भारतीय संस्कृतीमध्ये रामायण आणि महाभारत या दोन महान ग्रंथांचे किंवा महाकाव्यांचे अजोड महत्त्व आहे. रामायणात श्रीराम आणि महाभारतात श्रीकृष्ण या महानायकांचे परमेश्वरी कार्य अनुभवायला मिळते. या दोघांनाही परमेश्वर मानल्यावर मनुष्यरूपात वावरणारे आपण सर्वजण त्यांच्या कृतीची आणि उक्तीची स्वतःवर कोणतीच सक्ती न करता त्यांची केवळ स्तुती करण्यात धन्यता मानतो आणि त्यालाच आपण भक्ती समजतो.

रामायण हे आदर्शवाद रुजविणारे महाकाव्य आहे असं मानलं जातं; कारण रामायणात श्रीरामाबरोबरच इतर सर्व व्यक्तीरेखा देखील आपल्या प्रत्येक कृतीतून केवळ आदर्श निर्माण करताना दिसतात. तुलनेने महाभारत हे अधिक वास्तववादी आणि म्हणूनच मानवी भाव-भावनांशी अधिक जवळीक साधणारे महाकाव्य आहे असे वाटते.

महाभारतात असलेल्या अर्जून आणि कर्ण या दोन विशेष व्यक्तिरेखा आहेत. महाभारत वाचताना किंवा पाहताना याच दोन व्यक्तीरेखांसोबत आपण आपली स्वतःची तुलना करतो. आपल्यापैकी काहींना आपण अर्जुन आहोत असं वाटत राहातं तर काहींना आपण कर्ण आहोत असं वाटत असतं! वास्तविक कर्ण आणि अर्जुन यांच्यात बरीच साम्ये दिसुन येतात. जसे की, दोघेही पांडव आहेत. दोघेही कुंतीपुत्र आहेत. दोघेही धनुर्विद्येत पारंगत आहेत. दोघेही बलाढ्य आहेत. अर्थात त्यांच्यात काही मूलभूत आणि अंगिभूत फरकही आहेतच. त्यांचा विचार आपण टाळू शकत नाहीत; कारण त्या फरकांचा त्यांच्या जीवनावर मोठा परिणाम झालेला दिसुन येतो.

कर्ण अत्यंत हुषार, शस्त्रनिपुण, बलदंड, साहसी असुनही राजपुत्र म्हणून अव्हेरला गेला होता. याचे शल्य वाटू नये म्हणून कर्णाने आपली धनुर्विद्या सर्वाधिक श्रेष्ठ ठरावी यासाठी प्रचंड कष्ट घेतले. आपली अतिशय दानशूर अशी प्रतिमा निर्माण केली व ती अखेरपर्यंत जपलीही. असे असुनही तो 'आपण सतत डावलले गेलो' या भावनेचा आणि त्यातून आलेल्या न्यूनगंडाचा बळी ठरला. कर्ण अजेय होता परंतु कवचकुंडले असताना तो हरुच शकत नाही याची जाणीव असुनही आपल्या जवळच्या या अद्भूत शक्तीकडे त्याचा कानाडोळा झाला, दुर्लक्ष झाले. आपली दानशूराची प्रतिमा जपण्याचा मोह त्याला आवरता आला नाही. समोरच्यांची चाल त्याला ठाऊक असुनही त्याने आपली अद्भूत शक्ती असलेल्या कवडकुंडलांचे दान देवून टाकले!

