काल बेंगलोरहून रॉनी नावाच्या माझ्या ओळखीतल्या एका गृहस्थाचा फोन आला होता. नमस्कार चमत्काराच्या फॉर्मल बोलण्यानंतर मी आज अचानक फोन करण्याचं कारण त्याला विचारणार, तेवढ्यात त्याचं बोलणं सुरु झालं.
तो म्हणाला- "सर, माझं कोणत्याच कामात नीट लक्ष लागत नाही म्हणून मी ऑफीसला सुटी टाकलीय. आता घरात एकटा बसून मला खूप बोअर झालंय. हा एकटेपणा घालवून मन रमविण्याचे माझे सगळे प्रयत्न फेल झालेत. मला खूप प्रश्न पडलेत. त्यांची समाधानकारक उतरं मिळत नाहीत. त्यामुळं मला डिप्रेशन आल्यासारखं वाटतंय. तुमच्याकडून उत्तरं मिळतील अशी मला आशा आहे. अशावेळी तुम्ही मला नक्कीच मदत करु शकता, या विश्वासानं मी तुम्हाला हा फोन केलाय. तुम्ही आता माझ्याशी बोलू शकता का? की मी नंतर तुमच्या सोईच्या वेळेला फोन करु?"
एका दमात इतकं सगळं बोलून रॉनीनं चेंडू आता माझ्याकडे ढकलला होता. माझं नुकतंच जेवण आटोपलं होतं. हातात काही महत्त्वाचे म्हणता येईल असं काही कामही नव्हतं. शिवाय रॉनी अडचणीत होता आणि माझ्याकडून त्याला मदतीची आशा होती. मी त्याला मदत करु शकतो असा विश्वास त्याला वाटत होता. हे सगळं लक्षात घेवून मी म्हटलं- "रॉनी, आपण आताच बोलूया."
पुढचा एक तास आम्ही फोनवर बोलत होतो. सर्वप्रथम त्याची निराशाजनक मानसिक स्थिती निर्माण होण्यामागे कोणती कारणं आहेत? हे मी समजून घेणं आवश्यक होतं. त्या दृष्टीनं मी विचारलं- "नेमकं काय घडलंय? या एक दोन आठवड्यात तूझ्या बाबतीत काही बऱ्या वाईट घटना घडल्यात का? घरी, कार्यालयात, नातेवाईकांत किंवा मित्रमंडळीत काही बिनसलंय का?"
माझे प्रश्न संपायच्या आतच समोरुन रॉनीचा गदगदलेला आवाज येवू लागला. आता रॉनीचा स्वर गदगदला होता. त्याच गदगदल्या स्वरात त्यानं सांगितलं- "सर, मागच्या आठवड्यात माझ्या एका जवळच्या नातेवाईकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ज्यांनी मला बालपणापासून आपल्या मुलासारखं सांभाळलं होतं, खूप जीव लावला होता. हे कमी होतं म्हणुन की काय, परवा अशाच एका सद्गृहस्थांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. माझ्या आयुष्यात त्यांचं स्थान खूप महत्वाचं होतं. लौकिक अर्थाने ते माझे कुणीच नव्हते; मात्र पारलौकिक अर्थाने म्हणाल तर ते माझे गुरु होते, मित्र होते, मार्गदर्शक होते, माझे पालक होते! एकाच आठवड्यात माझ्यासाठी खूप महत्वाची असणारी वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास असणारी ही दोन्ही माणसे काळाने ओढून नेली. मी पुन्हा एकदा पोरका झालोय! माझ्या बालपणीच माझ्या आईवडिलांचं निधन झालं तेव्हाही मी पोरका झालो होतो. पण पोरकेपणा कळण्याचं ते माझं वय नव्हतं. तरीही पोरकेपणा मी अनुभवला आहे. त्यामळंच कदाचित आज मी पुन्हा पोरका झाल्यावर, मी हळवा झालोय! खूप निराश झालोय!"
रॉनीचं बोलणं पुढे सुरुच होतं. मी माझ्या घशात आलेला आवंढा तसाच गिळून घेत त्याचं बोलणं ऐकत होतो.
तो म्हणाला, "सर, माझ्याच वाट्याला हे पोरकेपणाचं दुःख का आलं असावं? माझ्या कोणत्या चुकीची शिक्षा मला भोगावी लागतेय? समजा माझं काही चुकलं असेल तर ते दुरुस्त करता येणार नाही का? माझं पुढं कसं होईल? माझं सगळं आयुष्य असंच असेल का? "
बोलता बोलता रॉनीला रडू अनावर झालं होतं आणि त्यामुळं त्याचं बोलणंही थांबलं होतं.
रॉनीच्या मनातले त्याला छळणारे प्रश्न आता मला नीट लक्षात आले होते. त्या प्रश्नांमुळेच त्याच्या मनाची अवस्था सैरभैर झाली होती. त्याला काही सुचत नव्हतं. त्याचं कामात मन लागत नव्हतं. त्याला एकटेपणा वाटत होता. त्याला भविष्यातल्या आपल्या आयुष्याची चिंता वाटत होती. त्याला हव्या असलेल्या प्रियजनांच्या विरहामुळे तो व्यथित झाला होता. कदाचित आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा असं घडून आपले सगळेच प्रियजन दूरावतील की काय? असं भय त्याच्या मनास वाटत होतं आणि या सगळ्याचा दोष तो स्वतःला देवू लागला होता. एकंदरीत काय तर त्याची 'गडबड' झाली होती!
मी रॉनीला त्याची झालेली 'गडबड' समजून सांगीतली. त्यातून बाहेर पडण्याविषयी समुपदेशन केलं. रॉनीला ही गडबड नीट समजली आणि त्यामुळे माझं समुपदेशन त्याच्या उपयोगाचं ठरलं. त्यामुळं रॉनीची निराशा कमी होण्यास मदत झाली होती आणि पुढील आयुष्य आपण आनंदानं जगू शकतो असा विश्वास त्याला वाटू लागला होता.
मित्रहो, आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्यात हे किंवा यासारखे अनेक घटना प्रसंग अधुनमधून घडतात आणि त्यामुळे आपलीही रॉनीसारखीच 'गडबड' होत असते. आपल्या प्रत्येकाच्या मनात विशिष्ठ प्रसंगी कमी अधिक प्रमाणात होणारी ही 'गडबड' म्हणजे नेमकं काय? हे आपण नीट समजून घेवूया.
गडबड हा शब्द इंग्रजीत GADBAD असा लिहीता येईल. तसा तो लिहीला आणि त्यातल्या प्रत्येक अक्षराला बारकाईने मानसशास्त्रीय संदर्भ जोडला तर GADBAD चा एक विलक्षण अर्थ समोर येईल. तो पुढीलप्रमाणे असेल :
G:- Guilt अपराधीपणा
A:- Anxiety भीती
D:- Depression नैराश्य
B:- Blaming दोष देणे
A:- Anger राग
D:- Disgust तिरस्कार
गडबड (GADBAD) ही एक टप्प्याटप्प्याने पुढे सरकणारी प्रक्रिया आहे. 'गडबड' मधला हा प्रत्येक टप्पा आपण आता बारकाईने समजून घेवू. त्यामूळे आपणास 'गडबड' चा अर्थ नीट समजण्यास मदत होईल.
G:- Guilt (अपराधीपणा ):
माणसाच्या मनात एखाद्या घटना- प्रसंगामुळे अपराधीपणाची भावना निर्माण होते. तो स्वतःला अपराधी किंवा गुन्हेगार समजू लागतो. म्हणजे काय? तर एखादी व्यक्ती त्या घटना प्रसंगात आपलीच मोठी चूक झाली आहे, आपणच गुन्हा केला आहे किंवा झाल्या प्रकाराला आपणच सर्वस्वी जबाबदार आहोत असं समजते. अशी व्यक्ती स्वतःला स्वतःच्या नजरेत गुन्हेगार समजते. त्या घटना प्रसंगाचे बरेवाईट परिणाम व त्यामुळे होणारे नुकसान याची जबाबदारी स्वतःकडे घेवून ती व्यक्ती आत्मक्लेष करण्याचा विचार गांभीर्याने करु लागते.
A:- Anxiety ( भीती ):
तथाकथित घटना प्रसंगात आपलं कधीही भरून येणार नाही असं भयंकर नुकसान झालं आहे. आता आपलं कसं होणार? कोण आपली मदत करेल? कोण आपली काळजी घेईल? माझ्यासमोर नेमकी कशी परिस्थिती येईल? आता कोणते नवे प्रश्न उभे राहातील? ते मला सोडवता येतील का? या सगळ्यांत मी एकटाच पडेन. मला कोण सांभाळून घेईल? मला कोण समजून घेईल? अशा एक ना अनेक प्रश्नांचे विखारी बाण व्यक्तीच्या मनाला भयभीत करुन सोडतात. अशा व्यक्तीला भीती वाटते. इतर कोणत्याही भयापेक्षा एकाकीपणाचं भय मानवी मनाला अधिक छळत असतं. सोबत कुणी असेल तर साक्षात मृत्यूलाही न भिणारं मानवी मन एकाकी असल्यावर नुसत्या पानांच्या सळसळीने देखील भयभीत होतं.
D:- Depression ( नैराश्य ):
मनाला पडत असलेल्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर हवं तसं मिळत नाही म्हटल्यावर त्या व्यक्तीच्या मनाला निराशा जाणवू लागते. हळूहळू मन निराशेनं पूर्ण भरुन जातं.
आपण निराशेच्या गर्तेत अडकत चाललो आहोत हे अनेकांच्या लक्षात येत नाही.
काहींच्या ते लक्षात येतं पण अशा वेळी नेमकं काय करायचं तेच समजत नाही. कुणाला विचारावं? मला या कामी कोण मदत करेल? कुणी खरंच मला मदत करेल का? की माझी टर उडविली जाईल? मी कुणावर विश्वास ठेवू? अशा प्रश्नांनी व्यक्तीच्या मनाचा आणखी छ्ळ सुरु होतो. निराशा आणखी गडद होते आणि व्यक्ती डिप्रेशनचा बळी ठरतो!
B:- Blaming ( दोष देणे ):
एखाद्या व्यक्तीला डिप्रेशन आलं की तिची चीडचीड वाढते. छोट्या छोट्या गोष्टींसाठी ती व्यक्ती अतार्किक आग्रह किंवा हट्ट करु लागते. अशा व्यक्तीचा हा अतार्किक हट्ट कोण पुरविणार? त्यांचे हट्ट पुरवले जात नाहीत. यामधून 'माझं कुणीच ऐकत नाही.' 'मला कुणी समजून घेत नाही.' 'मला कुणी मदत करीत नाही.' असे वेगवेगळे नकारार्थी अर्थ काढून ती व्यक्ती तिच्या सभोवतालच्या लोकांना दोष देवू लागते. तिच्यासोबत घडणाऱ्या प्रत्येक बऱ्या वाईट गोष्टींमध्ये कुणातरी त्रयस्थाचा दोष आहे असं ती मानते आणि त्या लोकांशी तसंच वागते.
याशिवाय काही वेळा डिप्रेशनमधली व्यक्ती प्रत्येक गोष्टीत माझाच दोष आहे. माझंच काहीतरी चुकलंय असं समजते. चूकीचा तर्क लावते. 'मी दोषी आहे' हा विचार अशा व्यक्तीच्या मनातील अपराधीपणाचा भाव अधिक गडद करते आणि ती व्यक्ती एका दुष्टचक्रात अडकत जाते.
A:- Anger ( राग ):
एकदा का ती व्यक्ती तिच्या भोवतालच्या लोकांना दरवेळी दोषी ठरवू लागली की हळूहळू लोक तिच्याकडे दुर्लक्ष करु लागतात. तीची दखल घेणं थांबवलं जातं. अगदी तिचे जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याकडूनसुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं. आता याचा त्या व्यक्तीला राग यायला लागतो.
एखादी व्यक्ती स्वतःला दोषी ठरवत असेल तेव्हाही तिला तिचा स्वतःचा राग यायला लागतो. इतरांवर किंवा स्वतःवरच आलेला हा राग कसा व्यक्त करायचा हे तिला कळत नाही. त्यामुळे रागाचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने होत नाही. स्वतःला किंवा इतरांना मारहाण करुन इजा करणे, वस्तुंची तोडफोड करणे अशा अयोग्य मार्गानी हा राग व्यक्त होतो.
D:- Disgust ( तिरस्कार ):
अशा रितीने आपला राग तीव्रतेने व्यक्त करुन सुद्धा परिस्थितीत काहीच सुधारणा होत नाही. उलट परिस्थिती आणखी चिघळते. गोष्टी आणखी वाईट पद्धतीने घडू लागतात. आणि या सगळ्यातून त्या व्यक्तीला आपली स्वतःचीच चीड येते. लाज वाटू लागते आणि ती व्यक्ती आपला स्वतःचाच तिरस्कार करायला लागते. हा तिरस्कार हळूहळू वाढत जातो. अगदी त्या व्यक्तीला जगावेसेही वाटत नाही. आपला जीव नकोसा वाटतो. 'आपण जगुच नये,' 'आपण आत्महत्या करावी' असे विचार ' तिच्या मनात सतत येवू लागतात. एखाद्या दुर्देवी क्षणाला तिचा हा विचार बळकट होतो आणि मग नको ती घटना घडते. सुदैवानं असं टोकाचं विपरीत काही घडलं नाही तरी ही गडबड आपल्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम करते. रक्तदाब, हदयविकार, किडनीचे विकार, मधुमेह यासारखे आजार उद्भवू शकतात. आपली प्रतिकारशक्ती कमी होवू शकते. आपला जनसंपर्क कमी होतो त्यातून आपले नाते संबंध, मैत्री संबंध बिघडतात. तसेच विविध प्रकारचे मानसिक त्रास सुरु होऊ शकतात.
थोडक्यात काय, तर आपल्याला ही गडबड समजली नाही, ती वेळीच थांबवता आली नाही तर आपला जीव जातो. किंवा आपले जगणे दुःखमय होवून जाते.
मित्रहो, तुमच्या आयुष्यात अशी 'गडबड' होऊ नये यासाठी तुमचे आई -वडिल किंवा पालकांशी तुमचा नियमित संवाद असायला हवा. तुम्हाला एक तरी चांगला मित्र किंवा मैत्रिण असली पाहिजे. आई वडील, मित्र मैत्रिण यांच्याजवळ तुम्ही तुमचं मन निर्धास्तपणे मोकळं करु शकता. दुर्दैवानं इतकं करुनही तुमच्या आयुष्यात अशी 'गडबड' झालीच तर कोणताही संकोच न बाळगता एखाद्या चांगल्या समुपदेशकाची मदत तुम्ही घ्यायला हवी. लक्षात ठेवा, 'गडबड' च्या कोणत्याही टप्प्यावर तुम्ही स्वतःचे रक्षण नक्की करु शकता!
मानवी मनात चालणारी ही 'गडबड' समजून घेणं हाच या लेखाचा खरा उद्देश आहे. त्यामुळं तुम्हाला ही 'गडबड' निश्चितच कळली असेलच. आता तुम्हीसुद्धा "गडबड? नको रे बाबा!" असं म्हटल्याशिवाय राहणार नाहीत असा मला विश्वास वाटतो.
© अनिल उदावंत
(साहित्यिक)
ज्येष्ठ प्रशिक्षक व समुपदेशक
सावेडी, अहमदनगर
संपर्क : ९७६६६६८२९५