या गोष्टीला थेटपणे भिडून आपल्या मनातल्या भीतीला खोडायला हवं.
४) आपलं मनं निरोगी राहावं यासाठी आपलं अंतर्मन व बहिर्मनातील संघर्ष जय - पराजयाच्या पातळीवर पोहोचणार नाही याची योग्य खबरदारी घ्यायला हवी.
५) अभिमान, स्वाभिमान, अस्मिता, गर्व, आत्मसन्मान या गोष्टींबाबत आपली समज स्वच्छ व स्पष्ट असायला हवी. म्हणजे लोक काय म्हणतील? यापेक्षा मला काय म्हणायचे आहे? हा प्रश्न अधिक महत्वाचा ठरेल; आणि आपल्याला 'एलकेके'ची लागण कधीच होवू शकणार नाही.
© श्री अनिल उदावंत
ज्येष्ठ प्रशिक्षक व समुपदेशक
सावेडी, अहमदनगर
संपर्क : ९७६६६६८२९५