कर्णाने स्वतःच आपला शत्रु निश्चित केला होता. अर्जुनाचा कोणताही दोष नसताना कर्णाने त्याला आपला शत्रु मानले. त्याच्याशी स्वतःची कायम तुलना केली. अर्जुनाचा द्वेष आणि मत्सर करण्यापासून तो स्वतःला कधीच दूर ठेवू शकला नाही. अर्जुनाहून श्रेष्ठ धर्नुधारी बनता यावे यासाठी आपल्याला ज्ञान देणाऱ्या श्रीगुरुंशी कर्ण खोटं बोलला आणि ब्रम्हास्त्रविद्येच्या विस्मरणाच्या शापाचा धनी झाला. केवळ अर्जुनविरोध करायचा म्हणून कर्णाने दुर्योधनाशी मैत्री केली. दुर्योधनाकडुन अनेकदा अपमानित होऊनही त्याने केवळ अर्जुन विरोधासाठी ही मैत्री टिकवून ठेवली. कुरुक्षेत्रावरच्या युद्धकाळात कर्ण कौरवसेनेचा सेनापती झाल्यावर माता कुंतीने कर्णाला "तू थोरला पांडव आहेस!" असे सांगितल्यावरसुद्धा त्याचा अर्जुनद्वेष ओसरला नाही. कुंतीने मागितलेल्या दानातही त्याने "तुझे पाच पांडव जीवंत राहतील" असं सांगत अर्जुन सोडून इतर पांडवांना जीवदान दिले!

खरेतर, कर्णाने दुर्योधनाच्या आश्रयाला न जाता स्वत:जवळच्या कवडकुंडलांची अद्भूत शक्ती वापरून स्वतः साम्राज्य उभारण्याचा प्रयत्न केला असता तर तो एका मोठ्या साम्राज्याचा अनभिषिक्त सम्राट होवू शकला असता!

आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात असाच एक कर्ण लपलेला असतो. आपल्याजवळचे चांगले गुण, कला, कौशल्ये यांच्या रुपात आपल्यालाही कवचकुंडलं मिळालेली असतात! आपल्यात दडलेली एखादी उत्कृष्ठ कला, अवगत केलेले एखादे अनोखे कौशल्य, आपल्यातील एखादा दुर्मिळ सद्गुण याच्या जोरावर आपण जीवनात यशस्वी होवू शकतो; परंतु महाभारतातला कर्णच आपल्या मनात ठाण मांडून बसला असेल तर तुमचा वापर करून घेत स्वतःचा फायदा करून घेणारे अनेक दुर्योधन आजही समाजात आहेत. आपणही महाभारतातल्या कर्णासारखेच आपल्या आसपास एखाद्या अर्जुनाला शोधतो आणि त्यालाच आपला शत्रु समजून बसतो. त्याच्याशी हेवा, दावा, असूया, राग, रुसवा, द्वेष, मत्सर या भावनांनी ओतप्रोत भरलेले व्यवहार करू लागतो. यात आपले सारेच दुर्गुण  बाहेर पडतात. आपली प्रतिमा मलिन होते. हीच प्रतिमा आपल्या मन-मेंदूवर प्रभाव टाकते आणि त्यामुळे आपल्या कला, कौशल्य व सद्गुणांचा स्वतःच्या उद्धारासाठी उपयोग करून घेता येत नाही. मग कर्णासारखेच क्लेषदायक जीवन आपल्याही वाट्याला येते. स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याच्या अनेक संधी आपल्या हातातून अलगद निसटून जातात. अखेर आपण निव्वळ अपयशाचे धनी होतो.

तुम्ही कर्ण असाल तर समाजातल्या दुर्योधनाच्या वळचणीला आश्रित म्हणून जाण्यापेक्षा तुमच्या भोवतालच्या, तुमच्याशी साधर्म्य दर्शवणाऱ्या, तुमच्याइतक्याच ताकदीच्या अर्जुनाची साथ-संगत तुम्ही करायला हवी. त्यामुळे जीवनाच्या कुरुक्षेत्रावर तुम्हाला तुमचा बचाव नक्कीच करता येईल!

अनिल उदावंत
ज्येष्ठ प्रशिक्षक, समुपदेशक व साहित्यिक,
सावेडी, अहमदनगर संपर्क: ९७६६६६८२९५

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel