मार्च महिन्यात एका वर्कशॉपसाठी रत्नागिरी येथील मत्स्य महाविद्यालयात दोन आठवडे निवासी राहीलो होतो. उपजीविका विषयाशी संबंधित प्रशिक्षणाची मोड्यूल्स लिहीण्यासाठी हे वर्कशॉप आयोजित करण्यात आले होते. मर्यादीत व्यक्तींच्या उपस्थितीत, सामाजिक अंतर राखून, कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची पुरेशी काळजी घेवून आमचे काम सुरु होते. सकाळी नऊ वाजता आमचे काम सुरु व्हायचे आणि आम्ही पूर्ण थकल्यावर रात्री दीड -दोन वाजता बंद व्हायचे. चहा, नाष्टा, दोन्ही वेळचे जेवण यासाठी लागणारा वेळ सोडून अखंडपणे काम सुरु होते.

या दरम्यान थोडेसे विषयांतर करुन आम्ही वेगवेगळ्या विषयांवर मुद्दाम चर्चा करायचो. त्यामुळे आम्हाला आमच्या कामासाठी लागणारी नवी उर्जा मिळायची.
याच काळात एक दिवस आम्ही "या जगात शाश्वत नेमके काय आहे?" या विषयावर चर्चा सुरु केली.       कदाचित आम्ही दिवसभर 'शाश्वत उपजीविका' या विषयावर काम करीत असल्यामुळे  हा आमच्या चर्चेचा विषय बनला होता. चर्चेत आम्ही चौघेजण सहभागी झालो होतो. प्रत्येकाने आपापली मते मांडली होती. आपली मते मांडताना इतरांची मते खोडून काढण्याचाही प्रयत्न केला होता. अर्थात हे सर्व अत्यंत खिलाडू वृत्तीने सुरु होते. त्यामुळे कुणाला राग, रुसवा किंवा चर्चेत जिंकल्याचा अतिरेकी, असुरी आनंद यापैकी कशाचाही मागमुस नव्हता. वेळ मिळेल तेव्हा आमच्यात झालेल्या या चर्चेतून पुढीलप्रमाणे मुद्दे उपस्थित झाले होते.
१) या जगात काहीच शाश्वत नाही.
२) या जगात फक्त 'बदल' शाश्वत आहे.
३) या जगात फक्त 'मी' शाश्वत आहे.
४) या जगात फक्त 'अंधार' शाश्वत आहे.
वरीलपैकी पहिले तीन मुद्दे माझ्या सहभागी मित्रांनी मांडले होते. अर्थातच माझ्या मनात त्यांच्यापेक्षा वेगळाच मुद्दा होता जो मी चौथ्या मुद्दयाच्या स्वरुपात मांडला होता. या चारही मुद्द्यांबाबतची मांडणी सर्वसाधारणपणे अशी होती.
अ) या जगातील प्रत्येक वस्तू अथवा जीवाची निर्मिती होते, जन्म होतो तसाच त्याचा ऱ्हास अथवा नाश होतो. जन्मासोबत मृत्यू निश्चित आहे. म्हणून या जगात शाश्वत असे काहीच नाही.
ब) जन्म आणि मृत्यू किंवा निर्मिती आणि ऱ्हास हे वस्तु किंवा जीवाच्या बाबतीत घडणारे स्थित्यंतर आहे. त्याला सोप्या शब्दात 'बदल' असे म्हणता येईल. वस्तूच्या किंवा जीवाच्या अवस्थेत सतत बदल होत राहातो. म्हणून हा 'बदल' तेवढाच शाश्वत आहे.
क) 'मी' जीवंत आहे तोपर्यंतच हे जग अस्तित्वात आहे. 'मी' नसेल तर हे जग मिथ्य आहे. त्याच्या असण्याचा वा नसण्याचा काही उपयोग नाही. 'मी' आहे म्हणून सारे काही आहे. 'मी' आहे म्हणून जग आहे. म्हणूनच फक्त 'मी' शाश्वत आहे.
'मी म्हणजे स्वत्व, किंवा अस्तित्व होय'. म्हणूनच मी स्वतःला सिद्ध करून इतरांच्या हृदयात निर्माण केलेली प्रतिमा मी नसताना काय असेल? हे मी माझ्या जीवंतपणी जाणून घेणं महत्वाचं आहे. 'मी' हा या जगातला एक जीवंत जीव आहे तोपर्यंतच हे जग आहे. 'मी' मेल्यानंतर हे जग नसेल. कारण त्या जगात 'मी' नसेल. म्हणूनच फक्त "फक्त 'मी' शाश्वत आहे!"
ड) या सृष्टीचा जन्म अंधाराच्या पोटातून झाला आहे. आणि सृष्टीचा मृत झालेला भाग पुन्हा त्याच अंधारात विलीन होवून जातो. म्हणून या जगात फक्त "अंधार शाश्वत आहे!"

आठवडाभर या विषयावर चिंतन- मंथन करण्याचा आम्ही प्रयत्न केला. अखेरीस आमच्या हातातल्या कामात आम्ही अधिक गुंतत गेलो आणि आमची चर्चा अपूर्ण राहीली. मी माझे म्हणणे आणखी स्पष्ट करावे असा सर्वांनी आग्रह धरला होता. मलाही माझा मुद्दा आणखी विस्ताराने आणि सुलभ करून मांडला पाहिजे असे वाटत होते.

वर्कशॉप संपवून घरी आल्यावर, काही अपरिहार्यतेमूळे हा चर्चाविषय माझ्या प्राधान्याचा राहीला नाही. मात्र मागील आठवड्यात एकमेकांची ख्याली खुशाली समजून घेण्यासाठी आमचे फोनवरुन बोलणे झाले. त्यावेळी माझ्या तीन्ही मित्रांनी मला गंमतीने पण आवर्जून विचारले- "सर, तुमच्या अंधार-उजेडाचे पुढे काय झाले?" त्यांनी मला असा प्रश्न विचारल्यामुळे मी पुन्हा एकदा विचारप्रवण झालो. 'अंधार शाश्वत आहे!' या माझ्या मताच्या पुष्ठ्यर्थ मांडणी करण्याच्या दृष्टीने चिंतन केल्यावर मी हा विषय खालीलप्रमाणे प्रतिपादित केला आहे.

फक्त 'अंधार' शाश्वत आहे : अनिल उदावंत
.......................................................

कोणत्याही प्रकारचा उजेड हा मर्यादित आहे. त्याचं आयुष्य सिमीत आहे. उजेड म्हणजे प्रकाश! उजेड म्हणजे ज्ञान! उजेड मोजता येतो. त्याची तीव्रता, त्याचा वेग, त्याची गती, त्याचे परिणाम मोजण्याची अनेक परिमाणे उपलब्ध आहेत. जे जे मोजता येते, ते ते सारे कधीतरी संपणारे असते. उजेड मोठ्या प्रखर दिव्याचा असो की मिणमिणत्या छोट्या दिव्याचा, तो मोजता येतो. अगदी सूर्यापासून चंद्र ताऱ्यांपर्यंत सर्वांचा उजेड मोजता येतो. उजेडाचा कालावधी मोजता येतो. उजेडाची तीव्रता आणि प्रखरताही मोजता येते. उजेडाचा वेगही मोजता येतो. उजेडाचे आयुष्य मर्यादित असते. दिव्यातील इंधन किंवा वीज जसजसे कमी होत जाते तसतसा उजेडही कमी होतो म्हणजेच उजेड झिजत जातो. दिव्यातले इंधन संपले की दिव्याचा उजेडही संपतो. वीजजप्रवाह खंडीत झाला की लगेच वीजेच्या दिव्याचाही उजेड संपतो. म्हणूनच उजेड हा संपणारा आहे. उजेड संपला की मागे उरतो तो केवळ अंधार!
उजेडाच्या आधीही केवळ अंधारच अस्तित्वात होता. थोडक्यात अंधार कालही अस्तित्वात होता, आजही आहे आणि उद्याही तो राहणारच आहे! या तीन्ही त्रिकाळ अस्तित्वात असलेल्या अंधाराला कुणीही कायमचे थांबवू शकलेले नाही. तसे ते कुणालाच करता येणार नाही. म्हणून फक्त 'अंधार' शाश्वत आहे!

प्रचलित अर्थाने माणसे किंबहूना सर्वच सजीव आपल्या गरजांच्या पूर्ततेसाठी उजेडातच राबत असतात. कष्ट करीत असतात. आपल्या वाट्याला येणाऱ्या कमी अधिक उजेडानुसार आपले श्रमकाठिण्य ठरत असते. अधिक कष्टाचे काम अधिक उजेडात तर कमी कष्टाचे काम कमी उजेडात करण्याची आपली परंपरा आहे. लक्षवेधी  कामासाठी (Focussed task)  तितकाच लक्षवेधी उजेड (Focussed Light) असावा लागतो. उजेडात काम करुन, कष्ट करुन श्रमलेला जीव श्रमपरिहारासाठी अंधारच पसंत करतो. अंधार थकलेल्या जीवाला निद्रा देतो, विश्रांती देतो आणि पुन्हा पुढच्या कामासाठी लागणारी उर्जा देतो. कदाचित म्हणूनच अंधाराचे अस्तित्व अबाधित राहिले आहे. त्यामुळेच फक्त 'अंधार' शाश्वत आहे!

उजेडाचा जन्म होतो. कुणीतरी उजेडाला जन्म देतं. कुणाच्या तरी असण्या- नसण्यावर उजेडाचं अस्तित्व अवलंबून आहे. म्हणजेच उजेड नेहमीच पराधीन, परावलंबी राहिला आहे. याऊलट अंधार मात्र स्वयंभू आहे. उजेडाच्या उपस्थितीत त्याचे अस्तित्व काही काळासाठी जाणवत नसले तरी उजेडातही त्याचे अस्तित्व असतेच. म्हणूनच 'दिव्याखाली अंधार!' असे म्हटले जाते. अंधाराला जन्म द्यावा लागत नाही. तो स्वयंभू आहे. म्हणून फक्त 'अंधार' शाश्वत आहे!

उजेडाला आपण कधीतरी संपणार आहोत, याची जाणीव होत असावी. उजेडाच्या अंगी आपल्याला त्याचे संपून जाण्याचे हे भय क्षणोक्षणी जाणवते. आपला संपण्याचा काळ समीप आला की उजेडाचा भीतीने थरकाप होतो. नाहीतर मग, दिव्यातील तेल संपत आल्यावर विझायला निघालेला दिवा व्याकुळ होवून तडफड करतो! हे कशाचे द्योतक आहे? अंधाराला अशी संपण्याची भीती कधीच नसते. सर्व सृष्टीला व्यापूनही उरतो, तो केवळ अंधारच असतो. म्हणून फक्त 'अंधार' शाश्वत आहे!

उजेडाचा जन्म हा नेहमी अंधाराच्या पोटातच होतो. भलेही आपण अंधाराला संपवायचे म्हणून उजेडास जन्म दिला असं म्हणत असु; परंतु अंधार आहे म्हणूनच उजेडाचा जन्म होवू शकतो. हे आपणास कधीच नाकारता येणार नाही. किंबहुना तेच शाश्वत सत्य आहे. उजेड जन्मला तरी त्याच्यासोबत अंधाराचा वावर असतोच. 'दिव्याखाली अंधार' या उक्तीवरुन आपणास त्यांची प्रचिती येते. उजेड जसा जसा अधिक प्रखर होत जातो, तसतसा आपल्याला अंधाराचा प्रत्यय येतो. प्रखर तेजस्वी प्रकाशात आपल्या डोळयांपुढे अंधार येतो. यालाच आपण 'डोळे दिपले' असं म्हणतो. डोळे दिपण्याचा हा अनुभव आपण वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या स्वरुपात घेतच असतो.
एखाद्या माणसाने उच्च दर्जाचे शिक्षण- प्रशिक्षण घेऊन एखाद्या गोष्टीचे ज्ञान मिळवले असेल तरीही इतर अनेक गोष्टींबाबत तो अज्ञानी असतो. याचा अर्थ ज्ञानापेक्षा अज्ञानाचे आकारमान अधिक असते. हा अज्ञानाचा अंधार कुणाचाही आणि कधीच संपत नाही. याचा अर्थ उजेडासोबतही अंधार कायम आहे. म्हणून फक्त 'अंधार' शाश्वत आहे!

ऐहिक किंवा व्यावहारिक जीवनातसुध्दा अंधारच अधिक महत्वाचा ठरतो. ऐहिक जीवनात अंधाराचेच पारडे अधिक जड ठरते असे दृष्टीस पडते. ऐहिक जीवनात समस्त जीवांचा सत्ता आणि अस्तित्व या दोन कारणासाठी अव्याहत संघर्ष सुरु असतो. सतत स्वतःचे अस्तित्व दाखविणे व ते टिकवून ठेवणे आणि हाती असलेली सत्ता टिकविणे किंवा हाती नसलेली सत्ता मिळवणे याच दोन गोष्टी ऐहिक जीवनात सार्वत्रिक व सार्वकालिक आहेत. व्यक्ती, कुटूंब, संस्था, समाज, जात, धर्म, वर्ग, शासन, प्रशासन, व्यापार, उद्योग अशा सर्वच पातळ्यांवर हा सत्ता आणि अस्तित्वाचा संघर्ष सतत सुरु असतो असे समाजशास्त्राच्या अभ्यासांत आढळून आले आहे.
एका बाजूला आपले अस्तित्व निर्माण करुन ते कायम टिकवण्यासाठी तसेच हाती नसलेली सत्ता मिळविण्यासाठी अधिक ज्ञान म्हणजेच अधिक उजेड मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. तर दुसऱ्या बाजूला स्पर्धकाचे अस्तित्व पुसून टाकण्यासाठी आणि हाती असलेली सत्ता कायम टिकविण्यासाठी सत्ताधारी वर्गाकडून जमेल तितका अंधार सतत निर्माण केला जातो. सत्य लपवले जाते. माहिती गुप्त राखली जाते. असे करणे सत्ताधाऱ्यांच्या हिताचे असते, सोईचे असते. कायदा निर्माण करणे व तो राबविणे सत्ताधारी वर्गाच्या हातात असते. कोणतीही सत्ता आपल्या सोईचे व हिताचे नियम व कायदे तयार करतात व आपल्याच सोईने त्यांची अंमलबजावणी करतात. हे आदिमानव काळापासून असेच सुरु आहे. थोडक्यात समाजाला अंधारात ठेवणे म्हणजे अज्ञानात ठेवणे हीच सत्ताधाऱ्यांची प्राथमिकता व प्राधान्यता असते. त्यामुळे समाजात मोठया प्रमाणावर अंधार निर्माण होतो. अंधाराचे सातत्य उजेडापेक्षा अनेक पटींनी अधिक असते. म्हणून अंधार कायम राहतो. त्यामुळे असे म्हणता येते की- फक्त 'अंधार' शाश्वत आहे!

आपण कोणीही या सृष्टीच्या नियंत्याला, विधात्याला अर्थात परमेश्वराला आजवरच्या कोणत्याही उजेडात प्रत्यक्ष पाहू शकलो नाही. अर्थात आपण कधीच पाहू शकणार नाही कारण परमेश्वराचे वास्तव्यच मुळी या अंधाराच्या पोकळीत आहे. परमेश्वराला पहायचे नसते; तर त्यात स्वतःला विलीन करुन घ्यायचे असते!
"भक्त ऐसे जाणा I जे देही उदास॥" असे एक संतवचन  आहे. ही उदासीन वृत्ती आपल्यात आली पाहिजे असा संतांचा आग्रह आहे. म्हणजे आपण नेमके काय करायचे? तर आपण आपल्या काया वाचा मनाला जाणीवेच्या उजेडापासून दूर नेवून थेट नेणीवेच्या अंधारात विलीन करायचे. आपण आपल्यातल्या उजेडाला घेवून नेणीवेच्या शाश्वत अंधारात विलीन व्हायचे. "देव पहावयाशी गेलो I देव होवूनिया ठेलो ॥" असं संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच अभंग वचन आहे. 'उजेड' हे 'जीवाचे' तर 'अंधार' हे 'शिवाचे' अर्थात ईश्वराचे म्हणजेच देवाचे प्रतिक आहे. असा उल्लेख शिवपुराण आणि शिवलीलामृत यासारख्या प्राचीन धर्मग्रंथात आलेला आहे. 'जीवाचे जीवाशी मिलन व्हावे' असे धर्मशास्त्राला अभिप्रेत आहे. याचा अर्थ असा की, उजेडाने स्वतःला अंधारात सामावून घेणे आवश्यक आहे. तोच त्याच्या मुक्तीचा एकमेव मार्ग आहे! यावरुन आपण नक्कीच असा निष्कर्ष काढू शकतो की- फक्त 'अंधार' शाश्वत आहे!

© अनिल उदावंत
(साहित्यिक)
ज्येष्ठ प्रशिक्षक व समुपदेशक
सावेडी, अहमदनगर
संपर्क : ९७६६६६८२९५

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel